माथाणे कोट 

​जिल्हा -पालघर  
श्रेणी  - सोपी 
दुर्गप्रकार- सागरी किल्ला 

मथाणे कोटास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनने सफाळे स्थानकास उतरावे. सफाळे स्थानकापासून एडवन व मथाणे येथे जाण्यास एसटी बस (एडवण नाक्यापर्यंत ) व खाजगी रिक्षा उपलब्ध आहेत. एडवन नाक्याहून डावीकडील रस्ता मथाणे गावात जातो. मथाणे कोट सफाळे स्थानकापासून १३ कि.मी. तर एडवन नाक्यापासून २ कि.मी.वर आहे. कोटाच्या नावाविषयी ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्याला स्थानिक गावाच्या नावाने मथाणे कोट म्हणुनच ओळखले जाते. मथाणे कोट गावामध्येच भर वस्तीत असुन कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने व स्थानिक लोकांना जास्त काही माहिती नसल्याने तिथे जाण्यापूर्वी पुर्ण माहिती घेऊनच जावे. मथाणे गावात असलेल्या आमची शाळा या शाळेच्या मागील बाजुस आपले उरलेसुरले अवशेष सांभाळणारा मथाने कोट जवळपास नष्ट झाल्यातच जमा आहे. कोटाच्या भिंतीवर वाढलेल्या झाडांच्या मुळांनी भिंतीना घट्ट जखडुन ठेवले आहे आणि या वाढलेल्या मुळांमुळेच या भिंती उभ्या आहेत. मथाणे कोटाच्या अवशेषात आपल्याला केवळ या भिंती, कोटाचा चौथरा आणि भिंतीतील भल्यामोठ्या खिडक्या पहायला मिळतात. सदर कोटातील उपलब्ध अवशेष पाहता सदर कोट पोर्तुगीजकालीन लहानसे शासकीय व प्रशासकीय कार्यालय असावे. या कोटाच्या बांधणीत अघडीव दगड, चिकटमाती, चुना, यांचा वापर केला गेला आहे. स्थानिक लोक या वास्तूला माडी म्हणुन संबोधत असल्याने ही वास्तू दुमजली असावी. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हि वास्तू दुमजली होती आणि कोटाच्या भिंतीवर लाकडी वाशाकरिता असलेल्या खोबण्यावरून ते लक्षात येते. मथाणे कोट समुद्रालगत असल्याने किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांचा आवाज सहजगत्या ऐकु येतो. दातिवरे ते शिरगाव परिसरातील गढय़ा, कोट, वास्तू खाडीच्या समांतर रेषेत बांधण्यात आलेले आहेत. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या कोटांचा मुख्य उपयोग दातिवरे ते मनोर प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. इ.स १७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला. मथाणे कोटाची सध्याची अवस्था फारच दयनीय असुन कोट पाहण्यास १० मिनिटे पुरेशी होतात.किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण ज्याला प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी. किल्ले वसई मोहिमेचे प्रतिनिधी डॉ. श्रीदत्त राउत व त्यांचे सहकारी या कोटाची ओळख लोकांना करून देऊन मथाणे गावाचा इतिहास जिवंत ठेउन गतवैभवाचे सरंक्षण करण्याची भक्कम कामगिरी करत आहेत. वसई प्रांतातील वास्तू व पराक्रम येणाऱ्या पिढीना कळlवा यासाठी धडपडणारी किल्ले वसई मोहीम कौतुकास पात्र आहे.