​​​​​​​जिल्हा - रत्नागिरी 
श्रेणी  - कठीण   
दुर्गप्रकार - जलदुर्ग

सुवर्णदुर्ग

महाराष्ट्राच्या निसर्गसंपन्न अशा कोकण किनारपट्टीवर सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग हर्णे बंदरापासून साधारणपणे १ किमी अंतरावर समुद्रात असलेल्या V आकाराच्या बेटावर बांधलेला आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गाच्या रक्षणासाठी हर्णेच्या किनाऱ्यावर कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवा गड या तीन उपदुर्गांची साखळी उभी ठाकलेली आहे. मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या खेड फाटयावरून दापोली गाठायचं. पुढे दापोलीहून हर्णे बंदराकडे जाण्यासाठी एस.टी.बस उपलब्ध आहे. हर्णे बसस्थानकावरून १०-१५ मिनिटांत हर्णे बंदर गाठता येतं. ऐन सागराच्या कुशीत वसलेल्या या जलदुर्गावर आज पिण्याचं पाणी उपलब्ध नसल्याने सोबत पाणी घेऊन जावं. किल्ल्यावर जाण्यासाठी नियमित बोटसेवा नाही पण बंदरावरुन किल्ल्यात जाण्यासाठी स्थानिक मच्छीमार संघटनेने छोटया नौका ठेवल्या आहेत. होडीतून सुवर्णदुर्गावर जाण्यासाठी साधारण २० मिनिटं लागतात. होडीतून जाऊन येण्यासाठी माणसी ६०-७० रुपये आकारले जातात. सुवर्णदुर्गावर उतरण्यासाठी धक्का नसल्याने सुवर्णदुर्गाच्या किनाऱ्यावर गुडघाभर पाण्यात उतरावं लागतं. इथली पांढरीशुभ्र वाळू तुडवत किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचायचं. दरवाज्यासमोर वाळूची पूळण व त्यात पडलेल्या दोन तोफा आहेत. दरवाजाला अधिक संरक्षण देण्यासाठी केलेल्या बांधकामाचे अवशेषही दरवाज्याच्या अलिकडे आहेत. किल्ल्याचा मुख्य दरवाजा गोमुखी पद्धतीचा आहे. हा दरवाजा जरी उत्तराभिमुख असला तरी तो पूर्वेकडील बाजूस आहे. ही रचना शिवकालीन आहे. महाद्वाराजवळ पोहोचताच पायरीवर कोरलेलं कासवाचं शिल्प नजरेस पडतं तर उजव्या बाजूला तटबंदीवर अलीकडच्या काळात कोरलेली हनुमानाची मुर्ती आहे. प्रवेशद्वारातून आत शिरताच दोन्ही बाजुस पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. या देवड्यांच्या दोन्ही बाजूने तटबंदीवर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. किल्ल्याचा एकूण परिसर साधारणत 8 एकर इतका आहे. किल्ल्याला एकूण १५ बुरुज असून किल्ल्याची तटबंदी आजही सुस्थितीत आहे. किल्ल्यावर पाणी पुरवठ्यासाठी विहीरी व पावसाचे पाणी साठवणारा तलाव आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या बाजूच्या तटाजवळ विहीर आहे. तेथून पुढे आल्यावर राजवाड्याचे अवशेष व दोन कोठारे लागतात. तर किल्ल्याच्या दक्षिणेकडे भक्कम बांधणीचं कोठार आहे. सुवर्णदुर्गाच्या भक्कम तटबंदीवरुन हिरवं पाणी असलेले तलाव आणि पडझड झालेले वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. दुर्गाच्या पश्चिम तटाकडे एक सुरेख चोरदरवाजा आजही सुस्थितीत असलेला दिसतो या दरवाज्याने थोडं खाली उतरलो की दहा फूट खोल किल्ल्याचा पायथा उरतो. जवळच तटाला लागून पावसाचे पाणी साठवण्याचा तलाव आहे. किल्ल्याच्या नैऋत्य टोकावरील बुरुजावरुन हर्णेच्या किनाऱ्यावरील कनकदूर्ग, फत्तेगड व गोवा किल्ला हे किल्ले दिसतात. किल्ल्याच्या वायव्य टोकावर पाण्याच टाक, दारुचे कोठार व उध्वस्त वास्तु आहे. गडावर एक विहीर,एक हौद आणि चार तलाव आहेत पण कुठेही मंदीर नाही. याचा मागोवा घेतल्यावर कळते की कान्होजी आंग्रेची कुलदेवता कलंबिका देवी इतिहासकाळात सुवर्णदुर्गावरुन हलवून अलिबागच्या हिराकोटामध्ये प्रस्थापित केली होती. किल्ल्याच्या सभोवार असणारा खडक समुद्राच्या पातळीत तासून सपाट केलेला आहे व मधल्या उंचवट्यावर किल्ला बांधला आहे. नुकतेच पुरातत्व खात्याने साफसफाई सुरु केल्यामुळे किल्ल्यामध्ये फिरणे काही प्रमाणात शक्य झाले आहे. दोन तीन वर्षापूर्वी आत पाय टाकणेही मुश्किल होते. तटबंदीवरुन कशीबशी फेरी मारावी लागायची. संपुर्ण किल्ला पहाण्यास दोन तासाचा अवधी गरजेचा आहे. शिलाहारांनी उभारलेला हा किल्ला १६व्या शतकात आदिलशहाकडे होता. १६६०च्या सुमारास मायनाक भंडारींना महाराजांनी हर्णे गावाजवळील सुवर्णदुर्ग जिंकण्याची मोहीम फर्मावली आणि महाराजांच्या आज्ञेवरून मायनाक भंडारी फौजेसह सुवर्णदुर्ग वर तुटून पडले त्यावेळी त्यांचा पुतण्या देखील त्यांच्या समवेत होता. समुद्राच्या उसळलेल्या या धुमश्चक्रीत मायनाक भडारींचा पुतण्या धारातीर्थी पडला पण मायनाक भंडारींनी सुवर्णदुर्ग स्वराज्यात दाखल केला. शिवरायांनी हा किल्ला ताब्यात आल्यावर आपले आरमार तेथे ठेवले. गडाची फेरउभारणी करुन बळकट करताना डागडुजीसाठी दहा हजार होन खर्च झाले. किल्ल्याचे लपवलेले प्रवेशद्वार ह्याची साक्ष देत उभे आहे. १६८८ मध्ये मोगल सरदार सिद्दी कासीमने सुवर्णदुर्गाला वेढा घातला. सुवर्णदुर्गाचा किल्लेदार अचलोजी मोहिते मोगलांना फितूर झाला. ही गोष्ट कान्होजी आंग्रे ह्या २० वर्षाच्या तरूणाला कळल्यावर त्याने रातोरात गडावरील सहकाऱ्याना विश्वासात घेऊन किल्लेदाराला कैद केले व सरळ किल्ल्याबाहेर पडून मोगलांवर हल्ला केला. पण हल्ला साफ फसला आणि कान्होजी आणि त्याचे सहकारी मोघलांच्या कैदेत पडले. कान्होजीने शिताफीने मोघलांच्या कैदेतून सुटका करून घेतली व पोहत सुवर्णदुर्ग गाठला. या घटनेमुळे त्यांच्या सहकाऱ्यात उत्साह संचारला व त्यांनी पावसाळ्यापर्यंत गड लढवला. मराठ्यांचा हा चिवटपणा पाहून सिद्दीने वेढा उठविला. या घटनेमुळे कान्होजी आंग्रे सुवर्णदुर्गाचा किल्लेदार बनला. पुढे पश्चिम किनाऱ्यावर कान्होजी आंग्रे यांची कारकिर्द सुरू झाली. इ.स.१६९६ मध्ये मराठय़ांच्या नौदलाचे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आरमाराचा तळ येथे होता. त्यानंतर १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात दिला. कान्होजी आंग्रे यांनी याच सुवर्णदुर्गाच्या बळावर सागरावर आपले वर्चस्व गाजविले. कान्होजींचा उत्तराधिकारी तुळाजी याच्या अधिपत्याखाली सुवर्णदुर्ग सत्तेचे एक केंद्र झाले. परंतु तुळाजी आंग्रे यांचे पेशव्यांबरोबर संबंध बिघडल्याने पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेवून तुळाजी आंग्रे यांच्या आरमाराचे वर्चस्व कमी करण्याचे ठरविले, त्यासाठी इंग्रजानी विल्यम जेम्स याला मोहिमेचा प्रमुख बनविले. रामाजी पंत पेशव्यांचा कल्याण येथील सरदार याच्या मदतीला देण्यात आला. त्यावेळी पेशव्यांचे सेनापती शिवाजी गवळी व खंडोजी मायनाक यांनी या मोहिमेला सहाय्य केले. या युध्दात सुवर्णदुर्गावर 50 तोफा सज्ज होत्या. कमांडर जेम्स 22 मार्च 1755 रोजी 44 तोफा आणि 16 बंदुका यांच्या सहाय्याने किल्ल्यावर चालून गेला. या मोहिमेत पेशव्यांचे 10 हजार सैन्य कमांडर जेम्सला जाऊन मिळाले होते. ही लढाई 25 मार्च 1755 ते 2 एप्रिल 1755 इतकी काळ चालली. या मध्ये तुळाजी आंग्रे यांचा पराभव झाला. इंग्रजांकडून कमांडर जेम्सने किल्ला जिंकून पेशव्यांच्या स्वाधीन केला पण ह्या मदतीसाठी इंग्रजांना बाणकोट किल्ला द्यावा लागला. १८०२ साली यशवंतराव होळकरांच्या भीतीने सैरावैरा पळणारा दुसरा बाजीराव काही काळ सूवर्णदूर्गाच्या सुरक्षित आश्रयाला राहिला, नंतर स्वत:चा कुटुंबकबिला तिथेच सोडून वसईला इंग्रजांच्या आश्रयाला गेला.होळकरानी त्याचा पाठलाग करून पेशव्यांचे कुटुंब ताब्यात घेतले. नोव्हेंबर १८१८ मध्ये कर्नल केनडी, कॅप्टन कॅपेल व लेफ्टनंट डॉमिनिसेट यांनी अवघ्या ५० शिपाई व ३० खलाशांनीशी हल्ला चढवून किल्ला ताब्यात घेतला. १८६२मध्ये सुवर्णदुर्गाच्या तटबंदीची दुरुस्ती केल्याचा उल्लेख इंग्रजी साधनांमध्ये आढळतो. इंग्रजांनी १९व्या शतकाच्या उत्तरार्धात येथुन तळ हलविल्यानंतर या किल्ल्यातील वास्तूंची पडझड झाली. इतिहासातील महत्त्वाचे प्रसंग अनुभवलेला सुवर्णदुर्ग आज मात्र संपूर्ण दुर्लक्षित अवस्थेत आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून इ.स. १९१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.