काकतीचा किल्ला

झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचे जसे इतिहासात स्थान आहे तसेच ब्रिटिश साम्राज्याला सुरुंग लावणारी पहिली महिला म्हणून राणी चन्नम्मांचे नाव आदराने घेण्यात येते. या शुरवीर राणी चेन्नम्मा यांचा जन्मगाव असलेला काकतीचा छोटेखानी किल्ला बेळगाव पासून ५ कि.मी अंतरावर कोल्हापूर दिशेला एका मध्यम उंचीच्या डोंगरावर उभा आहे. हा किल्ला बेळगाव कर्नाटक महामार्गावर असुन सपाट प्रदेशातील किल्ल्याचा डोंगर सहजपणे आपले लक्ष वेधून घेतो. डोंगराच्या एका बाजुला उतरणाऱ्या सोंडेवर हा छोटेखानी किल्ला बांधण्यात आला आहे. गडाच्या पायथ्यापर्यंत गाडीने जाता येते व तेथुन नव्याने बांधलेल्या सिमेंटच्या पायऱ्या चढून किल्यावर जायला १० मिनिटे लागतात. पायऱ्यांच्या वाटेने वर जाताना आजूबाजूला मोठमोठ्या शिळा पडलेल्या दिसतात व वरील बाजुस असणारा बुरुज आपले लक्ष वेधून घेतो. गडाच्या बांधकामात चुन्याचा वापर न करता केवळ एकावर एक चिरे ठेवुन बुरुज व तटबंदी उभारली आहे. किल्ला आकाराने जरी छोटा असला तरी त्याला अंतर्गत तटबंदी घालुन परकोट व बालेकिल्ला असे दोन भागात विभागण्यात आले आहे. किल्ल्याला एकूण तीन मोठे बुरुज असुन गडाची आतील तटबंदी खुप मोठ्या प्रमाणात ढासळलेली आहे. ढासळलेल्या तटबंदीमुळे गडाचा मुख्य दरवाजा कोठे असावा याचा अंदाज करता येत नाही व ढासळलेल्या तटबंदीतुनच आपला गडात प्रवेश होतो. गडाच्या अंतर्गत बरीच दालने असुन संपुर्ण किल्ल्याला नागमोडी तट आहे. गडाच्या सर्वोच्च भागात एका बुरुजाची रचना असुन या बुरुजावर जाण्यासाठी बुरुजातुनच अंतर्गत दरवाजा आहे. बुरुजाखालुन पहिले असता त्यावर असणाऱ्या मारगीरीच्या जंग्या स्पष्ट दिसतात. किल्ल्यात्तील सर्वात उंच असणाऱ्या या बुरुजावरून नजर फिरवली असता किल्ल्याचा संपुर्ण व आसपासचा खुप मोठा परिसर नजरेस पडतो. गड दुर्लक्षित असल्याने गडावर खुप मोठया प्रमाणावर खुरटी झुडपे वाढलेली आहेत. गडावर पाण्याची दोन खोदीव टाकी व एक बांधीव हौद आहे पण सद्यस्थितीत दोन्ही टाक्यात दगडमाती साठलेली असुन हौदही कोरडा पडलेला आहे. गडाच्या तटबंदीवरून फेरी मारली असता खालील भागात एका ठिकाणी खडकांना चुना फसलेला दिसुन येतो. या ठिकाणी छोटीशी कपार असुन या कपारीत एका शिवपिंडीची स्थापना केलेली दिसते व कपारीबाहेर अजुन दोन शिवपिंडी दिसुन येतात. गड छोटा असल्याने संपुर्ण गडफेरी करण्यास एक तास पुरेसा होतो.या किल्ल्याचा सर्वप्रथम उल्लेख २८ जुलै १६८७च्या पत्रात येतो. काकती कर्यातीचा देसाई व हुकेरी परगण्याचा देसाई आलगौडा यांनी मोगलांच्या वतीने मराठयांकडील गंधर्वगड घेतल्याचा उल्लेख आहे. या कामासाठी मोगलांनी काकतीच्या देसाईना बेळगावची व हुकेरी देसायांना चंदगड व आजऱ्याची देशमुखी मनसब व एक हत्ती देण्याचे अमिष दाखविले होते. भारतातली पहिली स्त्री स्वातंत्र्यसैनिक कित्तूरची राणी चन्नमा यांचा जन्म बेळगावजवळील काकती गावात धुळाप्पा देसाई आणि पद्मावती यांच्या पोटी १७७८ साली झाला. चन्नम्मा यांनी संस्कृत, मराठी, कन्नड आणि उर्दू भाषांचे ज्ञान अवगत केले. घरातच त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्याशिवाय घोडेस्वारी, अस्त्र-शस्त्र विद्या आणि युद्धकलेचे शिक्षणही त्यांनी घेतले. पुढे कित्तूरचे राजा मल्लसर्जा यांच्याशी तिचा विवाह झाला. राजा मल्लसर्जा यांचे १८१६ मध्ये निधन झाल्यावर चन्नमेने आपल्या मुलाचा राज्याभिषेक करून दिला पण तिच्या मुलाचाही १८२४ साली मृत्यु झाला आणि इंग्रजांना कित्तूरचं राज्य घशात घालण्याची संधी मिळाली. पण चन्नमाने शिवलिंगप्पा याला दत्तक घेऊन त्याच्या राज्याभिषेक केला. ब्रिटीशांनी दत्तकपत्र नामंजूर करून कित्तूर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. चन्नमाला हे मान्य नसल्याने तिने लढण्याची तयारी केली. ब्रिटीशांच्या प्रचंड फौजफाट्याला न घाबरता तिने स्वत:चं सैन्य उभं केलं. २३ ऑक्टोबर १८२४च्या लढाईत धारवाडचा कलेक्टर थॅकरे मारला गेला पण चन्नमेची ही लढाई फार काळ चालली नाही. दीड महिन्यांत ३ डिसेंबरला १८२४मध्ये चन्नमा पकडली गेली आणि कित्तूरचे राज्य बेळगाव जिल्ह्याला जोडले गेले. चन्नमा राणीला बंदी बनवुन बैलहोनंगळच्या किल्ल्यात नजकैदेत पाठवलं आणि तिथेच तिचा २१ फेब्रुवारी १८२९ साली मृत्यु झाला. -------------- सुरेश निंबाळकर

जिल्हा - बेळगाव 
श्रेणी  - सोपी   
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग