रायगड जिल्ह्यातील महाड शहराला सातव्या शतकापासूनचा वैभवसंपन्न इतिहास आहे. सावित्री, गांधारी आणि काळ नदीच्या तीरावर असलेल्या महाड तालुक्यात गांधारी नदीकाठी सातव्या शतकातील गांधारपाले या बौद्धकालीन लेणी आहेत. महाहट्ट म्हणजेच मोठी पेठ या पाली शब्दाचा अपभ्रंश होत पुढे महाड हे नाव झाले अशी महाडची ओळख आहे. मुंबई-गोवा महामार्गाने महाड शहरात जाताना ३ कि.मी. आधी डावीकडील डोंगरात कोरलेली गांधारपाले लेणी आपले लक्ष वेधून घेतात. दक्षिणोत्तर पसरलेल्या टेकडीवर पायथ्यापासून साधारण २०० फुट उंचीवर ही पूर्वाभिमुख लेणी आहे. पायथ्याजवळ पुरातत्व विभागाने फलक लावलेला असुन येथुन अर्ध्या तासात पायऱ्या चढून आपण लेण्यांपर्यत पोहोचतो. पायऱ्या चढून गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला २८ क्रमांकाचे लेणे दिसते. पुरातत्व खात्याने या लेण्यांना १-२८ असे क्रमांक दिले असुन १ क्रमांकाच्या लेण्यापासून सुरवात केल्यास सर्व लेणी व्यवस्थितपणे पहाता येतात. तीन स्तरात कोरलेल्या या लेणी समूहात २८ लेणी असुन त्यात ३ चैत्यगृह,१९ विहार व अनेक पाण्याची टाकी कोरलेली आहेत. अभ्यासकांच्या मते ही लेणी कंभोग वंशातील विष्णू पुलित या राजाने खोदलेली असुन पाले हा पुलित नावाचा अपभ्रंश आहे. लेण्यांसमोरून महाड शहर, चांभारगड, सावित्री नदी, मुंबई-गोवा महामार्ग असा सुंदर देखावा बघावयास मिळतो. लेणी क्र. १ – चैत्यगृह आणि विहार अशा पद्धतीच्या या लेण्याला सात कमानी आहेत. लेण्याच्या दर्शनी भागात असलेल्या सहा स्तंभांपैकी एक स्तंभ पूर्णपणे कोरलेला असून उर्वरीत पाच अर्धवट आहेत. लेण्यासमोर प्रांगण असुन मुख्य दालन आणि स्तंभ यां दरम्यान व्हरांडा आहे. या दालनाला तीन दरवाजे व दोन खिडक्या आहेत. दालनाच्या समोरच्या भिंतीत मध्यभागी गर्भगृह आणि गर्भगृहाच्या शेजारी दोन्ही बाजूना दोन दोन विहार असुन डाव्या बाजूच्या भिंतीत चार विहार आहेत. या दालनाच्या आत चारी बाजूनी ओटा आहे. गर्भगृहात भगवान बुद्धांची सिंहासनावर बसलेली मुर्ती कोरलेली आहे. मूर्तीखाली धर्मचक्र व हरणे कोरलेली असुन वरील बाजूस चवरीधारी आणि आकाशात उडणारे यक्ष कोरले आहेत. मूर्तीच्या मागील बाजुस आसनस्थ मुर्तीचा आराखडा कोरलेला असुन उर्वरीत दोन बाजुस वज्रपाणी आणि पद्मपाणी यांची झीज झालेली शिल्प आहेत. या ठिकाणी हीनयान काळात उभारलेल्या स्तूपाचे महायान काळात मुर्तीत रुपांतर करण्यात आले असावे. या लेण्याच्या पुढील भागात पाण्याची तीन टाके आहेत. लेणी क्र. २ – हे अर्धवट कोरलेले लेणे असुन याच्या दर्शनी दोन खांब व विहार अशी याची रचना आहे. लेणी क्र. ३ – या लेण्यात उजवीकडे पायरी असलेला कट्टा कोरलेला असुन दर्शनी भागात २ स्तंभ व त्यामागे दगडी ओटे आहेत. स्तंभ खालील बाजुस चौकोनी तर वर अष्टकोनी आहेत. व्हरांड्याच्या भिंतीना गिलावा केलेला आहे. येथुन खाली उतरत जाणाऱ्या पायऱ्या लेणी क्र. ४ कडे जातात. लेणी क्र. ४ –या लेण्याच्या दर्शनी भागात दोन स्तंभ आणि अर्धस्तंभ असून व्हरांडा, दालन व विहार अशी याची रचना आहे. दालन हे विहारापेक्षा मोठे असून व्हरांड्याच्या उजव्या भिंतीवर ब्राम्ही शिलालेख कोरलेला आहे. लेणी क्र. ५ – या लेण्याची रचना मंडपासारखी असुन आत दालन आहे. याच्या दर्शनी भागात चार स्तंभ असुन हे स्तंभ तळात चौकोनी तर वरील बाजुस अष्टकोनी असुन त्यावर भौमितीय आकाराची नक्षी आहे. दालनाच्या आत तिन्ही बाजुस कट्टे आहेत. लेणी क्र. ६ – हे खालच्या स्तरात अर्धवट कोरलेले लेणे असुन या लेण्याजवळ दोन पाण्याची टाकी आहेत. लेणी क्र.७ –या लेण्याचा दर्शनी भाग कोसळला असुन व्हरांडा व विहार अशी याची रचना आहे. लेणी क्र. ८ –चैत्यगृह व विहार अशी याची रचना असुन दर्शनी भागात दोन तुटलेले स्तंभ आणि दोन चौकोनी आकाराचे नक्षी कोरलेले अर्धस्तंभ आहेत. तुटलेल्या स्तंभांवरील घट आणि हर्मिका आजही शिल्लक आहेत. लेण्याच्या आत दोन्ही बाजुस तीन-तीन विहार असुन मध्यभागी असलेल्या विहारातील स्तुप नष्ट झाला असला तरी छतावरील हर्मिका व तळाशी स्तूपाचा गोलाकार दिसून येतो. ह्या लेण्यात उजव्या बाजूच्या भिंतीवर अर्धस्तंभाच्या बाजूला प्राकृत भाषा आणि ब्राह्मी लिपीतील शिलालेख कोरलेला आहे. याचे वाचन असे १ ओळ- सिधं कुमारस काणभोअस व्हेणुपालितस २ ओळ- (ए)स लेण चेतिएघर ओवरका च अठ ८ विकमं नियु ३ ओळ- तं ले(ण)स च उभतो पसेसु पोढियो बे २ लेणस ४ ओळ- अलिगणके पथो च दतो एतस कुमारस देय याचा अर्थ- सिद्धी असो. कुमार कानभोज विष्णुपालित याने लेणे, चैत्यगृह, आठ ओवऱ्या, लेण्याच्या दोन्ही बाजूस एक एक टाके व लेण्याचा मार्ग यांची दिलेली देणगी दिली. लेणी क्र. ९ – या लेण्यातील दालनाला दरवाजा व दोन खिडक्या असुन ओसरीत उजव्या बाजुस कट्टा कोरलेला आहे. या ओसरीला इतर लेण्यांप्रमाणेच खांब आणि अर्धस्तंभ आहेत. लेणी क्र. १० – या लेण्याची पडझड झालेली असुन लेण्याचे खांब तळाशी चौकोनी आणि वरती अष्टकोनी असुन त्यावर भौमितीय नक्षी आहे. या लेण्याच्या कट्ट्यावर कोरीव काम आहे. लेणी क्र.११ आणि १२– या लेण्यांच्या दर्शनी भागात दोन स्तंभ आणि दोन अर्धस्तंभ असुन व्हरांडा आणि दालन अशी यांची रचना आहे. १२ व्या लेण्याच्या दरवाजाबाहेर ओटा व पायऱ्या खोदलेल्या आहेत. लेणी क्र. १३ –या लेण्याला दरवाजा व दोन खिडक्या असुन दर्शनी भागात नक्षी कोरलेले चार स्तंभ आहेत. लेण्याच्या दरवाजात पायऱ्या कोरल्या असुन समोरच चौकोनी आकाराचे टाके आहे. लेणी क्र. १४ – हे अर्धवट कोरलेले लेणे असुन व्हरांडा व विहार अशी याची रचना आहे. लेणी क्र. १५ – हि लेणी म्हणजे कोनाड्यात कोरलेला लहान स्तूप असुन स्तुपावर गोलावर वेदिकापट्टी व वरील बाजुस छताला टेकलेली हर्मिका आहे. लेणी क्र. १६ – व्हरांडा, दालन आणि विहार अशी या लेण्याची रचना असून दालनाच्या दर्शनी असलेले स्तंभ पुर्णपणे झिजलेले आहेत. व्हरांड्याच्या डाव्या बाजुस एक विहार असुन त्यात बाहेरून प्रवेश करता येतो. दालनाला दरवाजा व दोन खिडक्या असुन तिन्ही भिंतीना ओटा खोदलेला आहे. दालनाच्या डाव्या बाजुस एक विहार कोरलेला आहे. लेणी क्र.१७ – अर्धवट कोरलेल्या या लेण्याची व्हरांडा व दालन अशी रचना आहे. लेणी क्र. १८ आणि १९ – व्हरांडा व दालन अशी रचना असलेल्या या लेण्याचे आतील खोदकाम अर्धवट आहे. १८ व्या लेण्याला दरवाजा व खिडक्या अशी रचना असुन दोन्ही लेण्यांच्या व्हरांड्यात कट्टे कोरलेले आहेत. लेण्यांच्या खांबांवर नक्षी कोरली आहे. लेणी क्र. २० – हे अर्धवट कोरलेले लेणे आहे. लेणी क्र. २१ – हे एक चैत्यगृह असून या लेण्यातील स्तूपावर वेदिकापट्टी आणि हर्मिका आहे. चैत्यगृहाच्या उजव्या भिंतीवर आसनस्थ बुद्धाची प्रतिमा असुन शेजारी चवरीधारी आहेत तर बुद्धांच्या डोक्यावर विद्याधरांनी मुकुट धरला आहे. शिल्पाच्या वरील भागात मकरतोरण असुन हे शिल्प ५-६ व्या शतकात महायान पंथीयांनी कोरले असावे. लेणी क्र. २२ – या लेण्याचा दर्शनी भाग कोसळलेला असुन व्हरांडा व विहार अशी या लेण्याची रचना आहे. लेणी क्र. २३ – व्हरांडा आणि दालन अशी या लेण्याची रचना असुन दालनाला दरवाजा व दोन्ही बाजुस खिडक्या आहेत. लेण्याजवळ पाण्याचे टाके असुन व्हरांड्यात अष्टकोनी व चौकोनी आकाराचे स्तंभ आहेत. लेणी क्र.२४– या लेण्याला दोन विहार असुन दर्शनी भागातील स्तंभ नष्ट झाले आहेत. लेणी क्र.२५ – या लेण्याची पडझड झाली असुन यातील विहाराला एक दरवाजा व खिडकी आहे. लेणी क्र.२६ –या लेण्याच्या स्तंभाची पडझड झाली असुन व्हरांडा, दालन व विहार अशी याची रचना आहे. लेणी क्र. २७ – व्हरांडा, दालन व विहार अशी याची रचना असुन दर्शनी भागात अष्टकोनी व चौकोनी चार खांब आहेत. या खांबावर भौमितीय नक्षी कोरली आहे. ओसरीच्या उजवीकडील भिंतीत गोलाकार स्तुप कोरला असुन त्यावर हर्मिका व वेदिका आहे. वेदिकेवर स्तंभ व त्यावर छत्रावली आहे. दालनाला दरवाजा व दोन खिडक्या आहेत. लेण्याच्या प्रांगणात उजव्या भिंतीवर शिलालेख कोरलेला आहे. या लेखाची लिपी ब्राह्मी आणि भाषा प्राकृत आहे. या लेखाचे वाचन असे १ ओळ -सिधं गहपतिस सेठिस संघरखितस पुतस वि २ ओळ - वादसिरिय देयधमं लेनं चेतियकोठि पा ३ ओळ — छेतानि यानि लेणस पेठा गोराव —- नं — ४ ओळ - ति छेतेहि करे ततो चेतिआस गध ५ ओळ- अठ ८ भतकंमानिका अठ ८ कोढिपुर ९ ओळ- कारणकारणे च लेणस सवेणा क—- या लेखात वादसिरिने (वादीश्री) लेणे, चैत्यकोठी (चैत्यगृह) व लेण्याच्या खालच्या बाजूस असलेली शेती दान दिल्याचा उल्लेख आहे. त्याचबरोबर गहपति (गृहपती) श्रेष्ठी (उच्चपदी विराजित) संघरखितच्या (संघरक्षित) मुलाचा उल्लेख लेखात असला तरी त्याचे लेखात नाव दिलेले नाही. लेणी क्र. २८ – पडझड झालेल्या या लेण्याची ओसरी, दालन व विहार अशी रचना असुन दालनाला मोडलेला दरवाजा व चौकोनी आहे. -----------सुरेश निंबाळकर

जिल्हा - रायगड

श्रेणी  - सोपी

प्रकार- लेणी

गांधारपाले