​जिल्हा - ठाणे  
श्रेणी  - अत्यंत कठीण 
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग

भैरवगड- मोरोशी

सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकाने बाहेर आलेल्या लाव्हारसाने झाली आहे. या लाव्हारसाचे थंड होताना विशिष्ट प्रकारे साठण्यामुळे बेसॉल्ट खडकाच्या विविध आकाराच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार होतात. भूगर्भशास्त्राच्या परिभाषेत अशा रचनेला डाईक म्हणतात. ही रचना आपल्याला भैरवगडावर पहायला मिळते. भैरवगडाचा बालेकिल्ला अशाच एका डाईकवर म्हणजे बेसॉल्ट खडकाच्या ४०० फूट उंच सरळसोट भिंतीवर बनवलेला आहे. बालेकिल्ल्याची रचना व त्यामागची कल्पकता पहातांना आपण थक्क होऊन जातो. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात माळशेज घाटाच्या अलीकडे मोरोशी गाव आहे. या गावामागे माळशेजच्या मुख्य डोंगर रांगेपासून बाहेर आलेल्या डोंगरावर भैरवगड किल्ला आहे. या गडाच्या माचीपर्यंत सहजपणे जाता येते पण गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी मात्र गिर्यारोहणाचे सामान व गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे. भैरवगडला जाण्यासाठी मुंबई-कल्याण-मुरबाड मार्गे माळशेज घाटाच्या अलीकडचे मोरोशी गाव गाठावे. मोरोशी गावाकडून महामार्गावरून माळशेजच्या दिशेने जातांना पोलिस चेकपोस्टच्या पुढे साधारण १०० मिटरवर डाव्या बाजुला मोरोशी गावात जाणारा दुसरा रस्ता असुन उजव्या हाताला वनखात्याने किल्ले भैरमगड गुंफा मार्ग वनविभाग ठाणे असे लिहिलेली लोखंडी कमान आहे. या कमानीखालुन जाणारी वाट डोंगरउतारावरील शेतांमधून समोरील टेकडाकडे जाते. येथून डाव्या बाजूने समोरची टेकडी चढायला सुरुवात करावी. दोन टेकड्या पार केल्या की आपण एका छोट्या पठारावर पोहोचतो व पुढील एक टप्पा पार केल्यावर आपण थेट किल्ल्याच्या माचीवर पोहोचतो. गडाकडे जाणारी हि वाट रुळलेली असुन न चुकता आपण थेट गडाच्या माचीवर पोहोचतो. पायथ्यापासुन माचीवर यायला १.५ ते २ तास लागतात. माचीवर प्रवेश करताना आपल्याला गडाचा दरवाजा व तटबंदीसाठी कातळात खोदलेल्या खुणा दिसतात तसेच माचीच्या उजव्या बाजुला काही वास्तुंचे अवशेष दिसतात. माचीवरून बालेकिल्ल्याकडे जाताना वाटेत सिमेंटमध्ये बांधलेले घरांचे चौथरे दिसतात. गडाच्या माचीवर २००५पर्यंत आठ-दहा घरांची वस्ती होती पण नंतरच्या काळात हि वस्ती गडाखाली आली. वाटेच्या पुढील भागात डाईकच्या पायथ्यापर्यंत दाट जंगल आहेत. गडावर मुक्काम करायचा झाल्यास येथेच तंबू ठोकता येतात. गडावर असणारे इतर अवशेष व पाण्याचे स्त्रोत या झाडीत लुप्त झाले आहेत. माचीवरुन डाईकच्या पायथ्याशी पोहोचण्यास १५ मिनीटे लागतात. इथे पायवाटेच्या वर उजव्या बाजूला कातळात कोरलेली एक आयताकृती गुहा दिसते परंतू या गुहेत जाण्यासाठी गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो. तिथेच पायवाटेच्या वरच्या बाजूला गुहेत कोरलेले दोन दरवाजे असलेले पाण्याच टाक आहे. गडावर पिण्याच्या पाण्याचा हा एकमेव स्त्रोत आहे. याच पाऊल वाटेने पुढे आपण बालेकिल्ल्याच्या पूर्व टोकापाशी पोहोचतो. येथे साधारण १५ फूट उंचीवर कातळात अर्धवट खोदलेली आयताकृती गुहा आहे. या गुहेत जाण्यासाठी सुध्दा गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो. बालेकिल्ल्याच्या पूर्व टोकाला वळसा घालुन आपण भैरवगड व बाजूच्या डोंगरामधील खिंडीत पोहोचतो. हि सर्व वाट चढाची व घसाऱ्याची असल्याने माचीपासून या खिंडीत यायला ४५ मिनीटे लागतात. खिंडीतील या बाजूने किल्ल्यावर जाण्यासाठी दगडात पायऱ्या कोरलेला एकमेव मार्ग आहे परंतु बऱ्याच ठिकाणी या पायऱ्या तुटलेल्या आहेत. जवळपास ८० अंशाची उभी चढाई आणि तुटलेल्या पायऱ्यांमुळे किल्ल्यावर जाणारी वाट धोकादायक झाली आहे. साधारण ४० पायऱ्या चढल्यावर आपण कातळात खोदलेल्या एका टाक्यापाशी पोहोचतो. सुरुंग लावुन गडाच्या पायऱ्या तोडताना या टाक्याच्या तळाला छिद्र पडले आहे व त्यातून सरपटत आत जाता येते. ८ x ४ x ८ फुट लांबीरुंदीच्या या टाक्याच्या मागील भिंतीत लाकडी वासे अडकवण्यासाठी खोबण्या आहेत. हि टाकी कड्याच्या पोटात उघडयावर असल्याने पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये यासाठी या खोबणीत वाशे रोवुन त्यावर छप्पर घातले जात असे. गुहेच्या पुढील भागातील पायऱ्या उध्वस्त झालेल्या असल्याने या पुढील भागात दोर लाऊन वर चढावे लागते. हा साधारणत: १०० फूटाचा भाग पार केल्यावर पुढे कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. या पायऱ्याच्या एका बाजूला कातळकडा व दुसऱ्या बाजूला खोल दरी असुन पायऱ्यावर मुरूमाची माती साठलेली असल्याने जीव मुठीत घेऊन जावे लागते. या पायऱ्या चढताना एका ठिकाणी दरवाजाचे तळाचे अवशेष दिसुन येतात. काही पायऱ्या चढुन गेल्यावर उजव्या बाजूला कड्याला लागून खडकात खोदलेले अजुन एक २० x १० x १५ फुट लांबीरुंदीचे अजुन एक कोरडे टाके दिसते. पायऱ्या संपल्यावर आपण एका छोट्या उंचवट्यावर पोहोचतो. हे डाईकचे म्हणजेच बालेकिल्ल्याचे गोलाकार पश्चिम टोक असुन येथे ढालकाठीची जागा व एका लहानशा चौकीचे अवशेष दिसतात. ते पाहून डाव्या बाजूच्या वाटेने वर चढायला लागावे. वाटेत अजून एक कोरडे पडलेले पाण्याचं टाकं लागत. या टाक्याच्या पुढे जाताना वळणावर अजुन एका वास्तूचे अवशेष दिसतात. यापुढील वाट निवडूंगाच्या जाळीतून गडाच्या सर्वोच्च टोकावर पोहोचते. गडमाथ्यावर मोठया प्रमाणात सुकलेले निसरडे गवत असुन वावरताना काळजी घ्यावी. खिंडीतून इथवर येण्यास १ तास लागतो. गडमाथा अतिशय चिंचोळा ४५० x ६० फुट आकाराचा असून पूर्व-पश्चिम साधारण अर्धा एकरवर पसरलेला आहे. गडमाथ्यावर पाण्याचे एक टाके व दोन चौथरे या व्यातिरिक्त कोणतेही अवशेष नाहीत. गडाच्या माथ्यावरून पश्चिमेला नाणेघाटाचे टोक ते पूर्वेला हरीश्चंद्रगड असा विस्तृत प्रदेश दिसतो. किल्ल्याचा आकार व रचना पहाता या किल्ल्याचा उपयोग या परिसरावर लक्ष ठेवण्यास व टेहळणीसाठी होत असावा. १८५७च्या उठावानंतर इंग्रज कर्नल प्रोर्थर याने या गडावर जाणाऱ्या पायऱ्या सुरूंग लावुन फोडल्या. भैरवगडाचं हे थरारक सौंदर्य व आव्हान एकदा तरी अनुभवायला हव असंच आहे. भैरवगडचा इतिहासात उल्लेख असला तरी भैरवगड हे नाव अनेक गडांना असल्याने इतिहासात त्याचा नेमका संदर्भ लावणे कठीण जाते.-----सुरेश निंबाळकर