आबाजी सोनेगाव

जिल्हा - वर्धा
श्रेणी  -  सोपी
दुर्गप्रकार- भुईकोट

वर्धा जिल्हा म्हटले कि आपल्याला आठवते महात्मा गांधी यांचे सेवाग्राम पण विदर्भातील या वर्धा जिल्ह्यात एकेकाळी बरेच किल्ले गिरीदुर्ग, भुईकोट व गढी स्वरुपात अस्तित्वात होते. वर्धा जिल्ह्यातील किल्ल्यांची शोधयात्रा करताना आम्हाला एकुण १० कोट अवशेष रुपात पहायला मिळाले. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे गडकिल्ले महाराष्ट्राचे या पुस्तकातील ७ किल्ले वगळता इतरत्र कोठेही या किल्ल्यांचा उल्लेख दिसुन येत नाही. आजच्या संगणक युगात आंतरजालावरही या किल्ल्यांची माहिती दिसुन येत नाही. या किल्ल्यांना भेट दिली असता मिळालेली माहिती मी दुर्गभरारी या संकेतस्थळावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यातील बऱ्याच गढी पुर्णपणे नष्ट झाल्या असुन केवळ तटबंदीची एखादी भिंत अथवा एखादा बुरुज वा दरवाजा असे उर्वरित अवशेष काळाशी झुंज देत आहेत. या १० किल्ल्यात २ गिरिदुर्ग १ सराई तर उरलेले ७ गढीकोट आहेत. यातील बहुतांशी गढीकोटात गाव, मंदिरे वा दर्गा असल्याने या वास्तुनीच या कोटांच्या अवशेषांचा घास घेतला आहे. आम्ही पाहीलेल्या सर्व कोटामधील सर्वात सुस्थितीत असलेली वास्तु म्हणजे सोनेगाव आबाजी येथील मंदिरामध्ये परिवर्तन झालेली गढी. सोनेगाव आबाजी गढीला भेट देण्यासाठी तालुक्याचे शहर असलेले देवळी हे सर्वात जवळचे ठिकाण आहे. वर्धा ते देवळी हे अंतर १७ कि.मी. असुन देवळी ते सोनेगाव आबाजी हे अंतर ८ कि.मी. आहे. देवळी येथुन सोनेगाव आबाजीला येण्या-जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध आहेत. मंदिर पंचक्रोशीत प्रसिध्द असल्याने येथे नेहमी भक्तांची गर्दी असते. बस थांब्यावर उतरून ५ मिनीटात गावाच्या टोकाला असलेल्या या गढीत पोहचता येते. गढीच्या आवारात प्रवेश केल्यावर पायऱ्यांनी वर प्रवेश करण्यापुर्वी लोखंडी जाळीने बंदिस्त केलेली एक गोलाकार खोल विहीर पहायला मिळते. चौकोनी आकाराची हि गढी एका उंचवट्यावर अर्धा एकर परिसरात पसरली असुन गढीच्या उत्तरेला मुख्य दरवाजा व दक्षिणेला नव्याने बांधलेला एक लहान दरवाजा आहे. मुख्य दरवाजाच्या आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. मंदिरामध्ये परिवर्तन झालेल्या या गढीची बाहेरील तटबंदी व चारही बुरुज आजही शिल्लक असले तरी आतील मूळ अवशेष मात्र पुर्णपणे नष्ट झाले आहेत. दरवाजाच्या आतील बाजुस तटावर जाण्यासाठी जिना असुन दरवाजावरून संपुर्ण गढी नजरेस पडते. गढीच्या आतील बाजूस दोन मंदिरे असुन एक मंदिर लक्ष्मीनारायण व मुरलीधराचे आहे तर दुसरे मंदिर शंकराचे आहे. या मंदिरातील शिवपिंडी सदाशिवरूपातील असुन पिंडीवर सदाशिवाची पाच मस्तके कोरली आहेत. या दोन्ही मंदिरात नागपुरकर लक्ष्मणराव भोसले यांनी भेट दिलेल्या पितळेच्या श्रीकृष्णाच्या अष्टांगवक्र मुर्ती आहेत. लक्ष्मीनारायण मंदिराच्या मागील बाजुस असलेल्या तळघरात आबाजी महाराजांची समाधी आहे. दोन्ही मंदिराची रचना अतिशय सुंदर असुन मंदिराची रंगसंगती डोळ्यात भरण्यासारखी आहे. तटबंदीच्या पुर्व भिंतीला लागुन असलेल्या मुळ खोल्यांमध्ये सध्या मंदिराचे सामान व कर्मचारी राहत असुन पश्चिम तटबंदीला लागुन सुंदर सभागृह आहे. सभागृहाच्या गोलाकार खांबावरील नक्षीकामात लोकमान्य टिळक,आगरकर यांचे लहान पुतळे कोरले आहेत. संपुर्ण गढी फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. सध्या विरूळ येथे स्थायीक असलेले कुरझडीकर यांच्याकडे मालगुजारी असलेल्या ४ गावांपैकी सोनेगाव आबाजी हे एक गाव होते. सोनेगाव येथे असलेली गढी कुरझडीकर यांनी संत आबाजी यांना मंदिरासाठी दान दिली. संत आबाजी यांचे ५ व्या पिढीतील वंशज असलेले ८२ वर्षीय कमलाकर पुरषोत्तम दाणी सध्या येथील मठाधिपती आहेत.------------------सुरेश निंबाळकर