हिराडोंगरी दुर्गास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनने सफाळे स्थानकास उतरावे.सफाळे स्थानकापासून दातिवरे येथे जाण्यास एसटी बस व खाजगी रिक्षा उपलब्ध आहेत.हिराडोंगरी दुर्ग सफाळे रेल्वे स्थानकापासून १६ कि.मी.तर मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वारई फाट्यापासून ३५ कि.मी.वर आहे. दातिवरे गावात २ कोट असल्याने स्थानिक लोक या दुर्गाविषयी सांगताना जागेची गल्लत करतात. दुसरा कोट म्हणजे दातिवरे कोट जो गावामध्येच भर वस्तीत आहे आणि हिराडोंगरी दुर्ग जो गावाबाहेर टेकडी स्वरुपात आहे.हिराडोंगरी दुर्गाची स्थाननिश्चिती करण्याचे व हा दुर्ग उजेडात आणण्याचे श्रेय वसई मोहिमेचे प्रतिनिधी डॉ.श्रीदत्त राऊत यांना जाते.किल्ले वसई मोहिमे अंतर्गत १८ ऑगस्ट २००८ ला हिराडोंगरी या अज्ञात किल्ल्याच्या अवशेषांचा शोध लावण्यात आला.कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने व स्थानिक लोकांना जास्त काही माहिती नसल्याने तिथे जाण्यापूर्वी पुर्ण माहिती घेऊनच जावे.स्थानिक लोक या दुर्गास दातिवरे हिराडोंगरी अथवा डोंगरी या नावाने ओळखतात.हिराडोंगरी दुर्गावर जाण्यासाठी पायथ्यापासुन १५ मिनिटांची चढाई करावी लागते.चढाई करताना वाटेतच एक घोडयावर बसलेल्या युवकाचे शिल्प असणारी विरगळ दिसते. हिराडोंगरी दुर्ग समुद्रकिनारी असुन साधारणपणे २० मीटर उंचीच्या टेकडीवर अर्नाळा बेटाच्या समोर आहे.येथून अर्नाळा बेट,भवानिगड, जीवधनगड, तांदुळवाडी किल्ला,वैतरणा नदीचे पात्र इ.परिसर पूर्णपणे द्रुष्टीपथात येतो. हिराडोंगरी हि ३ लहान टेकड्यांची एक मालिकाच आहे.यातील मधल्या टेकडीवर एक उथळ खोदीव टाके व कातळात कोरलेल्या चार पांच पायऱ्या आढळतात. याच्या शेजारील टेकडीत एक मानव निर्मित अर्धवट कोरलेली गुहा तसेच एक नैसर्गिक विवर आढळून येते. चिमाजी आप्पांच्या वसई मोहिमेत अर्नाळा किल्ला मोहिमेत या दुर्गाने महत्वाची भूमिका निभावली असावी पण पुराव्या अभावी असे विधान करणे धाडसाचे ठरेल.इ.स.१९३७ च्या सुमाराचे वसई मोहिमेचे तपशील वाचताना मराठयांचे सैन्य अर्नाळा दातिवरे मार्गाने दातिवरे बंदरात व परिसरात उतरल्याचे उल्लेख आढळतात. हिराडोंगरी दुर्गाचे अवशेष हे किल्ल्याचे निर्मितीचे आहेत कि त्याचे तात्पुरते प्रयोजन होते हा एक शोधाचा विषय आहे. महिकावतीच्या बखरीत उत्तर कोकणातील दातिवरे परिसराचा उल्लेख दात्तामित्रीय या नावाने येतो.संपुर्ण दुर्ग पाहण्यास ३० मिनिटे पुरेशी होतात.किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण ज्याला सागरी व्यापारी मार्गावरील टेहळनीची जागा अथवा चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या ठिकाणास अवश्य भेट द्यावी.

हिराडोंगरी दुर्ग

जिल्हा - पालघर 
श्रेणी  - सोपी 
दुर्गप्रकार - सागरी किल्ला