पळशी विठ्ठल मंदीर

जिल्हा - नगर  
श्रेणी  - सोपी   
प्रकार -  विठ्ठल मंदीर

अहमदनगर म्हणजे बेलाग किल्ले, सुंदर ऐतिहासिक वाडे व अनेक गढ्या असणारा जिल्हा. या नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात पळशी या गावी होळकरांचे दिवाण रामाजी कांबळे-पळशीकर यांचा भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्याजवळच १७व्या शतकातील विठ्ठल मंदिर अप्रतिम कोरीवकामाचा नमुना आहे. किल्ल्याचे आणि मंदिराचे बांधकाम एकाच वेळी झाली असण्याची शक्यता आहे. पुणे–अहमदनगर रस्त्यावर शिरूर गाव ओलांडले की पारनेर हे तालुक्याचे गाव गाठायचे. पारनेरनंतर हाच रस्ता पुढे २० कि.मी.वर टाकळी ढोकेश्वर येथे नगर–कल्याण महामार्गला मिळतो व पुढे वासुंदे-खडकवाडी गावामार्गे २० कि.मी.वरील पळशी गावात पोहोचतो. पुणे ते पळशी हे अंतर १३० कि.मी.आहे. पळशी किल्ल्याच्या पूर्व दरवाजाबाहेर थोड्या अंतरावर पळशी नदीचे पात्र आहे. येथे नदीला बांध घातल्यामुळे तयार झालेल्या जलाशयाच्या एका बाजूला विठ्ठल मंदिर आणि दुसऱ्या बाजूला रामेश्वर मंदिर आहे. जलाशयाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मंदिरे सुंदर दिसतात. गाडीरस्त्याने नदीचे पात्र ओलांडून गेल्यावर आपण विठ्ठल मंदिरापाशी येतो. मंदिराच्या सभोवती चार टोकाला चार बुरूज असलेला प्राकार म्हणजेच तटबंदी असुन दरवाजाच्या उजव्या बाजूस नदीला लागून एक चौरस दगडी पुष्कर्णी आहे. पुष्कर्णीच्या काही कोनाड्यात मुर्ती ठेवलेल्या दिसतात. नागर शैलीतील या मंदिराच्या प्रवेशव्दारावर गणपती, जय विजय ही दैवते कोरलेली असुन नक्षीकाम केलेले आहे. दरवाजाच्या वरील बाजुस नगारखाना असुन या सर्व बांधकामावर इस्लामी स्थापत्याचा प्रभाव जाणवतो. दरवाजातून आत शिरल्यावर समोरच उंच कळस असलेले रेखीव मंदिर नजरेस पडते. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर दोन फ़ुलांच्या पट्ट्या आणि कळसाच्या खालील बाजूस किर्तीमुखाची पट्टी पाहायला मिळते. गर्भगृहातील पाणी बाहेर पडण्याच्या ठिकाणी मकरमुख बसवलेले आहे. मंदिराला बाहेरुन प्रदक्षिणा मारताना मंदिराच्या बाह्यांगावर नक्षीदार मोर, हत्तीमुख, झुंजणारे हत्ती, लढाईस निघालेले सैन्य आणि सांडणीस्वार कोरलेले असुन तीन दिशांना तीन देव कोष्टक दिसतात त्यात विष्णू आणि महिषासूरमर्दिनीची मुर्ती आहे. मंदिराच्या मागील ओवऱ्याच्या छतावर दोन काळविटाचे शिल्प कोरलेले आहे. हे शिल्प वेगवेगळ्या दिशेने पाहिल्यास खाली मुंड्या घातलेली दोन काळविटे आणि दोन धावणारी काळविटे अशी एकूण चार काळविटे दिसतात. मंदिराच्या तटबंदीवर चढण्यासाठी दोन ठिकाणी जिने असुन या जिन्याने फ़ांजीवर चढून कळस जवळून पहाता येतो. मंदिराच्या शिखरावर आतील बाजुस कोरीव कलाकसुरीची कामे आहेत. कळसात चार देवकोष्टक असून त्यात विष्णूच्या मुर्ती आहेत. छोटे छोटे कळस एकमेकात गुंफ़ून मुख्य कळसाची रचना करण्यात आली आहे. तटबंदीवरुन संपुर्ण परिसराचे सुंदर दृश्य दिसते. समोरील पळशीचा भुईकोट व त्याची तटबंदी आपले लक्ष वेधून घेते. मंदिराच्या गाभाऱ्याला जोडून प्रशस्त सभामंडप असून या मंडपाच्या तीन बाजूंनी असलेल्या नऊ पायऱ्या या नवविद्या भक्तीची प्रतिके तर मंडपाचे नउ फुट उंचीचे १८ खांब हे १८ पुराणाचे प्रतिक मानले जातात. मंडपाच्या खांबावर सुरेख नक्षीकाम केले असून पुराणातील काही कथा त्यावर कोरलेल्या आहेत. मंदिराच्या सभामंडपात मध्यमागी दगडी कासव असुन गर्भगृहाच्या व्दारपट्टीवर कोरीवकाम केलेले आहे. यात दरवाजाच्या दोन्ही बाजुंना रिध्दी-सिध्दी सहित गणपती व भैरवमुर्ती असुन ६४ योगिनी आहेत. उंबऱ्यावर चंद्रशीळा असुन दोन किर्तीमुखे आहेत. सभामंडपाच्या छतावर उत्तर हिंदुस्थानी शैलीतील श्रीकृष्ण व गोपिकाच्या रासविहाराच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. यात उजव्या बाजूला गणपती आणि डाव्या बाजूला श्रीकृष्णाची मुर्ती आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात काळ्या संगमरवरी पाषाणात घडवलेली विठ्ठलाची मुर्ती आहे. विठ्ठलमूर्तीच्या प्रभावळीवर दशावतार कोरलेले असुन सिहासनावर नारद तुंबर, गंधर्व, यक्ष, किन्नराच्या मूर्ती कोरल्या आहेत. विठ्ठल मुर्तीच्या दोन्ही बाजुना राही-रुख्मिणी, ज्ञानेश्वर माऊली अन तुकोबाराय यांच्या संगमरवरी मुर्ती मांडून ठेवलेल्या आहेत. या मंदिराशेजारी नदीकाठी असणारे रामेश्वर मंदिर व घाट तसेच घाटावर असलेले सतीमंदिर येथे पहावयास मिळते. मंदीर व परीसर पहाण्यासाठी दीड तास लागतो. या विठठल मंदिर स्थापनेच्या संदर्भात शिवाजी महाराजांच्या सुरतेच्या लुटीतील काही रक्कम वापरली असल्याची माहिती पळशी गावचे वतनदार रामराव पळशीकर यांचे कागदपत्रावरुन मिळते.सुरतेची लूट जात असताना पळशी मुक्कामी या लुटीतील काही द्रव्य पळशीच्या विकासासाठी वापरण्याच्या बेत केला. त्यानुसार पळशी गावांभोवती चोहोबाजुंनी भरभक्कम तटबंदी व गावाबाहेर नदीकाठी विठठल मंदिर बांधले. विठठल मंदिर बांधण्यासाठी उत्तर हिंदूस्थानातील कारागीरांना बोलावून त्यांचेकडून अप्रतिम अशी दगडी मंदिराची उभारणी करण्यात आली. रामराव पळशीकर यांचे चिरंजीव आनंदराव रामराव पळशीकर हे पेशव्यांकडे सुभेदार होते. पानिपतच्या तिसऱ्या युध्दात (१७६१) त्यांनी विशेष पराक्रम गाजविला व आनंदराव पळशीकर सरसेनापती झाले.---------------सुरेश निंबाळकर