​​जिल्हा -पालघर  
श्रेणी  - सोपी 
दुर्गप्रकार- सागरी किल्ला 

​तारापुर फुटका बुरूज 

पालघर जिल्ह्यात तारापूर हें बंदर असून चिंचणी हें फार जुनें गांव आहे. येथें पूर्वी फार मोठा व्यापार चालत असे. तारापुर किल्ल्याहुन चिंचणी गावाकडे जाताना थोडेसे आधी एक रस्ता समुद्रकिनारी असलेल्या आदिवासीं पाड्याकडे जातो. या पाड्यात रस्त्याच्या उजव्या बाजुला तारापुर बुरूज पहायला मिळतो. बुरूजाच्या पश्चिमेस समुद्र व दक्षिणेस तारापुरची खाडी आहे असुन हा बुरूज म्हणजे तारापुर किल्ल्याच्या रक्षणाकरिता व खाडीच्या वाहतुक मार्गावर टेहळणीकरता बांधलेला गोलाकार आकाराचा एकांडा शिलेदार. या बुरुजाचे इतिहासातील नाव माहित नसल्याने हा तारापुरचा वा चिंचणीचा बुरुज म्हणुन ओळखला जातो. कधीकाळी खाडीकिनारी असणारा हा बुरूज भौगोलिक व मानवी हस्तक्षेपामुळे याचे स्थान पुर्णपणे जमिनीवर आलेले आहे. या बुरुजाच्या बांधणीसाठी ओबडधोबड दगड व गिलाव्यासाठी चुन्याचा वापर करण्यात आला आहे. सद्यस्थितीत १५ फुट उंचीच्या या बुरुजाची मूळ उंची २० ते २५ फुट असावी. बुरुजावरील जंग्यावरून याचा मुख्य उद्देश सरंक्षण व टेहळणी असावा हे स्पष्ट होते. बुरूजावर चढण्यासाठी मार्ग नसल्याने शिडीचा वापर करावा लागतो. बुरुजावर झाडेझुडपे वाढलेली असल्याने अवशेष नीटसे दिसून येत नाहीत व ओळखताही येत नाहीत. २२ फुट उंचीच्या या बुरुजाच्या वरील कठड्याची उंची ५ फुट असुन ते बहुतांशी कोसळलेले आहेत. बुरूज छोटेखानी असून १० मिनीटात पाहून होतो. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण ज्याला प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी. याशिवाय चिंचणीमध्ये जीर्णोद्धारीत पेशवेकालीन नागेश्वर महादेव मंदिर पाहायला मिळते. वसई मोहिमेच्या वेळी म्हणजेच १७३९ च्या दरम्यान हे मंदिर अस्तित्वात होते किंवा ते या दरम्यान बांधले गेले असावे. मंदिरात काळ्या पाषाणात असलेले स्वयंभू शिवलिंग आहे. गाभाऱ्याच्या बाहेर उजव्या बाजुला काळ्या पाषाणातील गणपतीची पुरातन मूर्ती आहे. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या बुरुजाचा केवळ टेहळणीसाठी करण्यात आला असावा असे येथील अवशेष पाहून वाटते. लहान आकाराचे कोट,टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. इ.स.१५८२ व इ.स. १६१२ असे दोन वेळा मोगलांनी या परिसरावर हल्ले केले. छत्रपती शंभाजी महाराजांनी इ.स १६८४ मध्ये तारापुरवर हल्ला चढविला होता पण वेढा देऊन बसण्या इतका वेळ मराठ्यांकडे नसल्यामुळे हा परिसर ताब्यात आला नाही. पेशवे दफ्तरातील पत्रव्यवहारात असा उल्लेख आहे की लढाईच्या वेळी मराठा सैन्य हे तारापुर किल्ल्याच्या उत्तरेला १ ते २ मैलांवर ठेवण्यात आलं होतं म्हणजेच हे सैन्य चिंचणी परिसरात होते. इ.स १७३९च्या वसई मोहिमेत तारापुर किल्ल्यावरील विजयानंतर २४ जानेवारी १७३९ रोजी तारापुर परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला. इंग्रजांनी तारापुर किल्ला जिंकुन घेताना प्रथम हा बुरुज घेतला व येथुन तोफा डागल्या. त्याबाबत असा उल्लेख आढळतो कि तारापूरच्या उत्तरेकडे दीड किमीवर एक बुरुज बांधला गेला होता. तो ९ मीटर व्यासाचा व सात मीटर उंच होता. त्यात तीन मीटर उंचीचा धमधमा बांधला होता. त्यावरुन सन १८१८ मधे दहा तोफा उडवल्या जायच्या.