दहिसर कोटास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनने सफाळे स्थानकास उतरावे. दहिसर कोट सफाळे रेल्वे स्थानकापासून १५ कि.मी.तर मुंबई-अहमदाबाद मार्गावर वारई फाट्यापासून ५ कि.मी.वर आहे.या कोटाविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने व स्थानिक लोकांना काहीच माहिती नसल्याने तिथे जाण्यापूर्वी पुर्ण माहिती घेऊनच जाण्याचे नियोजन करावे. सफाळेहुन जाताना पहिले पारगाव फाटा नंतर तांदुळवाडी फाटा नंतर दहिसर फाटा सोडल्यावर मुख्य रस्त्याला लागुनच उजव्या बाजूला व वाराई फाट्यावरून येताना डाव्या बाजूला दहिसर कोटाची इमारत नजरेस पडते.वास्तू फारच छोटीशी व वळणावर असल्याने वेगात वाहन असल्यास नजरेस देखील येत नाही.या निर्जनस्थळी कोणी थांबत नसल्याने शक्यतो खाजगी वाहनाचा उपयोग करावा.या कोटाची सध्याची उंची २० फुट असुन त्याची मूळ उंची ३० फुटापर्यंत असावी असे कोटाच्या भिंतीवर लाकडी वाशाकरिता असलेल्या खोबण्या वरून लक्षात येते.कोटाच्या आतील भागात राहण्याची,पाण्याची वा साठवणीची कोणतीही सोय आढळत नाही पण गुप्तधनाच्या लालसेने खोदलेले खड्डे व शेंदूर फासलेले दगड दिसून येतात. याच्या एकंदरीत रचनेवरून हा लढवय्या बुरुजही नाही.या कोटाचा उपयोग केवळ जकात वसुलीसाठीच अथवा प्रासंगिक अटकाव करण्यासाठी केला जात असावा.या कोटाविषयी कोणतीही ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्याला स्थानिक गावच्या नावाने दहिसर कोट अथवा दहिसर माडी म्हणुन ओळखले जाते.कोटाची सध्याची अवस्था फारच दयनीय झाली असुन भिंतीवर झाडे उगवली आहेत. कोट पाहण्यास १० मिनिटे पुरेशी होतात. किल्ले वसई मोहिमेचे प्रतिनिधी डॉ. श्रीदत्त राउत व त्यांचे सहकारी प्रत्येक पावसाळ्यानंतर श्रमदानाने या कोटास झाडीतून मोकळा करून करत गतवैभवाचे सरंक्षण करण्याची भक्कम कामगिरी करत आहेत. वसई प्रांतातील वास्तू व पराक्रम येणाऱ्या पिढीना कळlवा यासाठी धडपडणारी किल्ले वसई मोहीम कौतुकास पात्र आहे. -------------------सुरेश निंबाळकर

जिल्हा -पालघर 
श्रेणी  - सोपी 
दुर्गप्रकार -भुईकोट

दहिसर कोट 

DIRECTION