कोकणच्या पूर्वेला सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पुणे,सातारा, सांगली, कोल्हापुर या जिल्ह्यांच्या सीमा येतात. सह्याद्रीच्या या पर्वतरांगेत कोकणात उतरणाऱ्या घाट वाटांवर लक्ष ठेवण्यासाठी घाटावर व घाटाखाली किल्ल्यांची साखळी निर्माण करत लहानमोठे असे अनेक किल्ले बांधले गेले. दुर्गप्रेमीना आजही अपरीचीत असलेले नरडवे व घोटगे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेले भैरवगड व सोनगड हे त्यापैकीच. यातील घोटगे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला सोनगड कागदोपत्री नरसिंहगड म्हणुन ओळखला जातो. या भागातुन वाहणाऱ्या गड नदीने तालुक्याचे दोन भाग केले असुन जवळजवळ असूनही भैरवगड कणकवली तालुक्यात तर सोनगड कुडाळ तालुक्यात येतो. खाजगी वाहन सोबत असेल तर बरीचशी पायपीट वाचते व एका दिवसात हे दोन्ही किल्ले सहज पाहुन होतात अन्यथा दोन दिवस हाताशी हवेत. सोनगड किल्ल्यास जाण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याचे सोनवडे गाव गाठावे लागते. कुडाळहुन घोटगेमार्गे सोनवडे हे अंतर ४३ कि.मी. असुन कणकवली ते सोनवडे हे अंतर २५ कि.मी.आहे. सोनगड व भैरवगड एकत्र पहायचा असल्यास नरडवे ते सोनवडे हे अंतर पक्क्या रस्त्याने १.५ कि.मी. असुन नरडवे जुने स्थानक येथुन चालत फक्त २० मिनिटांचे आहे. त्यामुळे नरडवे येथे उतरून सोनवडे येथे जाणे जास्त सोयीचे आहे. हा रस्ता गुगल नकाशावर दिसत नाही. सोनगड किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला असुन गावातुन गडावर जाण्यासाठी ३ वाटा आहेत. यातील एक वाट डोंगराच्या दक्षिण सोंडेवरून गडावर चढते तर उर्वरीत दोन वाटा डोंगराच्या उत्तर सोंडेवरून गडावर जातात. घोटगे येथुन सोनवडे गावात येताना नदी पार केल्यावर उजव्या बाजुस सोनवडे घाटरस्त्याचे काम सुरू आहे. खाजगी वाहन सोबत असल्यास चालण्याचे बरेच अंतर कमी होऊन या रस्त्याने आपण गडाच्या अर्ध्या उंचीवर पोहोचतो. येथुन मळलेली पायवाट डोंगराच्या दक्षिण सोंडेवरून गडाच्या उध्वस्त तटबंदी मधुन गडावर प्रवेश करते. दुसरी वाट सोनवडे गावातील लिंगेश्वर मंदिराजवळ असलेल्या शाळेकडून मुख्य वाडीतुन गडाच्या उत्तर सोंडेवर जाते. या वाडीच्या टोकाला सध्या सहकार कृषी पर्यटन केंद्राची उभारणी केली जात आहे. या वाटेवर खाडी चढण असुन वाट मळलेली असली तरी वाटेला असंख्य ढोरवाटा असुन मुख्य वाटेचा मागोवा घेतच वर चढावे लागते. तिसऱ्या वाटेने सोनवडे गावातुन नरडवे गावाकडे जाताना मुख्य रस्ता उजवीकडे गडाच्या उत्तर सोंडेकडे वळतो. या रस्त्याने साधारण ३ कि. मी.पुढे आपण सोनवडे गावाच्या विरुद्ध बाजुस उत्तरेकडील डोंगरधारेखाली येतो. येथील एका मोठ्या वळणावरून या धारेवर जाता येते. मागील दोन वाटांनी गडाच्या दोन बुरुजामध्ये असलेल्या उध्वस्त दरवाजा मधून आपला गडावर प्रवेश होतो. पहिल्या व तिसऱ्या वाटेने गडावर जाण्यासाठी पाउण तास लागतो पण त्यासाठी सोबत वाहन असणे गरजेचे आहे. सोनवडे गावामधील पायवाटेने गडावर जाण्यासाठी दीड तास लागतो. डोंगराच्या उत्तरेकडील धारेवरून आपण गडाच्या उत्तर बाजुस असलेल्या नेढ्याखाली पोहोचतो. स्थानिक लोकात हे नेढे चांगलेच प्रसिद्ध असुन ते या लंबगोलाकृती नेढ्यास भीमाची आकडी म्हणुन ओळखतात. या नेढ्याखालुन गडावर जाण्यास दोन वाटा आहेत. यातील उजवीकडील वाट दक्षिणेकडील सोंडेवरून येणाऱ्या वाटेला मिळते. आपण मात्र डावीकडील वाटेने गडाकडे निघायचे. येथुन ५ मिनिटात ओबडधोबड पायऱ्यांच्या वाटेने आपण घळीत असलेल्या दोन बुरुजामधील पश्चिमाभिमुख उध्वस्त दरवाजातुन गडावर प्रवेश करतो. हा दरवाजा खालच्या टप्प्यात असुन येथुन गडाचा माथा साधारण ७० ते ८० फुट उंचावर आहे. या भागात मोठया प्रमाणात कारवीचे रान व गवत वाढलेले आहे. येथुन उजवीकडील बाजुने तटबंदीच्या काठाने वर चढत जाऊन आपण गडफेरीस सुरवात करायची. या वाटेने आपण सर्वप्रथम नेढ्याच्या वरील भागात असलेल्या बुरुजावर येतो. या बुरुजावरून डोंगराच्या उत्तर धारेवरून गडावर येणाऱ्या संपुर्ण वाटेवर लक्ष ठेवता येते. या ठिकाणी कारवीची दाट झाडी वाढली असुन एक चौथरा वगळता इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाही. तटबंदीच्या काठाने तसेच पुढे निघाल्यावर हि तटबंदी खालील बाजुस उतरत गेलेली असुन या तटाला लागुनच काही वास्तुचे अवशेष आहेत. बांधकामासाठी कोणतेही मिश्रण न वापरता ओबडधोबड दगडात रचलेल्या या तटबंदीचे काही ठिकाणी मातीच्या ढिगाऱ्यात रुपांतर झाले आहे. गडाच्या दक्षिण धारेवरून येणारी पायवाट या उतारावरील तटबंदीतुन गडात प्रवेश करते. या ठिकाणी तटावर एक कोरीव दगड असुन हा दगड शिवलिंग असल्याचे वाचनात येते पण हे शिवलिंग नसुन न्हाणीचा दगड आहे. या उतारावर तटाच्या आतील बाजुस एक मोठा खोल तलाव आहे पण त्यात प्रचंड प्रमाणात जंगल वाढल्याने आत पाणी आहे कि नाही हे कळण्यास मार्ग नाही. तलावाचे पाणी अडविण्यासाठी या ठिकाणी तटाची रुंदी जास्त ठेवण्यात आली आहे. या तलावाच्या काठावर तटबंदीत घडीव दगडात देवडी बांधलेली आहे. येथुन पुढे निघाल्यावर आपण गडाच्या दक्षिण टोकावरील घडीव दगडात बांधलेल्या भल्यामोठ्या बुरुजावर पोहोचतो. या बुरुजावरून गडाच्या दक्षिण धारेवरून गडावर येणारी संपुर्ण वाट नजरेस पडते. दक्षिणेच्या या तटबंदीखाली एक मोठी गुहा असुन त्यात वर्षभर पाणी असल्याचे सांगीतले जाते पण आम्हाला हि गुहा शोधुनही सापडली नाही. बुरुजावरून तटबंदीला वळसा घालत एक बुरुज पार करून आपण गडाच्या पुर्व भागात येतो. गडावर असलेली थोडीफार सपाटी याच भागात आहे. या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली उध्वस्त चौथऱ्यावर भैरवनाथाची मुर्ती ठेवलेली असुन मूर्तीच्या मागील बाजुस भैरवाची भग्न झालेली दुसरी मुर्ती आहे. गावकरी या भैरवाची सोनदेव म्हणुन पूजन करतात. मुर्ती शेजारी छप्पर उडालेली झोपडी असुन या झोपडीत जेवण करण्यासाठी भांडी ठेवलेली आहेत. गावकरी येथे नेहमी दोन कळशी पाणी भरून ठेवतात. मंदिराच्या आवारात कोरडे पडलेले लहान तळे असुन एक उध्वस्त चौथरा आहे. मंदिरासमोरील उंचवट्यावर एका मोठ्या वाड्याचे अवशेष असुन या वाडयाच्या ३-४ फुट उंचीच्या भिंती आजही शिल्लक आहेत. या वाडयाला आतील बाजुस अनेक दालने आहेत. या ठिकाणी गडाची समुद्रसपाटी पासुन उंची २०६० फुट असुन गडाचा परिसर साधारण २५ एकरमध्ये सामावला आहे. गडाची पुर्व बाजू वगळता गडावर फारशी सपाटी नाही. वाडा पाहुन पुन्हा तटबंदीच्या कडेने आपल्या गडदर्शनास सुरवात करावी. वाडयाच्या पुढील भागात तटबंदीच्या काठावर कातळात खोदलेले पाण्याचे टाके आहे. टाके पाहुन पुढे आल्यावर दोन बुरुजात असलेला गडाचा पूर्वाभिमुख दिसतो. या दोन्ही बुरुजाचे मातीच्या ढिगाऱ्यात रुपांतर झालेले आहे. या बुरुजात असलेला दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन या दरवाजातून खाली उतरत जाणाऱ्या काही पायऱ्या शिल्लक आहेत. गडाखालील हा भाग एका चिंचोळी सोंडेने सह्याद्रीच्या मुख्य रांगेशी जोडला गेला आहे. या पायऱ्यांनी सावधगिरीने खाली उतरून दोन बुरुज,त्यातील दरवाजा व घडीव दगडात बांधलेली शेजारची तटबंदी पहाता येते. गडाचा हा भाग पाहुन तटबंदीवरून आपण उत्तर दिशेला वळतो. येथुन भैरवगड व दूरवर पसरलेले गड नदीचे पात्र नजरेस पडते. या भागात मोठ्या प्रमाणात असलेले वास्तुचे अवशेष पाहता गडाची मुख्य वस्ती याच भागात असावी. या ठिकाणी मोठया प्रमाणात गवत वाढलेले असुन सर्व अवशेष त्यात लपलेले आहेत. येथुन पुढे आल्यावर खोलगट भागात मातीने भरलेला एक मोठा तलाव नजरेस पडतो पण पावसाळा वगळता यात पाणी रहात नाही. तटबंदीच्या काठाने तसेच पुढे आल्यावर कातळात कोरलेले एक लहान टाके नजरेस पडते. येथुन पुढे दाट झाडी व उतार असुन या झाडीतुन मार्ग काढत गेल्यास आपण गडावर प्रवेश केलेल्या ठिकाणी पोहोचतो. संपुर्ण गडफेरीस दीड तास पुरेसा होतो. शिवकाळात या गडाचा उल्लेख येत नसला तरी परिसरातील नरडवे व घोटगे घाट पहाता या घाटांच्या टेहळणीसाठी हा दुर्ग पुर्वीपासून अस्तित्वात असावा. फोंड सावंत (१७०९-३८ ) हा किल्ला बांधल्याचे सांगीतले जाते पण त्याला कागदोपत्री आधार नसुन त्यांनी या किल्ल्याची दुरुस्ती केली असावी. ५ ऑगस्ट १७०० मधील एका नोंदीनुसार पाटगावचे जनार्दन भट यांना घोटगे घाटातून होणाऱ्या माल वाहतुकीवर जकातीचे काही अधिकार देण्यात आले होते. याचा अर्थ हा घाट आधीपासुनच वापरात होता. करवीरकर व सावंतवाडीकर यांच्या सततच्या कुरबुरीत सावंत नेहमी भैरवगड व सोनगड या किल्ल्यास उपद्रव करत पण एप्रिल १७८२ मध्ये रांगण्याचा वेढा उठवल्यावर सावंतानी या किल्ल्यास उपद्रव होणार नाही असे वचन दिले. सन १७८७ मध्ये वाडीकर सावंतानी बादशहाकडून स्वतःसाठी मोर्चेल आणले. करवीरकरांना हे मान्य झाले नाही व त्यांचे नेसरीचे सरदार नरसिंहराव शिंदे व यशवंतराव सहीने यांनी सावंताच्या ताब्यातील सोनगडावर हल्ला करून तो ताब्यात घेतला याच उल्लेख २ जानेवारी १७८८ मधील एका पत्रात येतो. सावंत व करवीरकर यांच्यात समेट झाला व ५ नोव्हेंबर १७९३ रोजी गड सावंतांना परत करण्यात आला. एप्रिल १७९५ मध्ये सावंतानी धोंडो लेले यास किल्लेदार नेमले. सावंतांच्या गृहकलहात सन १८०५ मध्ये रांगण्याचा किल्लेदार राणोजी निंबाळकर यांनी करवीरकरांच्या वतीने किल्ल्याचा ताबा घेतला व सखाराम जाधव यांस किल्लेदार नेमले. यानंतर किल्ला करवीरकरांच्याच ताब्यात राहिला. ९ नोव्हेंबर १८१७ मधील एका पत्रात किल्लेदार सखाराम जाधव सावंत व पोर्तुगीज यांच्या लष्करी हालचालीबद्दल लिहीताना अमात्यांना किल्ल्याचा बंदोबस्त चोख असल्याचे कळवतात. या सर्व कागदपत्रात या किल्ल्याचा उल्लेख नरसिंहगड या नावाने येतो. सन १८२० मधील सावंत व करवीरकर यांच्यामधील वसुलीच्या भांडणात सन १८२२ मध्ये सोनगड व भैरवगड या किल्ल्यांचा तनख्याचा निकाल ब्रिटीश सरकारने करवीरकरांच्या बाजूने दिला. इ.स.१८४२ मध्ये केसो आबाजी गडाचे सबनीस होते. सन १८४४ मधील करवीर मधील गडकऱ्यांच्या उठावानंतर १८५० पर्यंत गड नांदत होता कारण १८५०मध्ये इंग्रज सरकारमधून गडाच्या तनख्याच्या थैल्या हुजूर आल्याचे उल्लेख येतात. --------------सुरेश निंबाळकर

सोनगड-घोटगे

जिल्हा - सिंधुदुर्ग

श्रेणी  -  मध्यम

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग