माचाळदुर्ग

कोकणातील थंड हवेचे ठिकाण म्हणून सह्याद्रीच्या रांगेत असलेले माचाळ हे पर्यटनस्थळ नव्याने विकसीत होत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या स्थळाचा ब वर्ग पर्यटन स्थळात समावेश केला आहे. माचाळ गावाच्या पठारावर असलेल्या मुचकुंदी ऋषींच्या गुहेला अनेकजण भेट देतात पण गावाच्या नावानेच ओळखला जाणारा माचालदुर्ग मात्र कोणालाच परिचित नाही. मला माचाळचा उल्लेख माचाळदुर्ग म्हणुन गुरुवर्य अप्पा परब यांच्याकडून मिळाला तोवर मलादेखील माचाळदुर्ग नावाचा किल्ला असल्याचे ठाऊक नव्हते. गुरुवर्य अप्पा परब यांनी पन्हाळा-पावनखिंड-विशालगड या मोहीमेत समारोपाच्या भाषणात विशाळगड समोर असलेल्या माचाळदुर्गचा उल्लेख केला व हा किल्ला माझ्या किल्ल्यांच्या यादीत सामील झाला मात्र याची स्थाननिश्चिती होत नव्हती. अनेकांशी चर्चा करताना माचाळला दुर्ग तरी आहे का? यावरच प्रश्नचिन्ह उभे रहात होते. अखेरीस कोल्हापुरचे तरुण दुर्गअभ्यासक शिवप्रसाद शेवाळे यांनी विशाळगडच्या समोरच असलेल्या टेकडीवर या किल्ल्याचे अवशेष असल्याची जुजबी माहिती दिली व त्या अनुषंगाने आम्ही या किल्ल्याची शोधमोहीम करण्याचे ठरवले. माचाळच्या या भटकंतीत मला जे दिसले व जाणवले ते सर्व मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या लांजा या तालुक्याच्या ठिकाणाहुन माचाळ गावाच्या पायथ्याशी असलेले चिंचुर्ती गाव ३२ कि.मी.अंतरावर आहे. येथुन माचाळ गावात जाण्यासाठी साधारण पाउण तासाचा चढ चढावा लागतो. माचाळ गावातुन गावाच्या ईशान्य दिशेला असलेल्या माचाळदुर्गाच्या टेकडीवर जाण्यासाठी पुन्हा ४५ मिनिटांची पायपीट करावी लागते. माचाळ दुर्गावर जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे विशाळगडाचा कोकण दरवाजा. कोकण दरवाजाने खाली दरीत उतरून समोरील झाडीभरल्या माचाळ दुर्गाच्या टेकडीवर जाता येते. कोकण दरवाजाच्या या वाटेने गडावर जाण्यासाठी फक्त पाउण तास लागतो शिवाय माचाळ गावातील गावकरी विशाळगडवर जाण्यायेण्यासाठी याच वाटेचा वापर करत असल्याने वाट पुर्णपणे मळलेली आहे. किल्ल्याच्या अवशेषांची मात्र टेकडीवर शोधाशोध करावी लागते. कोकण दरवाजाने खाली दरीत उतरून पुन्हा माचाळचा डोंगर चढताना दरीत व माचाळच्या डोंगराला लागुन १५-२० पायऱ्या बांधलेल्या आहेत. या पायवाटेने डोंगर चढायला सुरवात केल्यावर पायवाटे शेजारी विशालगडाच्या दिशेने दारीकाठावर तटबंदीत असलेले काही घडीव दगड पहायला मिळतात. या वाटेने टेकडीच्या वरील भागात जाताना काही ठिकाणी ढिगाऱ्यात रुपांतर झालेली तटबंदी जाणवते. पायवाटेने टेकडीच्या माथ्यावर आल्यावर माथा डावीकडे व दरी उजवीकडे ठेवुन पुढे जाताना वाटेला लागुनच डाव्या बाजुस किल्ल्याच्या बुरुजाचा गोलाकार पाया व त्यावरील घडीव दगड पहायला मिळतात. येथुन पुढे उर्वरीत अवशेष पाहण्यासाठी मात्र आपल्याला झाडीत व दरीच्या काठाने शोध मोहिम करावी लागते. बुरुजाला लागुन एक वाट वरील झाडीच्या दिशेने जाते. या झाडीत आपल्याला काही लहान लहान वास्तुंचे चौथरे पहायला मिळतात. या शिवाय झाडीतच एका ठिकाणी मूर्तीच्या आकाराचे पण झिजुन पुर्णपणे सपाट झालेले काही दगड पहायला मिळतात. हि झाडी पार करुन पुढे गेल्यावर विशालगडाच्या दिशेने उतारावर असलेले अजून दोन उध्वस्त बुरुजांचे पाया दिसतात. उर्वरीत अवशेष झाडीने झाकुन गेले असल्याने मोठ्या प्रमाणात नष्ट झाले आहेत. गडाची समुद्र सपाटी पासुन उंची ४००० फुट असुन त्रिकोणी आकाराचा गडमाथा साधारण ३ एकरवर पसरलेला आहे पण हा माथा पुर्णपणे झाडीने भरलेला आहे. झाडीमध्ये अवशेषांची शोधाशोध करण्यास साधारण तास-दीड तास लागतो. आज्ञापत्रातील वचनानुसार किल्ल्यासमीप दुसरा डोंगर असु नये असल्यास तोडुन गडाच्या आहारी आणावा अथवा तटाबुरुजांचे पागोटे घालुन बंदीस्त करावा. या वचनानुसार माचाळदुर्गाची रचना आढळते पण शिवकाळात या किल्ल्याचा कोणताही उल्लेख येत नाही. याच अर्थ शिवकाळात हा किल्ला ओस असावा अथवा तेथे केवळ पहाऱ्याची चौकी असावी.------सुरेश निंबाळकर

जिल्हा - रत्नागिरी

श्रेणी  -  मध्यम

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग