वसई परिसरातील एक सुंदर ठिकाण म्हणजे तुंगारेश्वर. मुंबईपासून सुमारे २ तासांच्या अंतरावर तुंगारेश्वरच्या डोंगरावर वसई पूर्वला सातीवली गावाच्या निसर्गरम्य परिसरात हे मंदिर वसले आहे. वसई रोड रेल्वे स्थानकापासून साधारण १० कि.मी. अंतरावर असलेले हे मंदिर आणि त्याचा परिसर मुद्दाम जाऊन पाहण्याजोगा आहे. येथे येण्यासाठी वसई रोड स्थानकापासून सात किलोमीटर अंतरावरील तुंगारेश्वर फाटय़ापर्यंत शेअर रिक्षा मिळतात व पुढे पायपीट करायची नसल्यास खासगी रिक्षा थेट तुंगारेश्वर अभयारण्याच्या दरवाजापर्यंत नेऊन सोडते. येथुन कच्च्या रस्त्याने दोन ते तीन वेळा ओढा ओलांडत तासाभरात आपण महादेवाच्या मंदिरापर्यंत पोहोचतो. तुंगारेश्वर पर्वताच्या कुशीत वसलेले हे जीर्णोद्धारीत शिवमंदिर प्राचीन व प्रसिद्ध आहे. अभयारण्याच्या हद्दीत वसलेलं तुंगारेश्वरचं शिवमंदिर शिवभक्तांच्या गर्दीने गजबजलेले असते. चहुबाजूने उंचच उंच वाढलेल्या मोठमोठय़ा झाडांच्या विळख्यात झाकोळलेल्या या मंदिरात श्रावण महिन्यात दर सोमवारी प्रचंड गर्दी असते. विमलासुर या राक्षसाने तपश्चर्येने शंकराला येथे येउन राहण्यास सांगितले व शंकराने दिलेल्या शिवलिंगाची स्थापना त्याने या ठिकाणी केली अशी या स्थानाबाबत आख्यायिका आहे. तुंगारेश्वर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचच एक भाग आहे.मंदिराच्या शेजारून वाहणाऱ्या झऱ्यावर ठिकठिकाणी असलेल्या दगडी टप्प्यामुळे येथे अनेक छोटेमोठे धबधबे निर्माण होतात. या पाण्यात डुंबण्यासाठी येथे पर्यटक गर्दी करतात. तुंगारेश्वरच्या घनदाट अरण्यामध्ये अजून एक ठिकाण आहे आणि ते म्हणजे तुंगारेश्वर धबधबा. मंदिरापासून १० मिनिटांच्या अंतरावरच हा धबधबा आहे. वसई तालुक्यातलं हे ठिकाण येथील निसर्गसौंदर्यामुळे व धबधब्यांमुळे पर्यटकांचं पावसाळ्यातील खास आकर्षण आहे. इथे असलेल्या सदानंदबाबा मंदिराच्या आसपास मोरांचे दर्शन होते. अनेक लोक पायथ्यापासून इथपर्यंत चालत येतात. साधारण तासभर चालण्याचे हे अंतर आहे पण वाटेतील निसर्गसौंदर्याने चालण्याचा थकवा जाणवत नाही. मंदिर परिसरात छोटी उपाहारगृहे असल्यामुळे चहा-नाश्त्याची सोय इथे होऊ शकते. मंदीर,जंगल आणि धबधबा अशा सर्व गोष्टींचा येथे आनंद घेता येतो. हिंडण्याची अजुन हौस भागवायची असल्यास तुंगारेश्वर ते माथ्यावरील परशुराम कुंड असा छोटा सोपा ट्रेक करता येऊ शकतो. या वाटेवरील जंगलात अनेक जातीही फुलपाखरे, कीटक पाहायला मिळतात. मुंबईपासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या तुंगारेश्वर जंगलाची सफर पावसाळी भटकंतीचा पुरेपूर आनंद देउन जाते.--------------सुरेश निंबाळकर

जिल्हा - पालघर 
श्रेणी  - सोपी 
प्रकार - शिवमंदिर 

तुंगारेश्वर