घटोत्कच लेणी

घटोत्कच लेण्या ह्या महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात जंजाळा गावी वसलेल्या बौद्ध लेण्या आहेत. अजिंठा लेण्यांकडे जाताना गोळेगावापासून डावीकडे पंधरा कि.मी.वर असलेल्या अंभई गावापासून पुढे बोरगावजवळ घटोत्कच लेणी आहेत. प्राचीन काळी येथे असणाऱ्या घटोत्कच गावामुळे या लेण्याला घटोत्कच हे नाव पडले असावे. जंजाळा गाव हे पठारावर वसलेले असुन गावाच्या उजव्या बाजूला घटत्कोच लेणी तर डाव्या बाजूच्या पठारावर जंजाळा किल्ला आहे. गडाच्या पूर्वेकडील दरीत ह्या लेण्या कोरलेल्या असुन लेणीत जाण्यासाठी पुरात्तत्व खात्याने पायऱ्या बांधल्या आहेत. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांपासून २८ किमी अंतरावर असूनही घटोत्कच लेणी दुर्लक्षित वाटतात पण सिमेंटच्या पायऱ्या आणि विहारांना लाकडी कवाड बांधली असल्यामुळे पुरातत्त्व खात्यानुसार लेणी अगदीच दुर्लक्षित नाही. मधोमध एक भव्य आणि प्रशस्त असं विहार, विहारात मोठमोठे खांब आणि त्याच्या दोन्ही बाजुला छोट्या छोट्या खोल्या असा घटोत्कच लेण्यांचा थाट आहे. पायऱ्या उतरल्यावर सर्वप्रथम उजव्या बाजुला सात नागफणा धारण केलेली एक मुर्ती पहायला मिळते. या मुर्तीच्या पुढे अजुन एक शिल्प आहे पण प्रचंड झिज झाल्याने ते ओळखू येत नाही. येथुन पुढे आपला प्रवेश लेण्याच्या दरवाजासमोर होतो. हे चैत्यगृह असुन त्याला आत जाण्यासाठी तीन दरवाजे आहेत. चैत्यगृहाच्या बाहेर उजव्या व डाव्या बाजुस दालने कोरलेली असुन उजव्या दालनाबाहेर अनेक बुद्धमुर्ती कोरल्या आहेत तर डाव्या दालनाबाहेर भिंतीवर वराहदेवचा शिलालेख कोरला आहे. पुरातत्व खात्याने थोड्याफार माहितीचा एक फलक येथे लावला आहे. लेण्यातील चैत्यागृहाचे दर्शनी दालन प्रशस्त असून त्याला २० अष्टकोनी स्तंभ आहेत. मधल्या दोन व कोपऱ्यातील दोन खांबांचा आकार व त्यावरील नक्षी इतरांपेक्षा वेगळी आहे. दालनाच्या डाव्या बाजूला अर्धस्तंभांवर बुद्धाची मूर्ती आणि ये धर्मा हेतुप्रभवः असा श्लोक आहे. मंडपाच्या मागील भिंतीत तीन गर्भगृह असुन मधील मोठया गाभाऱ्यात सिंहासनाधिष्ठित धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेतील बुद्धाची भव्य मूर्ती असून आसनाखाली हरणे व मधे धर्मचक्र आहे. उजवीकडे वज्रपाणी आणि डावीकडे पद्मपाणी यांच्या चामरधारी मूर्ती आहेत पण त्यांच्या हातात हातात कमळे दिसत नाही. उरलेले दोन लहान गाभारे रिकामे आहेत. या दालनात डाव्या बाजुस ७ तर उजव्या बाजुस ५ असे एकुण बारा लहान विहार खोदण्यात आले आहेत. दोन्ही बाजुच्या मधल्या विहारच्या दरवाजासमोर स्तंभ कोरलेले आहेत. चैत्यगृहातुन बाहेर आल्यावर पुढे डाव्या बाजुस तीन अर्धवट कोरलेले विहार आहेत तर उजव्या बाजुला खालच्या अंगास खडकात अर्धवट कोरलेले पाण्याचे टाके आहे पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. सन २०१३-१४ साली या टाक्यातील गाळ काढताना आतील बाजूस एक शिल्प उजेडात आले. या शिल्पात चार हरिणे असुन या चारही हरिणांच्या धडास एकच डोके दाखवले आहे. या लेण्याच्या समोरील बाजुस दरीच्या दुसऱ्या अंगास अर्धवट कोरलेल्या दुमजली गुहा दिसुन येतात. घटोत्कच लेणी अजंठा लेण्यांच्या तुलनेत लहान असली तरी पश्चिम महाराष्ट्रातील महायानपंथीय लेण्यातील पहिली व अत्यंत महत्वाची लेणी आहेत. मोठ्या लेण्यात व्हरांड्याच्या उत्तरेला वाकाटक राजा हरिषेणाचा मंत्री वराहदेव याचा बाविस ओळींचा ब्राम्ही लिपीतील एक खंडित शिलालेख आहे. त्याचा खालचा भाग अस्पष्ट झाला असून वरील भागात वराहदेवाची सुरुवाती पासूनची वंशावळ दिली आहे. या शिलालेखात अशमाकच्या राजकन्येचा उल्लेख आहे. वाकाटाक नरेशाचा मंत्री वराहदेव याने इ.स. ५ व्या शतकात हे विहार लेणे कोरण्यासाठी दान दिल्याचे समजते. अजिंठ्याच्या १६ आणि १७ क्रमांकाच्या गुंफा बांधल्या जात असताना वराहदेवाने अजिंठ्यापासून अकरा मैल अंतरावर घटोत्कच येथे देणगी देउन आणखी एका विहार उभारणीला सुरूवात केली. ही विहार-गुंफा जरी अपुरी राहिली असली तरी वाकाटक काळातील अजिंठा गुंफांचा अचूक कालक्रम ठरवण्यासाठी आणि दण्डीचा वृतान्त पडताळून पाहण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. वाकाटक राजा हरिषेण याच्या मृत्यूनंतर राज्यावर आलेल्या त्याच्या वारसदाराला मांडलीक राजांनी सिंहासनावरून पदच्युत केले. वाकाटक इतिहासातील या घटनेमुळे घटोत्कच येथील लेण्यांचे काम अर्धवट राहिले. या लेणीविषयी सर्वप्रथम कॅप्टन रोज यांनी लक्ष वेधले व श्री डब्ल्यू गुच ब्रॅडली यांनी या लेणीचे वर्णन केले. घटोत्कच लेणी पुरातत्व खात्याने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली असून सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग, औरंगाबाद यांच्या अखत्यारित आहे.--------------------------सुरेश निंबाळकर

जिल्हा - औरंगाबाद   
श्रेणी  -सोपी    
लेणीप्रकार - ​बौद्ध लेणी