टंकाई लेणी 

नाशिक जिल्हय़ात सहय़ाद्रीच्या मुख्य रांगेबरोबर सेलबारी- डोलबारी-अजंठा-सातमाळ अशा विविध उपरांगा धावताना दिसतात. यातील अजंठा-सातमाळ डोंगररांगेतील अंकाई-टंकाई हा एक महत्वाचा किल्ला. यातील टंकाई किल्ल्याच्या डोंगरात असलेली दहाव्या ते बाराव्या शतकातील जैन लेणी या भागाचे प्राचीन महत्व अधोरेखित करतात. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या या लेण्यांना भेट देण्यासाठी वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. लेण्यांच्या पायथ्याशी असलेले अंकाई गाव मध्य रेल्वेवरील मनमाड स्थानकापासुन १० कि.मी.वर असुन मनमाड–औरंगाबाद रस्त्यापासुन १ कि.मी.आत आहे. अंकाई गावात जाण्यासाठी खाजगी वाहनांची सोय आहे. गावातील शाळेजवळुन लेण्याकडे जाण्यासाठी रस्ता असुन या शाळेच्या परिसरात आपल्याला २० फुट उंच दरवाजाची कमान व त्याला लागुन ठेवलेली काही कोरीव शिल्प पहायला मिळतात. या शाळेपासून काही अंतरावर चार फुट उंच व चारही बाजुस कोरलेली सतीशिळा असुन या शिळेच्या खालील बाजुस मुर्ती व शिकारीचा प्रसंग कोरलेला आहे. टंकाई किल्ल्याच्या पाव उंचीवर किल्ल्याच्या पोटात जैन लेणी खोदलेली असुन शाळेपासून काही अंतरावर पुरातत्व खात्याने या लेण्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. शाळेकडून या लेण्यापर्यंत जाण्यासाठी १० मिनिटे पुरेशी होतात. टंकाई टेंकडीच्या दक्षिणेकडील उतारावर दोन टप्प्यात हि एकुण सात लेणी कोरलेली आहेत. यातील दोन लेणी खालील भागात असुन एका लेण्यासमोर पाण्याचे टाके आहे. यातील पहिल्या लेण्यात काही मुर्ती असुन थोडेफार कोरीवकाम केलेले आहे पण दुसऱ्या लेण्यात मुर्ती किंवा कोरीवकाम पाहायला मिळत नाही. हे बहुदा अर्धवट कोरलेले लेणे अथवा विहार असावा. ही २ लेणी पाहुन १०-१२ पायऱ्या चढल्यावर आपण लेण्याच्या दुसऱ्या टप्प्यात येतो. येथे आपल्याला एकुण ५ लेणी कोरलेली दिसतात. हि सर्व जैन लेणी असुन दहाव्या ते बाराव्या शतकात कोरलेली असावीत. यातील पहिली दोन लेणी दुमजली असुन त्यांचे मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह असे तीन भाग आहेत. दर्शनी मुखमंडप दोन खांबांवर तोललेला असुन मंडपाच्या आतील दरवाजाच्या चौकटीवर मोठया प्रमाणात कोरीवकाम आहे. सभामंडप चार खांबांवर तोललेला असुन प्रत्येक खांबाच्या छताकडील टोकावर छताला आधार देणारे भारवाहक यक्ष कोरलेले आहेत. छताच्या मध्यभागी फुललेल्या कमळाची नक्षी कोरलेली आहे. सभामंडपातून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी जिना कोरलेला आहे. पहिल्या मजल्यावरचे दालन दोन स्तंभांवर तोललेले आहे. पहिल्या व दुसऱ्या लेण्याबाहेर पाण्याचे टाके कोरलेले आहे. पहिल्या व दुसऱ्या लेण्याचा दर्शनी भाग वगळता आतील रचना एकसमान आहे. दुसऱ्या लेण्याच्या मुखमंडपात डाव्या बाजुला यक्ष तर उजव्या बाजुस इंद्राणीची मूर्ती कोरलेली आहे. इंद्राणीच्या मूर्तीला सध्या भवानी मातेचे रुप देण्यात आलेले आहे. याचा सभामंडप देखील चार खांबांवर तोललेला असुन पहिल्या मजल्यावर जाणारा जिना सभामंडपात आहे. गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. पहिल्या मजल्यावरील दालनाच्या दर्शनी भागात असलेल्या भिंतीत चौकोनी नक्षी असलेली जाळी कोरलेली आहे. या जाळीच्या दोन्ही बाजुस शेपुट उंचावलेले दोन मोठे व्याल कोरलेले आहेत. तिसऱ्या लेण्याच्या मुख मंडपात डाव्या बाजुस कीचक तर उजव्या बाजुस अंबिकेची मुर्ती कोरलेली आहे. या लेण्यात आपल्याला झीज झालेला शिलालेख पहायला मिळतो. चौथ्या लेण्यामध्यें पुढें एक मोकळें दालन असून आंत दुसरें दालन आहे. यांत एक अस्पष्ट शिलालेख आहे. पाचव्या लेण्यात शांतिनाथ, पार्श्वनाथ आदी तीर्थंकरांच्या मुर्ती असुन एक गणेशमुर्ती आहे. या सर्व मुर्ती भग्न अवस्थेत असुन लेण्यातील स्तंभावर कोरीव काम केलेले आहे. उर्वरीत दोन लेणी पडीक असुन यात कोणतेही कोरीकाम दिसुन येत नाही. हा संपुर्ण लेणी समूह पहाण्यास एक तास पुरेसा होतो.----------------------सुरेश निंबाळकर

जिल्हा - नाशिक

श्रेणी  -  सोपी

प्रकार- जैन लेणी