विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा तालुक्यात आडगावराजा नावाचे गाव आहे. स्वराज्यसंस्थापक शिवाजी महाराज यांचे आजोबा राजे लखोजीराव जाधव ह्यांच्या वतंनदारीतील हे एक महत्वाचे गाव होते. इतिहासाशी नाते सांगणारा राजे जाधव यांचा सुंदर भुईकोट आजही आपल्याला या गावात पहायला मिळतो. राजे लखोजीराव जाधव यांचा शस्त्रसाठा त्यांचे मोठे बंधु राजे जगदेवराव यांच्या ताब्यात आडगावराजा येथे असल्याचे सांगीतले जाते. याची साक्ष देणारी भुमीगत तळघरे आजही आपल्याला या कोटाच्या आत पहायला मिळतात इतकेच नव्हे तर १९८७ साली परकोटाच्या आवारात खोदकाम करताना काही तोफा आढळल्याचे वाचनात येते पण त्याचे पुढे काय झाले ते कळत नाही. आजही आपले अस्तित्व बऱ्यापैकी जपून असलेल्या या कोटाला एकदा तरी भेट दयायला हवी. आडगावराजा बुलढाणा शहरापासुन ९० कि.मी.वर तर जालन्याहुन सिंदखेडराजा मार्गे ४२ कि.मी.अंतरावर आहे. सिंदखेडराजा ते आडगावराजा हे अंतर फक्त १३ कि.मी. आहे. आडगावराजा गाव या कोटाच्या सभोवताली पसरलेले असुन गावात प्रवेश करताना कोटाचा पश्चिमोत्तर बुरुज व आतील उंचवट्यावर असलेली गढीतील वास्तु नजरेस पडते. आडगावराजा हि जाधवरावांची गढी म्हणुन ओळखली जात असली तरी प्रत्यक्षात ह्याची बांधणी मात्र एखाद्या भूईकोटाप्रमाणे आहे. रचीव दगडात साधारण १५ फुट उंच तटबंदी असलेल्या या भुईकोटाची रचना दशकोनी आकाराचा परकोट व मध्यभागी असलेल्या उंचवट्यावर चौकोनी आकाराचा बालेकिल्ला अशी दोन भागात केलेली आहे. परकोटाच्या तटबंदीत प्रत्येकी एक कोनावर एक असे दहा तर बालेकिल्ल्याच्या तटबंदीत चार टोकाला चार असे खणखणीत चौदा बुरुज कोटाला आहेत. यातील परकोटातील एक व बालेकिल्ल्यातील एक असे दोन बुरुज पुर्णपणे नष्ट झाले असुन उर्वरित १२ बुरुज आपले अस्तीत्वासाठी काळाशी झुंजत आहेत. कोटाचा एकुण परीसर साधारण सात एकरचा असुन परकोट ५ एकर तर बालेकिल्ला २ एकर असा दोन भागात विभागला आहे. गावात शिरल्यावर तटबंदीला वळसा घालत आपण तटबंदीच्या पुर्व दिशेला असलेल्या उत्तराभिमुख दरवाजात पोहोचतो. कोटात थेट प्रवेश करता येऊ नये यासाठी या दरवाजात रणमंडळाची रचना दिसुन येते. या दरवाजाच्या बाहेरील बाजुस तटबंदीतील दुसऱ्या बुरुजावरून मारा करण्याची सोय आहे पण सध्या या दरवाजासमोर तटबंदीला लागुन घरे बांधली असल्याने हि रचना पहाता येत नाही. मुख्य दरवाजा थेट तटबंदीत बांधलेला नसुन तो तटबंदीबाहेरील बाजुस दुसरी वळणदार भिंत बांधुन त्यात बांधला आहे. दरवाजाच्या आतील बाजुस दुसरी भिंत बांधुन थेट आत होणारा प्रवेश अडविला आहे. या दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. याशिवाय परकोटाच्या दक्षिणेकडील तटबंदीत अजून एक लहान दरवाजा पहायला मिळतो. परकोट व बालेकिल्ला यामधील सपाटीवर कोणतेही अवशेष नाहीत त्यामुळे दरवाजातून आत शिरल्यावर थेट बालेकिल्ल्यातील इमारतीच्या दिशेने निघावे. हि इमारत व त्याखाली जमीनीच्या पोटात असलेली तळघरे व त्यात उतरणारे भुयारी मार्ग हे या कोटाचे खास वैशिष्ट आहे. बालेकिल्ल्याची तटबंदी मोठया प्रमाणात उध्वस्त झाली असुन त्यात असलेला दरवाजाही आज पुर्णपणे नष्ट झाला आहे. बालेकिल्ल्याच्या सर्वात उंच ठिकाणी असलेली हि वास्तु म्हणजे या कोटाची सदर असावी. पुर्णपणे घडीव दगडात बांधलेल्या या वास्तुचा दर्शनी भाग कमानीबद्ध बांधला असुन मधील कमानीत दरवाजा आहे. या दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक असुन या दरवाजात आत शिरण्यासाठी दिंडी दरवाजा आहे. या दरवाजातुन आत शिरल्यावर हा दरवाजा बंद करण्यासाठी भिंतीत सरकवलेला लाकडी अडसर पहायला मिळतो. या वास्तुच्या आतील चौथऱ्यावर अनेक कमानीदार ओवऱ्या असुन छतावर जाण्यासाठी भिंतीत दरवाजा व जिना आहे तर तळघरात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या इमारतीच्या छतावरून संपुर्ण आडगावराजा गाव व खुप दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. येथुन तळघरात उतरणाऱ्या वाटेवर नंतरच्या काळात भिंत बांधलेली असुन तेथुन आत जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. या वास्तुच्या मागील बाजुस जाऊन तेथुन पश्चिमेच्या दिशेने गेले असता एका मोठया वाड्याचा चौथरा व काही अवशेष नजरेस पडतात. या ठिकाणाहुन देखील तळघरात उतरण्यासाठी मार्ग आहे पण त्यावर मोठया प्रमाणात काटेरी झाडी वाढल्याने आत उतरणे जिकीरीचे आहे. येथुन दक्षिणेच्या दिशेने बालेकील्ल्याखाली गेले असता या बाजुला बालेकिल्ल्याच्या तटबंदीत एक लहान दरवाजा दिसतो. या दरवाजाने मात्र आपल्याला तळघरात जाता येते. बालेकिल्ला शोधक नजरेने फिरल्यास दोन ठिकाणी या तळघरात प्रकाश येण्यासाठी ठेवलेले पण सद्यस्थितीत बुजलेले दोन झरोके पहायला मिळतात. तळघरात हवा व प्रकाश येण्यासाठी ठेवलेले झरोके वरील बाजुस पडझड झाल्याने बुजले आहेत त्यामुळे आत फिरताना विजेरीचा वापर करावा. आत सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर असल्याने भिंतीला स्पर्श न करता सावधतेने वावरावे. येथे जमिनीखाली एकुण सहा तळघरे असुन ती सर्व एकमेकाशी लहान मार्गाने जोडली गेली आहेत तर वरील बाजुस तीन ठिकाणी या तळघरात उतरण्यासाठी मार्ग असुन यातील सदरेमधील मार्ग बुजवला गेला आहे. तळघरातून बाहेर पडल्यावर सरळ दक्षिणेकडील परकोटाच्या तटबंदीकडे गेले असता येथे ढासळलेला दुसरा लहान दरवाजा पहायला मिळतो. कोटाबाहेर दक्षिणेस दगडी बांधकाम केलीली जुनी विहीर असुन या विहीरीत उतरण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. या ठिकाणी आपली गडफेरी पुर्ण होते. परकोटाच्या आतील बाजुस जाधवरावांच्या वंशजांची घरे आहेत. बालेकिल्ला व संपुर्ण परकोट पहाण्यास एक तास पुरेसा होतो. निजामशाही व आदिलशाही काळात स्वतःच्या कर्तुत्वावर व पराक्रमावर काही मराठा घराणी उदयास आली त्यात सिंदखेडकर जाधवराव हे एक प्रमुख घराणे होते. सोळाव्या शतकात मुळे घराण्याकडे असलेली सिंदखेडची देशमुखी इ.स.१५७६ साली लखुजी जाधवाना मिळाली व सिंदखेडच्या भरभराटीला सुरवात झाली. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई हि लखुजी जाधवरावांची कन्या होती. २५ जुलै १६२९ रोजी राजे लखुजी जाधव, त्यांचे दोन पुत्र अचलोजी व राघोजी आणी नातु यशवंतराव यांचा निजामशहाने देवगिरीच्या दरबारात खुन केला. राजे लखुजी जाधव यांच्या चार पुत्रांच्या वंशजशाखा त्यांना वतनी असलेल्या सिंदखेडराजा, देऊळगावराजा, आडगावराजा, किनगावराजा, मेहुणाराजा, उमरद व जवळखेड या ठिकाणी विस्तारल्या आहेत. -----------सुरेश निंबाळकर

आडगाव राजा

जिल्हा - बुलढाणा

श्रेणी  -  सोपी

दुर्गप्रकार- भुईकोट