मंदिरे

सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Copyright © SURESH NIMBALKAR. All rights reserved.

किल्ले

धारातीर्थे

लेणी

समुद्रकिनारे

महाराष्ट्राची भूमी हि थंड झालेल्या लाव्हारसाच्या थरांची बनलेली आहे. भूगर्भशास्त्रानुसार सुमारे सात कोटी वर्षापूर्वी घडलेल्या नैसर्गिक उद्रेकाने ही घटना घडली. महाराष्ट्र या शब्दाचा सर्वात प्राचीन उल्लेख आढळतो तो मध्य प्रदेशातील एरण येथील एका छोटया शिलालेखात. यावरून महाराष्ट्र हे नाव इ.स.चौथ्या शतकाइतके प्राचीन असल्याची माहिती मिळते. महाराष्ट्राचे साधारणपणे कोकण,देश, घाटमाथा,मावळ,खानदेश,मराठवाडा व विदर्भ असे ७ विभाग पडतात. समुद्रकिनाऱ्यापासून ३५ ते ५० कि.मी.अंतरावर सह्याद्रीची डोंगररांग पसरलेली आहे. सह्याद्री ते समुद्र यामधील अरुंद भूमीला कोकणपट्टी म्हणतात. सह्याद्रीच्या पुर्व बाजुचा प्रदेश देश म्हणुन ओळखला जातो तर सह्याद्री पर्वताचा उंचवट्याचा भाग घाटमाथा म्हणुन ओळखला जातो. सह्याद्रीच्या पूर्वेकडे उतरत्या डोंगररांगामुळे खोरी निर्माण झाली आहेत त्यांना मावळ म्हणतात. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार व जळगाव या भागांना खानदेश तर गोदावरीचे खोरे मराठवाडा म्हणुन ओळखले जाते. विदर्भ व वऱ्हाड या विभागात पुर्णा,वर्धा,पेनगंगा,वेनगंगा या नदयांची खोरी येतात. महाराष्ट्राचा इतिहास हा सह्याद्रीशी, इथल्या दुर्गम दुर्गांशी आणि प्राचीन संस्कृतीशी निगडित आहे. सह्याद्री हा महाराष्ट्राचा कणा आहे. त्याच्याशी सलग सातपुडा पर्वताच्या रांगा पूर्वेकडे गेलेल्या आहेत. या दोनही पर्वत रांगांनी दक्षिण पठाराचे संरक्षण केले आहे. सहयाद्री व सातपुडाच्या माथ्यांवर अनेक ठिकाणी किल्ले उभे आहेत. याशिवाय डोंगराकड्यांवर अनेक मंदिरे बांधलेली आहेत. संपुर्ण भारतात आढळणाऱ्या १५०० लेण्यापैकी १००० पेक्षा जास्त लेण्या महाराष्ट्रात दिसुन येतात. सह्याद्रीच्या कुशीत कोरलेल्या या लेण्यातून प्राचीन काळचे सौंदर्य प्रकट होते. प्रचंड खडक, ताशीव कडे, उंचउंच शिखरे, सुळके व घनदाट झाडीने भरलेलेया दऱ्या यांनी सह्याद्रीला सामर्थ्य आणि सौंदर्य प्राप्त झाले आहे. इथले मंदीरस्थापत्य सर्वत्र विखुरलेले असुन वारंवार होणाऱ्या आक्रमणात व काळाच्या ओघात खूप मोठया प्रमाणात नष्ट झाले आहे तरीसुद्धा अंबरनाथ, गोंदेश्वर, टाहाकारी, जागेश्वर, अंभई या सारख्या चौथ्या शतकातील अनेक मंदिरात शिल्पकारांची करामत दिसुन येते. येथील गढ्या आणि वाडे यांचे बांधकाम प्रेक्षणीय आहे पण येथे भव्यतेपेक्षा उपयुक्तता महत्वाची आहे. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीतली लेणी म्हणजे सौंदर्यतीर्थे आहेत तर माथ्यावरचे किल्ले म्हणजे सामर्थ्याची आधिष्ठाने आहेत. घारापुरीचे शिल्प महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाचे मानचित्र म्हणुन झळकत आहे. अजिंठा लेणी व लेण्यांतली चित्रकला जगविख्यात आहे. वेरूळची लेणी म्हणजे महाराष्ट्राच्या पाषाणशिल्पांचा मानबिंदु. प्राचीन काळच्या या वारशात मध्ययुगीन काळातील किल्ल्यांनी भर घातली आहे. त्यांची तटबंदी, बुरुज आणि दरवाजे सौंदर्याबरोबर सामर्थ्याने नटलेले आहेत. गिरीदुर्ग, वनदुर्ग, भुईदुर्ग, जलदुर्ग असे विविध प्रकारचे किल्ले असलेला महाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांचे कधी न संपणारे भंडार आहे. राजगड, रायगड, प्रतापगड, पुरंदर यांसारखे सह्याद्रीच्या शिखरांवरचे गड, वासोटा,मुडागड यासारखे वनदुर्ग, औरंगाबादजवळील देवगिरी ऊर्फ दौलताबाद,चाकणचा संग्रामदुर्ग यासारखे भुईकोट तर जंजिरा, सिंधुदुर्ग यांसारखे जलदुर्ग महाराष्ट्रात आहेत. किल्ले म्हटले की त्याचा थेट संबंध छत्रपति शिवाजी महाराजांशी जोडला जातो. शिवकाळात राज्य म्हणजे दुर्ग हा विचार जरी प्रबळ असला तरी सातवाहन, राष्टकूट, शिलाहार, बहमनी, मोगल आणि पोर्तुगीज यांचा दुर्गबांधणी मधला सहभाग दुर्लक्ष करण्याजोगा नाही. शिवकाळ हा किल्ल्यांची उभारणी व त्यांचा उपयोग यांचा सुवर्णकाळ होता. दुर्गबांधणीतल्या तंत्राचा परमोच्च अविष्कार शिवदुर्ग रचनेत आढळतो. महाराष्ट्रातील किल्ले, देवळं, लेणी, ऐतिहासिक स्मारकं यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. चला तर मग हा सौंदर्याने नटलेला दुर्गसंपन्न महाराष्ट्र भटकायला !!!!!!! -------------सुरेश निंबाळकर

गढी/कोट