वर्धा जिल्हा म्हटले कि आपल्याला आठवते महात्मा गांधी यांचे सेवाग्राम पण विदर्भातील या वर्धा जिल्ह्यात एकेकाळी बरेच किल्ले गिरीदुर्ग, भुईकोट व गढी स्वरुपात अस्तित्वात होते. वर्धा जिल्ह्यातील किल्ल्यांची शोधयात्रा करताना आम्हाला एकुण १० कोट अवशेष रुपात पहायला मिळाले. आजच्या संगणक युगात आंतरजालावरही या किल्ल्यांची माहिती दिसुन येत नाही. या किल्ल्यांचा दौरा केला असता मिळालेली माहिती मी दुर्गभरारी या संकेतस्थळावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यातील बऱ्याच गढी पुर्णपणे नष्ट झाल्या असुन केवळ तटबंदीची एखादी भिंत अथवा एखादा बुरुज वा दरवाजा असे उर्वरित अवशेष काळाशी झुंज देत आहेत. या १० किल्ल्यात २ गिरिदुर्ग १ सराई तर उरलेल्या ७ गढी आहेत. यातील बहुतांशी गढीकोटात गाव, मंदिरे वा दर्गा असल्याने या वास्तुनीच या कोटांच्या अवशेषांचा घास घेतला आहे तसेच स्थानिकांचे या वास्तु बद्दलचे अज्ञान व उदासीनता देखील या कोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. संस्थाने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत तर काही पार जमीनदोस्त झाले आहेत. देवळी तालुक्यातील मलकापुर गावात असलेल्या गढीची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. मलकापुर येथील गढीला भेट देण्यासाठी आपल्याला वर्धा किंवा पुलगाव शहर गाठावे लागते. वर्धा ते मलकापुर हे अंतर २३ कि.मी. आहे तर पुलगाव ते मलकापुर हे अंतर फक्त ९ कि.मी.आहे. पुलगाव येथुन मलकापुरला जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध आहेत. मलकापुर बस थांब्यावर उतरून गढी पहिल्या वाडीच्या शेवटी व दुसऱ्या वाडीच्या सुरवातीला असुन गोपालकृष्ण मंदिराची चौकशी करत गढीपर्यंत पोहचता येते. चौकोनी आकाराची हि गढी अर्धा एकर परिसरावर पसरली आहे. चार टोकाला चार बुरुज अशी रचना असलेल्या या गढीचा आज केवळ दक्षिणपुर्व दिशेचा १५-२० फुट उंचीचा एकमेव बुरुज व त्याला लागुन काही तटबंदी शिल्लक आहे पण ती किती काळ शिल्लक राहील ते सांगता येत नाही. गढीच्या आतील वास्तु पुर्णपणे भुईसपाट झाल्या असुन गढीच्या आवारात असलेले गोपालकृष्ण मंदिर व त्याशेजारील विहीर हि गढीत होती कि गढीबाहेर ते नक्की सांगता येत नाही. मुळ गढी मालकाने गढी खत्री या गावाबाहेरील इसमाला फार पुर्वी विकली असल्याने गढीचा नेमका इतिहास सांगण्यास कोणीच उपलब्ध नाही. एका बुरूजाशिवाय गढीचा कोणताही अवशेष शिल्लक नसल्याने गढी पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो.------------------सुरेश निंबाळकर

मलकापुर

जिल्हा - वर्धा
श्रेणी  -  सोपी
दुर्गप्रकार- भुईकोट