​​​​​​​जिल्हा - सिंधुदूर्ग 
श्रेणी  - कठीण   
दुर्गप्रकार - जलदुर्ग

सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणाजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रूंशी लढण्यासाठी जलदुर्गाचे महत्त्व ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले.चांगल्या, भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्रकिनाऱ्याची पाहणी झाली. इ.स. १६६४ साली मालवण जवळील कुरटे नावाचे काळाकभिन्न खडक असलेले बेट किल्ल्यासाठी निवडले. ज्या कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले त्यांना गावे इनामे देण्यात आली. भूमीपूजनाचा मुहूर्त काढण्यासाठी मालवण गावचे वेदशास्त्रसंपन्न जानभट अभ्यंकर यांना आमंत्रित केले गेले. मालवण समुद्रकिनाऱ्यावर ज्या ठिकाणी किल्ले सिंधुदुर्गचे भूमिपूजन केले त्या ठिकाणाला मोरयाचा धोंडा म्हणून पुढे प्रसिद्धी मिळाली. या ऐतिहासिक दगडावर गणपती, चंद्र, सूर्य, शिवलिंग यांच्या प्रतिकृती कोरल्या आहेत. या ठिकाणी विधिवत गणेश पूजन व सागर पूजन केले. समुद्राला नारळ अर्पण करून सिंधुदुर्ग किल्ल्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर शिवाजी महाराज नौकेतून कुरटे बेटावर गेले. त्यांनी तिथे मार्गशिर्ष शके १५८६ व्दितीय म्हणजे २५ नोव्हेंबर १६६४ ला किल्ल्याच्या मुहूर्ताचा पहिला दगड बसविला. त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात झाली. किल्ला बांधण्यासाठी ५०० पाथरवट, २०० लोहार, १०० गोवेकर पोर्तुगिज व ३००० मजूर ३ वर्षे अहोरात्र खपत होते. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरलेल्या सागरी लाटांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी व किल्ल्याचा पाया भक्कम करण्यासाठी उकळते शिसे ओतून त्यावर मोठमोठे चिरे बसवण्यात आले. तटाच्या बांधणीस ८० हजार होन खर्ची पडले. तसेच घाटावरुन मागवलेला चुना वापरुन किल्ल्याचे इतर बांधकाम करण्यात आले. चैत्र शुक्ल पक्ष पौर्णिमा, शके १५८९, म्हणजे २९ मार्च १६६७ या दिवशी सिंधुदुर्गाचे बांधकाम पूर्ण झाल्याची नोंद सापडते. या वास्तुशांती प्रसंगी महाराज स्वत: उपस्थित होते. त्यांच्या आगमनप्रसंगी तोफांचे आवाज करण्यात आले आणि साखर वाटली गेली. महाराजांनी सर्व कारागिरांना भरघोस पारितोषिके वाटली. विशेष कामगिरीबद्दल सोन्या-रुप्याची कडीदेखील वाटली गेली. स्थपती हिरोजी इंदुलकर ह्याने किल्ल्याचे बांधकाम केले तर गोविंद विश्वनाथ प्रभू हा ह्या किल्ल्याच्या बांधकामाचा मुख्य स्थपती होता. शिवाजी महाराज स्वतः ह्या बांधकामात विशेष लक्ष देत होते. किल्ले बांधणीच्या ३ वर्षाच्या काळात महाराजांनी लिहीलेली किल्लेबांधणी संबंधी मार्गदर्शन करणारी पत्र उपलब्ध आहेत. हिरोजीला त्यानी लिहीलेल्या पत्रातून बारीकसारीक गोष्टींमधे असलेले त्याचे लक्ष व आग्रह आपल्याला दिसतो. महाराज एका पत्रात लिहितात आमचे लक्ष सिंधुदुर्गी स्थिरावले असे. अवघे काम चखोट करणे. पाया योग्य घेणे. पायात ओतण्यासाठी शिसे धाडावयाची व्यवस्था केली असे. नीट पाहोन मोजोन माल कह्यात घेणे. वाळू धुतलेलीच वापरणे, चुनकळी घाटावरोन उटण पाठवित आहो. रोजमुरा हररोज देत जाणे. त्यास किमपी प्रश्नाच न ठेवणे आणि सदैव सावध रहाणे. किल्ल्याच्या बांधकामासाठी सुरत लुटून मिळविलेली संपत्ती खर्च केली. शत्रूंकडून किल्ल्याच्या बांधकामास व्यत्यय येऊ नये यासाठी महाराजांनी जवळपास ४ ते ५ हजार मावळ्याची फौज तैनात केली. या गडाच्या निर्मितीमुळे पश्चिम सागरावर मराठयांचे साम्राज्य प्रस्थापीत झाले. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. तटाची उंची ३० फूट असून रूंदी १२ फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर ५२ बुरुज असून तटबंदीत ४५ अरुंद जिने व ४० शौचकुप आहेत. ऐतिहासिक सौदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन शतके उभा आहे, तो शुद्ध काळाकभिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. शिवकालीन चित्रगुप्त याने लिहिलेल्या बखरीत याबाबत पुढील मजकूर नमूद केला आहे 'चौऱ्याऐंशी बंदरात हा जंजिरा अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका, अजिंक्य जागा निर्माण केला ।सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मान तारा । जैसे मंदिराचे मंडन, श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार। चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले। सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. किल्ल्याच्या तटबंदीवरील बुरुजांवर टेहळणी , तोफांचा मारा करण्यासाठी जंग्या आहे. नौकेतुन तटाजवळ उतरल्यावर वक्राकार आकाराच्या तटबंदीतून आत गेल्यावर आपणाला गडाचा मुख्य दरवाजा दिसतो. शिवकालीन दुर्गरचनेचा हा गोमुख दरवाजा आजही तितकाच मजबूत व व्यवस्थित आहे. दरवाजा भक्कम अशा उंबराच्या फळ्यांपासून केला असुन त्याला सागाच्या लाकडाची जोड दिली आहे. महादरवाजावर नगारखाना असुन दरवाजात आपणाला एक भग्न तोफ पहावयास मिळते. दरवाजासमोर एक छोटेसे मंदिर असुन आहे त्यात श्री गणेशची हि मूर्ती आहे. येथुन बुरुजावर गेल्यानंतर १५ मैलांचा प्रदेश सहज दिसतो. तटावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा तसेच बंदुकीचा व बाणांचा मारा करायला तटाला जंग्या आहेत. तटबंदीवरून फिरत असतांना आपणाला दोन घुमट्या पहावयास मिळतात. गडाच्या बांधकामाची पाहणी करण्यास शिवाजी महाराज गडावर आले असता ओल्या चुन्यावर महाराजाच्या डाव्या पायाचे व उजव्या हाताचे ठसे उमटले होते व त्यावरच ह्या घुमट्या उभारण्यात आल्या आहेत. २१ नोव्हेंबर १७६३ ला संभाजी महाराजांच्या पत्नी जिजाबाई यांनी लिहीलेल्या पत्रात या ठशांवर घुमटी व कोनाडा बांधून त्यांची दररोज पूजाअर्चा करण्याची व नैवेदय दाखविण्याची आज्ञा केली होती. गडाच्या अगदी मधोमध शिवराजेश्वर मंदिर आहे. शिवाजी महाराजांच्या या एकमेव मंदिराची बांधणी १६९५ मध्ये शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराजांनी केली. यात महाराजांची वीरासनातील नावाड्याच्या टोपीसदृश शिरस्त्राण घातलेली व दाढी नसलेली वालुकाश्म मूर्ती आहे. इथे आपल्याला महाराजांची पाषाणातील चांदीचा व सणासुदीत सोन्याचा मुखवटा घातलेली मूर्ती पहावयास मिळते. करवीर छत्रपतींच्या वतीने येथील शिवराजेश्वर मंदिरात प्रतिवर्षी जिरेटोप, वस्त्रे अर्पण केली जातात. मूर्तीची पूजाअर्चा संकपाळ घराण्याकडे आहे. किल्ल्यावरील शिवरायांच्या हाताच्या ठशाचा चांदीचा छाप बनविण्यात आला असून त्याची नित्यपूजा कोल्हापुरातील जुना राजवाडा येथील भवानी मंदिरात होते. आजही दर बारा वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते. शिवरायांची म्हणुन एक चार फुटाची तलवार हि आपणाला या मंदिरात दाखवली जाते. महादरवाजातून आत गेल्यावर आपणाला पश्चिम दिशेला जरीमरी देवीचे छोटेखानी मंदिर दिसते. त्यावर एक शिलालेख असुन त्यात १८८१ मध्ये हे मंदिर बांधण्यात आल्याचा उल्लेख आहे. याशिवाय गडाच्या पश्चिम भागातच आपल्याला एक महादेवाचे मंदिर दिसते. या मंदिराचे वैशिष्ट असे की मंदिराच्या आत एक चौकोनी आकाराची खोल अशी बारव असुन मंदिरात नंदी समोर असेलेले महादेवाचे शिवलिंग आहे. सिंधुदुर्ग किल्ला हा समुद्रात असून या किल्ल्यावर तीन गोड्या पाण्याच्या खोल अशा विहिरी आहेत. दुधबाव, दहीबाव व साखरबाव हि त्यांची नावे आहेत. प्रत्येक विहिरीला चौकोनी आकाराची तटबंदी असुन या विहीरचा वापर गडावरील लोक पिण्याच्या पाण्यासाठी करतात. दहीबाव व साखरबाव जवळजवळ असुन दुध बाव राजवाड्याच्या अवशेषाजवळ आहे. ह्या विहिरींचे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे. ह्या विहीरींच्या पुढे शिवरायांच्या वाड्याचे जोते आहे. पाण्याचा अतिरिक्त गरज पुर्ण करण्यासाठी गडावर एक तलाव बांधण्यात आला आहे. भवानीमाता हि छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता आहे त्यामुळे महाराजांनी बांधलेल्या जवळपास सर्व किल्ल्यावर भवानी मातेचे मंदिर आहे. या गडावर भवानीमातेची उजव्या हातात त्रिशूल व डाव्या हातात तलवार धरलेली पाषाणातील सुरेख मूर्ती असणारे कौलारू मंदिर आहे. याशिवाय किल्ल्यावर महापुरुष मंदिर आहे. वाड्याच्या अवशेषांच्या पश्चिमेला किल्ल्याच्या तटबंदीपासून वेगळा व आत असलेला उंच बुरुज आहे. ह्या बुरुजाला दर्याबुरुज किंवा निशाणकाठी बुरुज म्हणतात. ह्या बुरुजाचा उपयोग टेहळणीकरीता केला जात असे. मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ २८ फूट उंच होता. त्यामुळे समुद्रातून दूरवर तो ध्वज सहज दृष्टीस पडत होता. ध्वजाला पाहून मच्छिमार खडकापासून लांब राहत असत. हा भगवा ध्वज इ.स.१८१२पर्यंत फडकत होता.बुरूजाजवळ साचपाण्याचा तलाव आहे. बुरुजाच्या मागच्या बाजूस थोडे चालत गेल्यावर तटबंदीत एक छोटा दरवाजा आहे. ह्या दरवाजातून बाहेर आल्यावर एक छोटीशी चंद्रकोरीच्या आकाराची पुळण लागते. ह्यास राणीची वेळा म्हणतात. या दरवाजाच्या समोरच्या बाजूस चुन्याचा घाणा आणि चुना साठवण्याचे हौद पाहायला मिळतात. किल्यांच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो. चुन्याच्या घाण्याच्या बाजूला असलेल्या जिन्याने फ़ांजीवर चढुन पुढे गेल्यावर बुरुजात असलेली खोली पाहायला मिळते. फ़ांजी वरुन चालत चोरदरवाजा पुढे आल्यावर तटबंदीत असलेली हनुमानाची मुर्ती दिसते. फ़ांजीवरून पुढे चालत गेल्यावर एक वाट भगवती देवीच्या मंदिराकडे जाते. मंदिर पाहून परत फ़ांजीवर येऊन किल्ल्याच्या प्रवशव्दाराकडे चालत जाताना प्रवेशव्दारपासून चौथ्या बुरुजाच्या खाली एक चोर दरवाजा पाहायला मिळतो. या दरवाजाने थेट समुद्रात उतरता येत असे. आज हा दरवाजा दगडांनी चिणून बंद करण्यात आला आहे. पुन्हा फ़ांजीवर येऊन पुढे चालत गेल्यावर पुढच्याच बुरुजाच्या भिंतीवर गणपती कोरलेला आहे. त्याच्यापुढे दरवाजापासून दुसरा बुरुज हा चिलखती बुरुज आहे. या बुरुजाला दुहेरी तटबंदी आहे. येथून प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गड फ़ेरी पूर्ण होते. संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी तीन तास लागतात. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून इ.स.२०१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. सिंधुदुर्गाच्या इतिहासात डोकावल्यावर असे दिसते की भगवान श्रीकृष्ण हे कालयवन या द्रवीड राजास द्वारकेहून हुलकावणी देत देत मुचकुंद राजाच्या गुहेत (सह्याद्रीत) आणले व कालयवनाचा वध झाल्यानंतर या जिल्ह्याच्या उत्तरेकडून घाट उतरून करवीरला गेले अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. रामायणातही या प्रदेशाचा उल्लेख आढळतो. या जिल्ह्याचा प्राचीन इतिहास थोडाबहुत स्पष्ट करणारे काही शिलालेख अलीकडील काळात सापडले आहेत. वेंगुर्ल्याजवळ मठ या गावात शके १३९७ मधील शिलालेख मिळाले आहेत. याशिवाय कुणकेश्वर, आजगाव व सातार्डे याठिकाणी काही शिलालेख मिळाले आहेत. नेरूर येथे सापडलेल्या चालुक्यकालीन शिलालेखावरुन प्राचीन काळी या परिसरात चालुक्यांची सत्ता नांदली असावी असे अनुमान काढता येते. मराठ्यांपूर्वी या परिसरात काही काळ आदिलशाही राजवट अस्तित्वात होती. आदिलशाही राजवटीत उभारल्या गेलेल्या काही वास्तू याची साक्ष देतात. ख्रिस्ताब्द १६५७ मध्ये शिवरायांनी कोकणावर स्वारी करून कल्याण आणि भिवंडी जिंकून घेतली. कल्याण बंदरात असलेल्या शत्रूच्या नावा ताब्यात घेऊन हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचा शुभारंभ केला आणि तेथेच नव्या युद्धनौका बांधण्याचे काम हाती घेतले. युद्धनौका बांधण्याचे आधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी पदरी अनेक पोर्तुगीज आणि इतर युरोपीय कारागीर कामाला ठेवले. त्यांच्या माहितीचा वापर करून घेत आधुनिक युरोपीय पद्धतीच्या जहाजांची निर्मिती चालू केली. जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचे राज्य ताब्यात घेऊन आणि अफझलखानाला मारून शिवाजी महाराज सैन्यांसह कोकणात उतरले. त्यांनी स्वराज्याची हद्द समुद्राला भिडविली. आदिलशहाची ठाणी काबीज करून महाराज मालवण किनाऱ्यावर आले. तेव्हा कोकणची स्थिती भयानक होती. आदिलशहा, सिद्दी व पोर्तुगीजांचे अत्याचार, जबरदस्तीने होणारी धर्मांतरे, मंदिरांची तोडफोड, कोकणात स्त्री-पुरूषांना पकडून परदेशात गुलाम म्हणून केली जाणारी रवानगी हा कोकण प्रांतातला नेहमीचा प्रकार होता. सभासद बखरकार लिहितो, राजियांनी पाणियातील कित्येक डोंगर बांधून दर्यांमध्ये गड वसवले. गड आणि जहाजे मेळवून राजियांनी दर्यास पालण घातले. जोवर पाणियातील गड असतील, तोवर आपली नाव चालेल, असा विचार करून अगणित गड भूमीवर, आणि जंजिरे पाणियात वसविले. देश काबीज केला. गुराबा, तरांडी, तारव, गलबटे, शिबाडे अशी नाना जातीची जहाजे करून दोनशे जहाजांचा एक सुभा थाटला. दर्या सारंग आणि मायनाईक भंडारी म्हणोन असे दोघे सुभेदार केले. त्यांनी शिदीची जहाजे पाडाव केली. मोगलाई, फिरंगी, वलंदेज (डच), इंग्रज अशा सत्तावीस पादशहा पाणियात आहेत त्यांची शहरे मारून जागा जागा युद्ध करीत समुद्रामध्ये एक लष्कर उभे केले. छ.शिवाजी महाराजांच्या तसेच छ. संभाजीराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्यावर हल्ला करण्याचे धाडस कोणीही दाखविले नाही. राजारामांच्या मृत्यूनंतर कोल्हापूरातून ताराराणी स्वराज्याचा कारभार पाहात असताना इ. स. १७१३ मध्ये हा किल्ला करवीर संस्थानच्या आधिपत्याखाली आला. शाहू आणि ताराबाई यांच्यातील वारणेच्या तहानुसार मालवण परिसराचा ताबा ताराराराणींकडे आला. मालवण समुद्रावर चाचेगिरीला ऊत आला होता. मेजर गॉर्डन व कॅप्टन वॉटसन यांनी सिंधुदुर्ग २८ जानेवारी १७६५ रोजी ताब्यात घेतला. त्यावेळी किल्ल्यातील दारुखाना जळून खाक झाला इंग्रजांनी किल्ल्याचे नाव ठेवले फोर्ट ऑगस्टस. कोल्हापूरच्या राणी जिजाबाई व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील करारानुसार २ जानेवारी १७६६ रोजी सिंधुदुर्ग मराठयांच्या ताब्यात आला. निपाणिच्या देसाई विरूद्ध इंग्रजांनी करवीरकरांना मदत केली व त्याच्या मोबदल्यात १७९२ला हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला. परंतु मुंबईच्या इंग्रजांनी तो पुढे करवीरच्या छत्रपतींना काही अटींवर परत दिला आणि मालवणला वखार घालण्यास संमती मिळविली. १८१२ मध्ये कर्नल लायोनेल स्मिथ याने हा किल्ला घेऊन येथील चाच्यांचा बंदोबस्त केला.

सिंधुदुर्ग