यवतेश्वर हे सातारा शहरच्या पश्चिमेस सुमारे चार किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव आहे. येथे यादवकालीन बांधलेले श्री शंकराचे मंदिर व शेजारी ग्रामदैवत काळ भैरवनाथचे देवस्थान असून त्या देवाची यात्रा ही या भागातील सर्वात पहिली यात्रा असते. हे मंदिर यादवकालीन असून मंदिरात शंकराची मोठी पिंड आहे. या मंदिरात गाभाऱ्याच्या समोर दगडात कोरलेले दोन सुंदर नंदी आहेत. शेजारी काळ भैरवनाथाचे मंदिर आहे. काळभैरवाची मुर्ती द्रविडीयन पध्दतीची असुन मंदिराच्या कळसाची आतील बाजू पाहण्यासारखी आहे. या दोन्ही मंदिरांना सभोवताली भक्कम दगडी तटबंदी आहे.या तटबंदीच्या दक्षिणेकडील भिंतीत एक विरगळ ठेवला आहे. मंदिरासमोर एक मोठी दीपमाळ असुन मंदिराच्या आवारात इतरही काही मुर्त्या ठेवलेल्या आढळतात. मंदिराच्या पश्चिमेकडील पिण्याच्या पाण्याचे तळे देवतळे म्हणून ओळखले जाते. या तळ्याची बांधणी जांभ्या दगडातील वेगळ्या पध्दतीची असुन सध्या या तलावात जास्त पाणी टिकत नाही. या डोंगराची समुद्रसपाटी पासून उंची १२३० मीटर आहे. डोंगराच्या उत्तर बाजूच्या टेकडीवर भैरोबाचे मंदिर आहे. त्यास पेढयाचा भैरोबा म्हणतात. काहींच्या मते छत्रपती शाहू महाराजांनी यवतेश्वर महादेवाचे मंदिर बांधलेले आहे. येथूनच दूरवर कण्हेर धरण, सज्जनगड, जरंडेश्वेर व मेरुलिंगाचे दर्शन घडते. सभोवती गर्द झाडी, मोकळी व प्रसन्न हवा यामुळे वातावरण आल्हाददायी असते. डोंगरावरून सातारा शहराचे विहंगम दृश्य व अजिंक्यताऱ्याची दर्शनी बाजू नजरेच्या टप्प्यात येते. साताऱ्यातून दर अर्ध्या तासाला येथे येण्यासाठी एसटी, तसेच खासगी वाहनाची सोय आहे. या देवस्थानाची यात्रा दरवर्षी अश्विन अमावस्येला भरते. या यात्रेची सर्व जबाबदारी यवतेश्वर, सांबरवाडी, आंबेदरे येथील ग्रामस्थ पार पाडत असतात. पालखीची भव्य अशी मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात निघुन ती पालखी मंदिरापासून काही अंतरावर असणाऱया देवाच्या आंब्याच्या झाडा जवळ जावून त्या झाडाचे पूजन केले जाते. या देवाच्या आंब्याच्या झाडाचे खरे वैशिष्ट म्हणजे या यात्रेदिवशी झाडाला एका दिवसात मोहोर येवून पूजन झाल्यानंतर आंबे येतात. झाडाचे पूजन केल्यानंतर गावातील देवाचा भक्त त्या झाडावर चढून झाडाला आलेली आंब्याच्या मोहराची फांदी तोडून खाली आणून ती पालखीत ठेवली जाते. तेथून पालखी व त्या भक्ताला खांद्यावर घेवुन पालखीची मिरवणूक पुन्हा मंदिराकडे वाजत गाजत रवाना होते. या आंब्याचा मोहोर व आंबा आला की यात्रा झाली असे मानले जाते.

जिल्हा -सातारा 
श्रेणी  - सोपी 
प्रकार - शिवमंदिर 

यवतेश्वर