इतिहासात घडलेल्या घटनामुळे प्रत्येक किल्ल्याला त्याची एक ओळख मिळाली आहे पण काही किल्ले असे आहेत की त्यांच्यावर काही महत्वाच्या घटना घडल्याच नाहीत आणि घडल्या असल्यास इतिहासात त्याची नोंद नाही असे अनेक किल्ले आज विस्मृतीत गेले असुन उपेक्षित आहेत. अशाच अनेक गडापैकी एक गड किल्ले सोनगड. पर्वतगड आणि सोनगड हे जोडकिल्ले असुन एका खिंडीने वेगळे झाले आहेत. यातील सोनगड हा चिंचोळा माथा असणारा लहान आकाराचा किल्ला तर पर्वतगड हा मोठया विस्ताराचा किल्ला आहे. एक दिवसाच्या भेटीत हे दोनही किल्ले सहजपणे पाहुन होतात. नाशिकहून फक्त ५०कि.मी.तर सिन्नरहुन दापूरमार्गे केवळ २६ कि.मी.अंतरावर असणाऱ्या या गडाकडे गिरीमित्रांचे पाय वळत नाहीत. सतत उपेक्षित राहिलेल्या या गडांची माहिती सहजतेने सापडतही नाही. सोनगड हा किल्ला भोजापुर गावांच्या मागे डोंगरावर उभा आहे. चिंचोळ्या माथ्याचा हा गड पुर्व-पश्चिम पसरलेला असुन गडाची पायथ्यापासुन उंची १००० फुट आहे. गडाची लांबी रुंदी ४०० x १०० फुट असुन गडाचे माथ्यावरील एकूण क्षेत्रफळ एक एकरपेक्षा कमी आहे. सिन्नरपासुन २५ कि.मी.अंतरावर भोजापुर गाव आहे. भोजापुरच्या पुढे ३ कि.मीवर कासारवाडी गाव आहे. या दोनही गावातुन सोनगडावर एका तासात जाता येते. भोजापुर गावातून कासारवाडी गावाकडे जाताना कासारवाडी फाटा येण्यापुर्वी वाटेत एक हनुमान मंदीर आहे. या मंदिरासमोरून उजव्या हाताला जाणारा रस्ता सोनगडाकडे जातो. हा रस्ता खुपच खराब असल्याने गाडी वाटेतील दर्गा अथवा शाळेकडेच ठेवावी व शाळेतील नळावरून पिण्याचे पाणी भरून घ्यावे. गडावर पाण्याची तीन टाकी असली तरी त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. येथुन समोरच माथ्यावर खंडोबाचे देऊळ असणारा छोटा सोनगड दिसतो. गाडी ठेवुन दर्ग्याच्या बाजूने जाणाऱ्या वाटेने सोनगड समोर ठेवत १५ मिनिटे चढल्यावर आपण सोनगडच्या सुळक्याच्या खालील पठारावर येतो. या पठारावर आपल्याला उध्वस्त घरांचे चौथरे दिसुन येतात. यातील एका चौथऱ्यावर एक शिवपिंडी व तिच्यालगत नंदी ठेवला आहे. या पठारावरून उजव्या बाजूची वाट पर्वतगडला जाते तर सरळ जाणारी वाट सोनगडवर जाते. या पठारावरून अर्ध्या तासात गडाच्या माथ्यावर जाता येते. सोनेवाडी गावातून खिंडीतून येणारी वाट येथेच येते पण ती थोडी लांबची व गैरसोयीची आहे. पठारावरून गडावर चढाई करताना सर्वप्रथम कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढत मधेच पायवाट परत पायऱ्या असे करत आपण गडाच्या सुळक्याखाली पोहोचतो. वाटेत एका ठिकाणी पादुका कोरलेले दोन दगड नजरेस पडतात. सुळक्याखालुन वर पहिले असता आपल्याला गडाची तटबंदी दिसुन येते. कोसळणारी तटबंदी सावरण्यासाठी तटबंदीच्या खाली एक भलामोठा ओंडका ठेवलेला आहे. येथे कड्यात पायऱ्या कोरलेल्या असुन शेजारील कपारीत दगडाला शेंदुर फसलेला आहे. येथे गडाचा मुख्य दरवाजा असण्याची शक्यता आहे. या ठिकाणाच्या वरील बाजुस उजव्या हाताला कड्यालगत पाण्याची दोन टाकी खोदलेली दिसतात. थोडे सांभाळूनच तेथे जावे लागते. टाक्याकडून पंधरा-वीस फुट चढुन आल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. येथे समोरच डौलाने फडकणारा भगवा ध्वज व पांढऱ्या रंगात रंगविलेले मंदीर असुन आत खंडोबाची मुर्ती आहे. मंदिराच्या बाहेर पडझड झालेले बांधकाम असुन त्यात एक गंजलेला लोखंडी नगारा व अलीकडील काळातील एक दगडी मानवी शिल्प आहे. या शिल्पासमोर दोन लहान नंदी ठेवलेले आहेत. मंदीराच्या मागे भलेमोठे कातळात खोदलेले पाण्याचे टाके असुन टाक्यात पाणी जमा करण्यासाठी कातळात चर खोदलेले आहेत. येथुन समोर जाणारी वाट किल्ल्याच्या सोंडेकडे जाते. येथे कधीकाळी तोफ असल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसुन येतात. गडाची तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वार अस्तित्वात नसले तरी त्यांचे अस्तित्व मात्र जाणवते. समोरच पर्वतगडाचे पठार दिसुन येते. हा गडाचा सर्वोच्च भाग असुन असुन येथुन भोजापुर धरण व दूरवरचा प्रदेश दिसतो. संपुर्ण गडफेरी करण्यास पंधरा मिनीटे पुरतात. सोनगडाचा वापर केवळ टेहळणी करीता होत असावा. हे सर्व पाहुन आल्यावाटेने खाली उतरावे व पठारावरून पर्वतगडाकडे निघावे. इतिहासाची पाने चाळली असता या किल्ल्याबाबत काहीही माहिती मिळत नाही. सोनगडच्या पायथ्याशी शाळा व दर्गा असून शाळेत पाण्याची टाकी व नळ असल्याने येथे निवासाची सोय होऊ शकते. ------सुरेश निंबाळकर

सोनगड

​जिल्हा - नाशिक 
श्रेणी  - मध्यम   
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग