पश्चिम रेल्वेवर असलेल्या केळवेचा समुद्रकिनारा मुंबईकरांमध्ये प्रसिध्द आहे. केळवे स्थानकात उतरुन ६ आसनी रिक्षाने केळवे गावात यावे. केळवे शितलादेवी मंदिरा वरुन बाजाराकडून पुढे जाणाऱ्या दांडाखाडी मार्गावरच्या केळवे कस्टम कार्यालयाकडून उजव्या बाजुने कोळीवाड्यास जाणाऱ्या वाटेवर केळवे कस्टम कोट-२ आहे. या कोटाशेजारीच एक नव्याने बांधलेले चर्च आहे या चर्चमध्ये आपल्याला ३०० वर्षे जुनी लाकडाची मदर मेरीची मुर्ती पाहायला मिळते. चर्चच्या डाव्या बाजूस पोर्तुगीजकालीन वखारीचे अवशेष मोठया प्रमाणात पाहायला मिळतात. हा कोट म्हणजे वखारीच्या रक्षणाकरिता व टेहळणीकरता बांधलेला चौरस आकाराचा एकांडा बुरूज. केळवे कस्टम कोटाचे इतिहासातील नाव माहित नसल्याने, हा कोट शेजारील कस्टम कार्यालयाच्या नावाने व याच्या शेजारीच समांतर अजून एक कोट असल्याने कस्टम कोट-२ म्हणूनच ओळखला जातो. कधीकाळी खाडीकिनारी असणारा हा बुरूज भौगोलिक बदलामुळे पुर्णपणे जमिनीवर आलेला आहे. बुरूज स्वरुपात असणाऱ्या या बांधकामाच्या आजुबाजूस वखार वगळता कोणतेही बांधकाम दिसत नाही म्हणजेच याचा वापर खाडीच्या वाहतुक मार्गावर देखरेख करण्यासाठी आणि वखारीच्या संरक्षणासाठी होत असावा. बुरूजावर चढण्यासाठी मार्ग नसल्याने शिडीचा वापर करावा लागतो. बुरुजावर प्रचंड प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली असल्याने अवशेष नीटसे दिसून येत नाहीत व ओळखताही येत नाहीत. या बुरुजाच्या बांधणीसाठी ओबडधोबड दगड व चिखलमाती यांचा वापर करण्यात आला आहे. केळवे कस्टम कोटा-२ याचेही म्हणजेच या बुरुजाचे स्थान दांडाखाडीच्या मुखाशीच आहे. सद्यस्थितीत १५ फुट उंचीच्या या बुरुजाची मूळ उंची २० ते २५ फुट असावी. बुरुजावरील मारगीरीसाठी असणाऱ्या बंदुकीच्या जंग्यावरून याचा मुख्य उद्देश वखारीचे सरंक्षण व टेहळणी असावा हे स्पष्ट होते. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणी बुरुजांचा मुख्य उपयोग दातिवरे ते मनोर प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक ते संरक्षण व रसद पुरविणे हा होता. लहान आकाराचे कोट,टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. इ.स१७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी केळवे किल्ला परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला. किल्ला छोटेखानी असून १० मिनीटात पाहून होतो. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण ज्याला प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी. --------------------सुरेश निंबाळकर

केळवे कस्टम  कोट- २

जिल्हा -पालघर  
श्रेणी  - सोपी 
दुर्गप्रकार- सागरी किल्ला