जिल्हा -सिंधुदुर्ग 
श्रेणी  - सोपी 
प्रकार -  समुद्रकिनारा

सागरेश्वर

मुंबई- कोकणाला महाराष्ट्रातील 720 किलोमीटरची अरुंद अशी किनारपट्टी लाभली आहे. पश्चिमेस अरबी समुद्र तर, पूर्वेला समांतर अशा सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. येथील जैवविविधता, परंपरा, पाककृती आणि भाषांमध्ये कोकणाचे वेगळेपण आहे. उत्तरेकडील बोर्डीपासून ते दक्षिणेकडील शिरोडा पर्यंत पसरलेला कोकणचा महाराष्ट्रातील समुद्रकिनारा विस्मयकारक नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दक्षिणेला असलेले अत्यंत निसर्गरम्य ठिकाण म्हणजे वेंगुर्ला. पश्चिमेला अथांग पसरलेला अरबी समुद्र आणि तीनही बाजूंनी सह्याद्रीच्या छोट्या डोंगररांगांनी वेढलेले हे नितांत सुंदर गाव म्हणजे कोकणी संस्कृती आणि ग्रामीण जीवनाचा अगदी अर्क आहे. काजू, आंबा, नारळ आणि विविध प्रकारच्या वनस्पतींनी नटलेला इथला हिरवागार निसर्ग पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करून टाकतो. वेंगुर्ल्याच्या परिसरात असलेली दाभोळी, तुळस आणि मोचेमाड ही छोटी गावे आजही शहरी दगदगीपासून खूप दूर असलेली आणि कोंकणी परंपरा जपणारी अशी रम्य ठिकाणे आहेत. वेंगुर्ला तालुक्यात अत्यंत सुंदर आणि अप्रतिम सागरी किनारे आहेत. वेंगुर्लेपासून अवघ्या तीन कि.मी. वर सागरेश्वर हा असाच सुंदर सागरकिनारा आहे. सागरेश्वर येथील समुद्रकिनारा अत्यंत प्रेक्षणीय असाच आहे. फिक्कट, पांढ-या, मऊशार वाळूने व्यापलेला हा लांबलचक किनारा पर्यटकांना स्वर्गीय आनंद देतो. सागरेश्वर किनाऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे चमकदार चंदेरी वाळूचे लांबलचक पट्टे, चममचता किनारा आणि नितळ निळे पाणी. या किनाऱ्यावर सागरेश्वर देवाचे एक लहानसे सुंदर मंदिर आहे. या किनाऱ्यावर सुरुच्या बनांची किनार आहे. येथून वेंगुर्ले बंदराचे विहंगम दृश्य पाहता येते. डॉल्फिन दर्शनासाठी हा किनारा प्रसिद्ध असुन हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स सागरेश्वर समुद्रकाठ आणि कुडाळ जवळ उपलब्ध आहेत. राहण्यासाठी व उत्कृष्ट कोकणी जेवणासाठी अनेक हॉटेल्स उपलब्ध आहेत. समुद्रकिना-याच्या उंच टेकडीवर शासनाचे 'सागर' हे अत्यंत रमणीय विश्रामगृह आहे. संध्याकाळी या ठिकाणाहून सूर्यास्ताचे दर्शन करण्यासाठी बरीच गर्दी असते. सकाळचा सूर्योदय देखील येथून सुंदर दिसतो. शासनाने वेंगुर्ला ते मालवण हा जवळजवळ ४० किलोमीटरचा सागरी महामार्ग नुकताच विकसित केला आहे. समुद्राच्या काठाकाठाने माडांच्या अन् पोफळीच्या बागातून चढ उतारांचा आणि वळणांचा हा अत्यंत देखणा रस्ता असून केवळ त्या रस्त्याने रमतगमत प्रवास करणे हाच एक मोठा आनंद आहे. मुंबईहून रेल्वेने सांवतवाडी व तेथून साधारण २८ ते ३० किलोमीटर अंतरावर वेंगुर्ला आहे. मुंबईहून राष्ट्रीय महामार्गाने आल्यास कुडाळहून ही वेंगुर्ल्याला जाता येते. कुडाळ-वेंगुर्ला २२ ते २५ किलोमीटर अंतर आहे. अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेल्या वेंगुर्ला शहराची नवीन ओळख ही वेगाने विकसित होणारे पर्यटनस्थळ म्हणूनच करून द्यायला हवी.