रामदुर्ग

जत हा सांगली जिल्ह्यातील पूर्वेकडील तालुका. स्वतंत्रपुर्व काळात जत हे एक स्वतंत्र संस्थान होते. या संस्थाना अंतर्गत जत व डफळापूर ही दोन मोठी शहरे आणि ११७ खेडी समाविष्ट होती. जत व आसपासच्या परिसराचा मध्ययुगीन इतिहास म्हणजे जत संस्थानाचे राजे डफळे सरदार यांचा इतिहास. डफळापूरचे पाटील सटवाजी चव्हाण यांनी १६८०च्या सुमारास आदिलशाहीकडून जत, करजगी, बार्डोल आणि कणद यांची देशमुखी मिळवल्यावर डफळे राजघराणे व जत संस्थान उदयाला आले. स्वसंरक्षणा बरोबर प्रशासकीय कारभारासाठी त्यांनी संस्थानात काही गढ्या व अनंतपुर- रामदुर्ग यासारखे छोटे किल्ले बांधले. सतराव्या शतकात जत शहरापासुन काही अंतरावर असलेल्या रामपुर गावातील छोट्याश्या टेकडीवर सरदार डफळे यानी छोटेखानी रामदुर्ग किल्ला बांधला. या सपाट प्रदेशात ही एकमेव टेकडी असल्याने दुरवर नजर ठेवता येते. या भागात असलेली हि एकमेव टेकडी व जत संस्थानाशी असलेली या भागाची जवळीक पाहाता हा किल्ला प्रशासकीय व्यवस्थेसाठी बांधला असावा. जत तालुक्यात जत-कवठे महांकाळ रस्त्यावर असलेला हा किल्ला सांगलीपासून ७८ कि.मी.वर तर जतपासून अवघ्या ४ किमी. अंतरावर असलेल्या रामपूर गावात आहे. रामपुर फाट्यारुन गावात शिरल्यावर गावामागील टेकडीवर असलेला किल्ला व त्यावरील भगवा झेंडा दिसायला सुरवात होते. रामपुर गावामागे असलेल्या साधारण १५० फुट उंचीच्या टेकडीवर असलेला हा किल्ला १.५ एकर परिसरावर पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत एकुण ४ बुरुज असुन यातील एक बुरुज किल्ल्याच्या अंतर्गत भागात लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला आहे. रामपुर गावामागे असलेल्या पाण्याची टाकीपर्यंत खाजगी वाहनाने जाता येथे व तेथुन पाच मिनिटात आपण रामगडाच्या तटबंदीमध्ये बांधलेल्या पुर्वाभिमुख दरवाजात पोहोचतो. दरवाजाची कमान आजही शिल्लक असुन दरवाजा समोर दगडात काही पायर्‍या कोरलेल्या आहेत. कमानीवर कोणत्याही प्रकारचे नक्षीकाम अथवा शिल्प दिसून येत नाही. ओबडधोबड रचीव दगडांनी बांधलेली किल्ल्याची तटबंदी मोठ्या प्रमाणात ढासळली आहे. दरवाजाच्या विरुद्ध बाजुस टेकडीखाली एक घडीव दगडांनी बांधलेला तलाव असुन किल्ल्याची तटबंदी याबाजुने अगदी खालपर्यंत बांधत नेल्याचे दिसुन येते. या ठिकाणी एक लहान दरवाजा व खाली तलावाकडे उतरत जाणाऱ्या पायर्‍या दिसतात पण त्या मोठ्या प्रमाणात ढासळलेल्या असुन त्यावर बाभळीची काटेरी झुडपे वाढल्याने खाली उतरता येत नाही. दरवाजातून आत शिरल्यावर उजव्या बाजुस एक प्राचीन मंदिर दिसते. मंदिराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असुन मंदिराचे एकुण बांधकाम पहाता हे मंदीर किल्ला बांधण्याआधी पासुनच या टेकडीवर अस्तित्वात असावे. कधीकाळी सभामंडप व गाभारा असे दोन भाग असलेल्या या मंदिराचा आज केवळ गाभारा शिल्लक असुन त्यात नव्याने स्थापन केलेली शिवपिंड आहे. सभामंडपाचे चार कोरीव खांब आजही उभे असुन दरवाजावर गणेशशिल्प कोरले आहे. मंदिरासमोर तटबंदीला लागुनच भगवा झेंडा रोवलेला किल्ल्यावरील सर्वात उंच बुरुज आहे. या बुरुजावरुन दुरवरचा परीसर तसेच किल्ल्याचा दरवाजा व किल्ल्याचा संपुर्ण अंतर्गत भाग यावर लक्ष ठेवता येते. किल्ल्यावर फिरताना काही वास्तुंचे चौथरे तर काही ठिकाणी दगडांचा खच पडलेला दिसून येतो. किल्ल्यावर पाण्याची कोणतीही सोय नसुन किल्ल्याखाली असलेला तलाव किल्ल्याला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधला गेला असावा. किल्ल्याचा आकार लहान असल्याने अर्ध्या तासात संपुर्ण किल्ला पाहुन होतो.-------------सुरेश निंबाळकर

DIRECTION

जिल्हा - सांगली

श्रेणी  -  सोपी

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग