जिल्हा - सांगली  
श्रेणी  -  सोपी
दुर्गप्रकार- गिरीदुर्ग

महाराष्ट्रातील बहुतांशी गडाची नावे हि त्या गडावरील देवता वा गडाच्या घेऱ्यात असलेले गाव यावरून पडलेली आहेत. अर्थात आधी गड बांधुन नंतर गडदेवता स्थापन करण्यात आली कि देवता असलेल्या ठिकाणी गड बांधण्यात आला हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. नाथ संप्रदायातील मच्छिंद्रनाथ यांच्या मंदिरामुळे आसपासच्या परिसरात प्रसिध्द असलेला मच्छिंद्रगड हा असाच एक लहानसा टेहळणीचा किल्ला. सांगली-सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर असणारा हा किल्ला सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कमळभैरवाच्या डोंगराशेजारी एका टेकडीवर उभा आहे. पुण्याहुन जाताना कराड ओलांडल्यावर मुंबई-बंगळुर महामार्गावरील वाठार येथुन मच्छिंद्रगडला जाण्यासाठी फाटा फुटतो. वाठार ते मच्छिंद्रगड हे अंतर साधारण १२ कि..मी.असुन खाजगी वाहनाने थेट गडाच्या पायथ्याशी असलेल्या मच्छिंद्रगड गावापर्यंत जाता येते. सध्या गडावर जाण्यासाठी पक्की सडक बांधण्यात येत असुन पुढील काही दिवसात गाडी थेट गडावरच जाईल. गडाच्या घेऱ्यात पुर्वेला लवणमाची व पश्चिमेला बेरडमाची या दोन माच्या असुन पायथ्याशी असलेल्या मच्छिंद्रगड गावातुन तसेच बेरडमाची येथुन गडावर जाण्यासाठी बांधीव पायरीमार्ग आहे. या पायरीमार्गाने अथवा गडावर जात असलेल्या कच्च्या गाडी रस्त्याने उध्वस्त तटबंदी पार करत अर्ध्या तासात आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो. गडमाथा दक्षिणोत्तर साधारण आठ एकरवर पसरलेला असुन गडावर होत असलेल्या रस्त्याने व नवीन बांधकामाने गडाची तटबंदी व मूळ अवशेष मोठया प्रमाणात नष्ट झाले आहेत. कच्च्या रस्त्याने गडावर प्रवेश केल्यावर सर्वप्रथम उजव्या बाजुला दोन समाधी दिसुन येतात. यातील एका समाधीवर तुळशीवृंदावन आहे. समाधीच्या खालील बाजुस गडाचा पश्चिम टोकाचा बुरुज असुन या बुरुजावर पर्यटकांसाठी छत्री उभारण्यात आली आहे. बुरुज पाहुन पुढे आल्यावर गडाच्या दक्षिणेकडून बेरडमाची गावातुन येणारा पायरीमार्ग या वाटेला मिळतो. सरळ वाटेने पुढे न जाता या पायरीमार्गाने काही अंतर खाली उतरल्यावर मोठया प्रमाणात गडाचे अवशेष दिसुन येतात. या पायरीमार्गावर गडाचा दोन बुरुजात बांधलेला उध्वस्त पुर्वाभिमुख दरवाजा आहे. यातील एक बुरुज पुर्णपणे नष्ट झाला असुन दुसरा बुरुज व शेजारील तटबंदी आजही काही प्रमाणात तग धरून आहे. दरवाजाच्या पुढील भागात असलेल्या टोकावरील बुरुज आजही शिल्लक असुन या बुरुजाला तळात दुहेरी बांधकाम करून अधिक सरंक्षण दिलेले आहे. पायरीमार्गाने गडाबाहेर जाऊन हा बुरुज व तटबंदी पहाता येते. हे पाहुन परत फिरल्यावर गडाच्या उजव्या बाजुस उतारावर एक पुरातन मंदिर दिसते. हे दत्तमंदीर असुन या मंदिराचे मोठया प्रमाणात नुतनीकरण झाल्याने त्याचे मूळ सौंदर्य लोप पावले आहे. मंदिराकडून एक वाट खाली दरीच्या दिशेने उतरताना दिसते. या वाटेवर खडकात खोदलेली पाण्याची दोन लहान टाकी असुन यातील एका टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. गडाची दक्षिण बाजु पाहुन परत फिरल्यावर गडाच्या मध्यभागी असलेल्या मच्छिंद्रनाथ मंदिराकडे यावे. मंदीरासमोर असलेली एक पडक्या घरासारखी वास्तु म्हणजे चोखामेळा यांचे स्मारक मंदिर आहे. मंदिराच्या आवारात काही विखुरलेली शिल्पे असुन दोन तुळशी वृंदावने तसेच तीन लहान आकाराच्या तोफा आहेत. यातील एक तोफ भग्न झालेली आहे. आवारात असलेल्या एका झाडाभोवती पार बांधलेला असुन या पारातील दगडामध्ये देवनागरी लिपीतील शिलालेख दगड म्हणून वापरण्यात आला आहे कदाचित त्यामुळेच हा शिलालेख सुरक्षित राहिला आहे. मच्छिंद्रनाथ यांच्या मूळ दगडी मंदिरावरील कळस नव्याने बांधलेला असुन सभामंडपाचे काम देखील अलीकडील काळातील आहे. मंदिराच्या मागील बाजुस एक कोरडी विहीर व चुन्याचा घाणा असुन मोठया प्रमाणात झाडी वाढली आहे. मंदिराच्या उजव्या बाजूस एका वास्तुचा चौथरा असुन सध्या त्यावर गहीनीनाथांचा तांदळा स्थापन करण्यात आला आहे. येथून गडाच्या उंचवट्यावर बांधलेल्या गोरक्षनाथ यांच्या मंदिराकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्या असुन या वाटेवर दोन समाधी आहेत. गोरक्षनाथांचे दगडी बांधकामातील मंदिर किल्ल्याच्या सर्वात उंच ठिकाणी असुन मंदीरासमोर वृंदावन आहे. उंचवट्याच्या खालील बाजुस घडीव दगडात बांधलेले पाण्याचे टाके असुन या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. सध्या गडावर पिण्यासाठी या टाक्यातील पाण्याचा वापर केला जातो. उंचवट्याच्या पुढील बाजुने खाली उतरल्यावर किल्ल्याचा उत्तरेकडील बुरुज असुन या बुरुजाची डागडुजी करून त्यावर पर्यटकांसाठी छत्री उभारण्यात आली आहे. बुरुजाच्या पुढील भागात मोठया प्रमाणात वास्तु अवशेष असुन उध्वस्त तटबंदी दिसुन येते. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. गडाच्या माथ्यावरुन उत्तरेला सदाशिवगड तर दक्षिणेला विलासगड इतका लांबवरचा प्रदेश दिसतो. गडाची मोक्याची जागा पाहता या गडाचा वापर टेहळणीसाठी होत असावा. गडमाथा आटोपशीर असल्याने गडफेरी करण्यास एक तास पुरेसा होतो. १० नोव्हेंबर १६५९ला अफझलखानाचा वध केल्यावर मराठयांनी केलेल्या घोडदौडीत १३ नोव्हेंबर १६५९ ते फेब्रुवारी १६६० च्या दरम्यान आदिलशाहीच्या ताब्यातील मंच्छिंद्र्नाथ डोंगर व आजुबाजुचा परीसर मराठयांच्या ताब्यात आला पण महाराज पन्हाळ्यात अडकल्यावर सिद्दी जोहरने हा भाग परत ताब्यात घेतला. पुढे १६७०-७१ च्या दरम्यान हा भाग परत मराठयांच्या ताब्यात आला. चिटणीस बखरीत (आदिलशाहीचे) निंबाळकर, गाडगे (घाटगे) वगैरे पुंडपणा करुन होते. त्यास दबावाखाली जागाजागा किल्ले नवेच बांधिले. त्यात मच्छिंद्रगड हे नवेच बांधिले.असा उल्लेख आढळतो. इ.स.१६७६च्या सुमारास शिवरायानी जे दुर्ग बांधले त्यात मच्छिंद्रगडची उभारणी केली असावी. पुढे आलेल्या आलमगीर वावटळीत इ.स.१६९३ मध्ये गड मोगलांच्या ताब्यात गेला व त्यावर देवीसिंग या रजपूत किल्लेदाराची नेमणुक झाली. १२ नोव्हेंबर १६९३ रोजी औरंगजेब मच्छिंद्रगडाजवळ आला असता मोगली रिवाजाप्रमाणे किल्लेदार त्याच्या स्वागतास गड उतरून गेला त्यावेळी औरंगजेबाने गडावर तोफा उडवीण्याचा हुकूम दिला. त्यानंतर औरंगजेबाच्या म्रुत्यूपर्यंत गड मोगलांच्या ताब्यात होता. इ.स.१७५५ मध्ये शाहुराजांनी हा किल्ला जिंकुन औंधच्या पंतप्रतिनिधींना दिला पण १७६३ साली नारो गणेश व राधो विठ्ठल या राघोबादादांच्या सरदारांनी किल्ल्यावर ताबा मिळवला. पण काही काळातच सर्व सूत्रे पुन्हा माधवरावांच्या हाती आली व गड पुन्हा पंतप्रतिनिधींनकडे गेला. पेशवाईत १८१० साली बापु गोखल्यांनी हा गड पंतप्रतिनिधींकडून घेतला. इ.स.१८१८ मध्ये कर्नल हेविट या इंग्रज अधिकाऱ्याने हा गड जिंकून घेतला.-------------------सुरेश निंबाळकर

मच्छींद्रगड