मुंबईत असलेल्या किल्ल्यामध्ये सर्वात पुरातन किल्ला म्हणजे माहीमचा किल्ला होय. हा किल्ला पोर्तुगीज, ब्रिटिश किंवा मुसलमानांनी बांधलेला नाही. मुंबईच्या पूर्व-पश्चिम किनाऱ्याना जोडणाऱ्या व माहीमच्या खाडीचे रक्षण करणाऱ्या ह्या किल्ल्याला जलमार्गाचा द्वाररक्षक म्हणून ओळखले जात होते. ह्या किल्ल्याच्या दक्षिणेला वरळी असून उत्तरेला वांद्रे आहे. मुंबईच्या बेटांना मुख्य भूमीपासून विभक्त करणाऱ्या महकावती उर्फ माहीमच्या खाडीच्या मुखावर इ.स ११४० मध्ये प्रतापबिंब राजाने माहीमचा किल्ला बांधला. प्रतापबिंबाच्या सुरुवातीच्या राज्यकाळातच त्याला त्याच्या शत्रूंनी केळवे माहिम प्रांतातून हुसकावून लावल्यावर त्याने साष्टीच्या दक्षिण टोकाशी असलेल्या बेटावर दुसरे माहिम निर्माण करून तेथे हा किल्ला बांधला आणि आपली राजधानीही येथे वसवली. या ठिकाणी नाना जातीच्या व नाना प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या लोकांना बोलावून व्यापार उदीम , शास्त्र व संस्कृतीची बीजे मुंबई बेटावर रुजवली. १३४६ ते १५३४ या कालखंडात हा किल्ला गुजरातच्या सुलतानांच्या ताब्यात होता. आता दिसत असलेल्या किल्ल्याचं बांधकाम हे बहुधा याच कालखंडात झालेलं आहे, त्यात पोर्तुगीजांनी व ब्रिटिशांनी आपापल्या गरजांनुसार फेरफार केले आहेत पण किल्ल्याच्या मूळ वास्तूत काही बदल झालेला नाही. इ.स. १५१६ मध्ये पोर्तुगीज अधिकारी दॉम होआव दे मोनो याने माहीमच्या खाडीत प्रवेश केला आणि माहीम किल्ला जिंकून घेतला. या किल्ल्याच्या ताब्यासाठी गुजरातच्या अली शाह आणि पोर्तुगीजांमध्ये खूप चकमकी झाल्या. शेवटी पोर्तुगीजांनी हा किल्ला इ.स. १५३४ मध्ये जिंकून घेतला. हाच किल्ला पुढे इ.स. १६६१ मध्ये पोर्तुगीजानी राजकन्येच्या लग्नात हुंडा म्हणून इंग्लंडच्या दुसऱ्या चार्ल्सला दिला. हा किल्ला ताब्यात असणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते कारण हाच किल्ला त्यांना पोर्तुगीजांच्या आणि नंतर मराठ्यांच्या आक्रमणापासून संरक्षण देऊ शकत होता. हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आल्यावर इंग्रज स्थापत्यकार जेरॉल्ड ऑगियर ह्याने सध्या अस्तित्वात असलेले फेरबदल केलेले आहेत. इ.स १६७२ मध्ये पोर्तुगिजांनी माहीमच्या किल्ल्यावर हल्ला केला. त्यावेळी किल्ल्यात १०० सैनिक व ३० तोफां होत्या, त्यामुळे पोर्तुगिजांना तो जिंकता आला नाही. त्यानंतर १४ फेब्रुवारी १६८९ रोजी जंजिऱ्याच्या सिध्दी याकूत खानाने २५०० सैनिकांनिशी मुंबईवर हल्ला केला. त्यावेळी माहीमचा किल्ला जिंकून त्याने वर्षभर या भागात धुमाकूळ घातला, लुटालुट केली त्यानंतर किल्ला परत इंग्रजांनी जिंकून घेतला. समुद्राच्या लाटा ज्या तटबंदीवर आदळतात त्याची केलेली बांधणी मात्र आपली स्थापत्यकला वाटत नाही. या किल्ल्यात आणि सभोवती असलेल्या झोपड्यांमुळे आत प्रवेश करणे शक्य नाही आणि सभोवतलच्या झोपड्पट्यांमुळे व सततच्या अतिक्रमणाने किल्ल्याची स्थिति दयनीय झाली आहे.

माहीम कोट 

​जिल्हा -मुंबई  
श्रेणी  - सोपी 
दुर्गप्रकार-सागरी किल्ला