अजंठा सराई

अजंठा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ती जगप्रसिद्ध अजंठा लेणी. या अजंठा लेण्यांचा प्रभाव पर्यटकावर इतका आहे की या लेण्यापुढे या भागातील इतर ऐतिहासिक वास्तु पुर्णपणे दुर्लक्षित झाल्या आहेत. यापैकी एक वास्तू म्हणजे खुद्द अजंठा गावाचा नगरदुर्ग अजंठा कोट व या कोटाचा बालेकिल्ला म्हणजे अजंठा गढी(सराई). औरंगाबाद–जळगाव या महत्वाच्या शहरांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे अजंठा. कधीकाळी भरभराटीला असलेले हे नगर आज केवळ अजंठा लेण्यामुळे आपली ओळख टिकवून आहे. औरंगाबादपासून साधारण ९५ कि.मी. वर अजिंठा गाव आहे तर जळगावहून येताना सोयगाव फाट्यावरून साधारण १५ कि.मी. वर अजिंठा घाट ओलांडताच महामार्गावर अजिंठा गाव आहे. अजंठा कोटाचे साधारणपणे दोन भाग पडतात. एक म्हणजे अजंठा नगरदुर्ग म्हणजेच गावाभोवती असणारा भुईकोट (अजंठा कोट हि वेगळी वास्तु असल्याने तिच्याबद्दल अजंठा कोट या पानावर सविस्तर माहिती दिली आहे.) दुसरा भाग म्हणजे खाशा लोकांसाठी म्हणजे राजपरीवारासाठी व सैनिकासाठी या भुईकोटाच्या आतच एका टोकाला पण या भुइकोटापासुन अलिप्त असणारी गढी (सराई). अष्टकोनी आकाराची हि गढी नगरकोटाचा एक भाग असुन गावाचा संपर्क टाळण्यासाठी या गढीसाठी पाण्याची वेगळी व्यवस्था केलेली असुन बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र दरवाजाची सोय आहे. अंदाजे ५ एकरवर पसरलेल्या या गढीच्या तटबंदीत ८ बुरुज, दोन मुख्य दरवाजे, २ उपदरवाजे, तटबंदीवरील चर्या, तटावर जाणारे जीने, तटबंदीतील कमानी व कोठारे व इतर वास्तु आजही मोठया प्रमाणावर शिल्लक आहेत. मुघल काळात बांधल्या गेलेल्या या गढीवर पुर्णपणे मोगल वास्तुशैलीचा प्रभाव जाणवतो. वाघुर नदीकाठी असलेल्या या गढीच्या एका बाजुला वाघुर नदीचे पात्र, दुसऱ्या बाजुला अजंठा कोटाची तटबंदी व जमिनीच्या बाजूने खंदक होता पण आता जमिनीच्या बाजुचा खंदक पुर्णपणे बुजलेला आहे. औरंगाबादहून जाताना अजिंठा गावाच्या साधारण एक कि.मी. अलीकडे डावीकडे अजिंठा भुईकोट किल्ल्याचा दरवाजा नजरेस पडतो. या वाटेने कोटात आत शिरून काही अंतर पार केल्यावर डाव्या बाजुने पुढे गेल्यास एक चौक आहे. या चौकातुन उजवीकडे लांबवर अजंठा गढीचा(सराई) महादरवाजा दिसुन येतो. या वाटेने सरळ पुढे आल्यास आपला मुख्य दरवाजाने अजंठा गढीत प्रवेश होतो व समोरच गढीचा दुसरा दरवाजा आहे. गढीचे दरवाजे २५ फुट उंच असुन दरवाजावर चारही बाजूस चार स्तंभ दिसुन येतात. दोनही दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन तटबंदीत कोठारे बांधलेली आहेत. दोन्ही महादरवाजाचे लाकडी दरवाजे आजही शिल्लक असुन या दरवाजाच्या शेजारील जिन्याने गढीच्या तटबंदीवर चढून जाता येते. संपुर्ण तटबंदीला जागोजागी मारगीरीसाठी जंग्या ठेवलेल्या दिसुन येतात. या दरवाजावरून गावाभोवताली बांधलेला तट दिसुन येतो. तटावरून गढीला फेरी मारताना आतील अवशेष व वाघुर नदीकाठी असलेल्या अजिंठा भुईकोट किल्ल्याच्या तटबंदीचा काही भाग नजरेस पडतो. तटावर चढण्यासाठी आठ ठिकाणी अंतर्गत जिने असुन सहा ठिकाणी अतिक्रमण झाल्याने केवळ दोन ठिकाणाहुन तटावर जाता येते. गढीच्या तटबंदीवर खूप मोठया प्रमाणावर अतिक्रमण झालेले असुन तटबंदीतील कोठारात देखील शाळा भरते. गढीच्या आत एक जुनी विहीर असुन ती आज देखील वापरात आहे. कोटाच्या दुसऱ्या महादरवाजा बाहेर एक अष्टकोनी ढासळलेली पुष्कर्णी असुन तिच्या काठावर बरेचसे हिंदूधर्मीय अवशेष दिसुन येतात. या पुष्कर्णीच्या पुढे काही अंतरावरील दफनभूमीत अजिंठा लेणी संदर्भातील प्रसिद्ध पारो- रॉबर्ट या प्रेमप्रकरणातील पारोची समाधी आहे. या कोटाचा इतिहास अज्ञात असून याची निर्मिती औरंगजेबाच्या काळात झाल्याचे स्थानिक सांगतात पण अजंठा गढीच्या बाहेर असणारी पुष्कर्णी व जवळच असणारी अजंठा लेणी पहाता येथे त्याआधी पासुन येथे वस्ती असावी असे वाटते. अजंठा लेणी पहायला आल्यावर अजिंठा गढी सहजपणे पहाता येते. मध्ययुगीन बांधकामाची साक्ष असणारी हि गढी दुर्गती होण्यापुर्वी एकदा तरी पहायला हवी. अजंठा कोट व अजंठा गढी पाहण्यास दोन तास तरी हवेत.-------------------सुरेश निंबाळकर

जिल्हा - औरंगाबाद   
श्रेणी  - सोपी   
दुर्गप्रकार - भुईकोट