कोकणच्या पुर्व बाजुस असलेल्या सहयाद्रीच्या पर्वत रांगेत घाटमाथ्यावरून कोकणात उतरण्यासाठी अनेक घाटमार्ग असुन या घाटमार्गावर अनेक किल्ले वसलेले आहेत. यातील काही किल्ले शिवकालीन तर काही किल्ले त्याहुन प्राचीन आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात असलेले पन्हाळेकाझी गाव येथील कोरीव लेणीसमुहांसाठी प्रसिद्ध आहे पण याच गावात असलेला पद्मनाभदुर्ग, पन्हाळदुर्ग, प्रणालकदुर्ग अशा विविध नावानी ओळखला जाणारा प्राचीन दुर्ग मात्र तितकाच अपरीचीत आहे. पन्हाळेकाझी गावाला किल्ल्याचा ऐतिहासिक तर लेण्यांचा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. कोटजाई नदीच्या काठावर वसलेलं हे एक नितांत सुंदर गाव असुन येथील परिसर हिरव्यागर्द वनराईने समृद्ध आहे. हा संपुर्ण परीसर फिरण्यासाठी किमान एक दिवस तरी हाताशी हवा. खेड अथवा दापोली या दोन्ही ठिकाणाहुन पन्हाळेकाझी हे गाव साधारण ३० कि.मी.अंतरावर असुन खेडहून आल्यास वाकवली-फणसू मार्गे आपण किल्ल्याच्या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या लेणी समुहाजवळ येतो तर दापोली-दाभोळ मार्गाने आल्यास तेरेवायंगणी-गव्हाणे मार्गे आपण थेट किल्ल्याजवळ असलेल्या झोलाई मंदिरापाशी पोहोचतो. मुख्य मार्गापासुन या दोन्ही मार्गांनी पन्हाळेकाझी गाव १८ कि.मी.आत असुन रस्त्याची अवस्था अतिशय बिकट आहे. सोबत खाजगी वाहन असल्यास आपण थेट किल्ल्याजवळ असलेल्या झोलाई मंदिराच्या टेकडीवर जाऊ शकतो. झोलाई मंदीर असलेली टेकडी व किल्ल्याची टेकडी यांची उंची थोडयाफार फरकाने एकच असुन या दोन्ही टेकड्या एका लहान खिंडीने एकमेकांपासुन वेगळ्या झाल्या आहेत. झोलाई मंदीर नव्याने बांधलेले असुन या मंदिराच्या आवारात आपल्याला प्राचीन मंदिराचे काही अवशेष पहायला मिळतात. मंदिराकडे येणाऱ्या १५-२० पायऱ्या बांधताना मुळ मंदिराच्या काही कोरीव नक्षीदार दगडांचा वापर केला गेला आहे. मंदिराच्या दरवाजासमोर असलेली टेकडी म्हणजेच प्रणालकदुर्ग. मंदिराकडून खाली खिंडीत उतरताना आपल्याला वाटेत माती भरून बुजत चाललेली पाण्याची तीन टाकी पहायला मिळतात. कदाचित या टाक्यातील दगड प्राचीन मंदिराच्या बांधकामासाठी काढण्यात आला असावा. किल्ल्याकडे जाण्याच्या उत्साहात या टाक्यांकडे सहजपणे लक्ष जात नाही. खिंडीत उतरल्यावर आपल्याला हि खिंड पार करण्यासाठी दोन्ही बाजुस बांधलेल्या सिमेंटच्या पायऱ्या दिसतात. टेकडीच्या दोन्ही बाजुस असलेल्या गावात ये-जा करण्यासाठी हि जुनी पायवाट होती पण आता दोन्ही गावांना जोडणारा डांबरी रस्ता झाल्याने या पायवाटेचा वापर कमी झाला आहे. खिंडीत आल्यावर समोरील टेकडीच्या दिशेने चढायला सुरवात केल्यावर दोन वाटांनी आपल्याला टेकडीच्या माथ्यावर जाता येते. पहिली वाट म्हणजे आपली वाट आपण बनवत उभा चढ चढुन पाच मिनिटात किल्ल्याच्या माथ्यावर प्रवेश करावा किंवा टेकडी उजवीकडे ठेवत मळलेल्या वाटेने सरळ पुढे निघावे. या दुसऱ्या वाटेने जाताना उजवीकडे टेकडीच्या माथ्यावर असलेली पडझड झालेली तटबंदी काही प्रमाणात पहायला मिळते. या वाटेने १० मिनिटाची वाटचाल केल्यावर गावातुन आलेली मळलेली पाऊलवाट उजवीकडे टेकडीवर जाताना दिसते. या वाटेने उजवीकडे टेकडीच्या दिशेने वळल्यावर एकावर एक दगड रचलेले बांधकामाचे अवशेष नजरेस पडतात. या बांधकामाच्या उजव्या बाजुस कातळात कोरलेले चार खांब असलेले एक मोठे पाण्याचे टाके आहे पण हे टाके मोठया प्रमाणात गाळाने भरलेले आहे. या टाक्याच्या डाव्या बाजुस आलेल्या उध्वस्त पायऱ्यांच्या वाटेने तुटलेल्या तटबंदी वरून आपण गडमाथ्यावर पोहोचतो. माथ्यावर जाताना या भागात असलेली तटबंदी दोन टप्प्यावर बांधलेली दिसुन येते. झोलाई मंदिरापासुन इथवर येण्यास १५ मिनिटे पुरेशी होतात. गडाचा माथा समुद्रसपाटीपासून २७० फुट उंचावर असुन दक्षिणोत्तर साधारण दोन एकरवर पसरला आहे. गडमाथ्यावर पुर्वी शेती केली जात असल्याने बहुतांशी अवशेष नष्ट झाले आहेत. गडमाथ्यावर १९९४ साली गावकऱ्यांनी सिमेंटच्या चौथऱ्यावर शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा बसवलेला असुन गडावरील अवशेष या पुतळ्याशेजारी ठेवलेले आहेत. पुतळ्याच्या मागील बाजुस एक दगडी बांधकामातील चौथरा असुन आसपास आपल्याला एक दगडी चाक(जाते), चार फुट लांबीची घडीव दगडी शिळा व काही कोरीव दगड पहायला मिळतात. गडावर फिरताना काही ठिकाणी घराच्या पायाचे अवशेष तसेच जागोजागी भाजलेल्या विटांचे व खापराचे तुकडे दिसतात. गडाची तटबंदी मोठया प्रमाणात ढासळलेली असल्याने मुख्य दरवाजा नेमका कुठे असावा याचा बोध होत नाही. गडफेरी करण्यास अर्धा तास पुरेसा होतो. गड पाहुन झाल्यावर आल्या वाटेने अथवा पुतळ्याच्या समोरील बाजूने खिंडीत उतरुन झोलाई मंदिराकडे आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. किल्ला पाहुन झाल्यावर खाली कोटजाई नदीकाठावर असलेला लेणीसमुह आवर्जुन पहावा. दालभ्य ऋषींशी नाते सांगणारे दाभोळ हे कोकणातील प्राचीन बंदर आहे. दाभोळचा किल्ला आजही अस्तित्वात असुन दाभोळ खाडीजवळील टेकडीवर असलेल्या चंडीका मंदीर परिसरात हा किल्ला आहे. मध्ययुगीन काळापर्यंत दाभोळ बंदरात उतरणारा माल विविध मार्गानी घाटावर जात असे. आदिलशहाच्या ताब्यात असलेल्या या दाभोळ बंदरातुन थेट विजापुरपर्यंत व्यापार चालत असे पण किल्ल्याचे बांधकाम व परीसरात असलेली लेणी प्रणालकदुर्गाची निर्मिती त्यापुर्वीची असल्याचे दर्शवितात. शिलाहार राजा अपरादित्य (११२७-११४८) याने दुसऱ्या जमकेशीचा पराभव करून आपला पुत्र विक्रमादित्य याला प्रणाल या राजधानीच्या शहरी दक्षिण कोकणचा अधिपती बनवले. त्याने १२ व्या शतकात हा किल्ला बांधला असावा. शिवकाळात व त्यानंतर या किल्ल्याचे कोणतेच उल्लेख नसुन हा किल्ला नंतरच्या काळात ओस पडला असावा. -----------सुरेश निंबाळकर

पद्मनाभदुर्ग/प्रणालकदुर्ग

जिल्हा - रत्नागीरी

श्रेणी  -  सोपी

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग