जिल्हा - सिंधुदुर्ग  
श्रेणी  - सोपी 
प्रकार-गणेशमंदीर

रेडी- गणेश

रेडी येथील स्वयंभु द्विभुज श्री गणेश मंदिर संपुर्ण राज्यात नवसाला पावणारा गणपती म्हणुन प्रसिद्ध आहे. रेडी बंदर किनाऱ्याजवळ खनिज खाणीच्या परिसरात १८ एप्रिल १९७६ रोजी स्वयंभू श्री गणेशाची द्विभुजा मुर्ती दृष्टांताने प्रकट झाली. रेडी येथील नागोळा वाडीतील एक तरुण सदानंद नागेश कांबळी हा ट्रक ड्रायव्हर म्हणून एक लोहखनिजाच्या कंपनीत नोकरीला होता. रेडीतील मायनिंगच्या खाणीवरुन बंदराकडे व बंदराकडून खाणीकडे त्याच्या लोहखनिज भरलेल्या ट्रकची सतत ये-जा होत असे. दि. १८ एप्रिल १९७६ रोजी एका ठिकाणी त्यांनी आपला ट्रक उभा केला. थोड्या वेळाने तो ट्रक सुरू करण्याचा प्रयत्न करताच तो सुरू होईना अखेरीस ते आपल्या ट्रकमध्येच झोपले. पहाटेच्या सुमारास त्यांना स्वप्न पडले व स्वप्नामध्ये श्रीगणपतीने ‘मी येथे आहे मला बाहेर काढ’ असा दृष्टांत दिला. भयभीत झालेल्या कांबळी यांनी झाला प्रकार गावकऱ्याना सांगावा म्हणुन ट्रक चालु करायचा प्रयत्न केला आणी आता तो लगेचच चालु झाला. गावातल्या लोकांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी रेडीचे ग्रामदैवत श्री माऊलीदेवीला कौल लावला तेव्हा ‘मूर्ती दिसेपर्यंत खोदा’असा कौल मिळाला. श्री.कांबळी व श्री.वासुदेव जुवेलकर यांनी मायनिंग कंपनीतील काही मजुरांच्या मदतीने खोदकामास सुरुवात केली. खोदण्यास सुरूवात केल्यानंतर दोनच दिवसांनी मूर्तीचा तोंडाकडचा व कानाकडचा भाग दिसु लागला. १ मे १९७६ या दिवशी म्हणजे बारा दिवसांनी संपुर्ण मूर्ती खोदुन बाहेर काढण्यात आली. अखंड जांभ्या दगडात कोरलेली ही मूर्ती सहा फूट उंच व तीन फूट रूंद आहे. मूर्ती बसलेल्या स्थितीत असुन एक पाय दुमडलेल्या अवस्थेत आहे. या मुर्तीचा एक हात आशीर्वाद मुद्रेत असुन दुसऱ्या हातात मोदक आहे. श्रीदेवी माऊलीने श्रीगणपतीच्या मूर्तीची त्याच ठिकाणी स्थापन करण्याचा कौल दिला. या मूर्तीसमोरील खोदकामात सुमारे सव्वा महिन्यांनी गणपतीचे वाहन असलेला दगडात कोरलेला मोठा उंदीर सापडला. श्रीगणपतीच्या त्या मुर्तीला प्लास्टरिंग व रंगरंगोटी करुन सजविण्यात आले. मुर्तीला रंगकाम केल्यामुळे मुर्तीचे मुळ पाषाणातील रूप नाहिसे झाले आहे. या ठिकाणी श्रीगणेशाचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. दर संकष्ठीला येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते.