जिल्हा - ठाणे 
श्रेणी  - सोपी 
दुर्गप्रकार - सागरी  किल्ला

प्राचीन काळी कल्याण हे महत्वाचे बंदर होते. अरबी समुद्रातून उल्हासखाडी मार्गे जहाजांची ये-जा चालत असे. ह्याच जलमार्गावर घोडबंदर, नागलाबंदर ही प्राचीन बंदरे होती. ह्या बंदरांचे व जलमार्गाचे रक्षण करण्यासाठी घोडबंदर, नागलाबंदर, गोमुख व ओवले कोट हे चार किल्ले बांधले गेले. ठाणे- बोरीवली रस्त्यावर नागलाबंदर थांब्यावर उतरुन नागलाबंदर गावात चालत जाण्यास १० मिनीटे लागतात. मुख्य रस्त्यावर कोणताही नामफलक नसल्याने थोडे चौकशी करतच जावे लागते. बऱ्याच ठिकाणी नागलाबंदर किल्ला पुर्णपणे नष्ट झाल्याचे सांगुन नागलाबंदर किल्ल्यासमोर चर्च असणारी टेकडी किल्ला म्हणुन दाखवली जाते पण नागलाबंदर गावात खाडी शेजारी असलेल्या छोट्या टेकडीवर नागलाबंदर किल्ल्याचे बरेचसे अवशेष आजही काळाशी झुंजत उभे आहेत. ह्या टेकडीशेजारी असलेल्या दगडांच्या खाणीमुळे आणि अतोनात वाढलेल्या झुडुपांमुळे किल्ल्याच्या अवशेषांची पार दशा झालेली आहे व हे मुळ अवशेष कशाचे आहेत हे ओळखता येत नाहीत. उल्हास खाडीचे रक्षण करण्यासाठी कामवारी खाडीच्या मुखाशी पोर्तुगिजांनी या किल्ल्याची निर्मिती केली होती. सध्या या किल्ल्याचा वापर खाणकामगारांकडून शौचालय म्हणून करण्यात येत असल्याने किल्ला पाहताना सावधगिरी बाळगावी लागते. पोर्तुगीज अमलाची साक्ष देणारी अर्धवट बुजलेली एक टाकेवजा विहीर किल्ल्यात आहे. या कोटाच्या बांधणीत घडीव व अघडीव दगड, चिकटमाती, चुना, यांचा वापर केला गेला आहे. हि वास्तू दुमजली होती हे कोटाच्या भिंतीवर लाकडी वाशाकरिता असलेल्या खोबण्यावरूनही लक्षात येते. सदर कोटातील उपलब्ध अवशेष पाहता सदर कोट टेहळणीचे एक ठाणे आहे. याच्या सभोवतालच्या संरक्षक भिंती पडून गेल्याने याचे स्वरूप बदललेले आहे. या किल्ल्याच्या बांधकामात आढळणारी विशेष बाब म्हणजे खोबणीयुक्त विभाग वा दालन. याच्या अंतर्गत भागात भिंतीला समांतर अशी बैठकीची व्यवस्था आहे. ह्या अवशेषांची योग्यवेळी निगा न राखल्यास गोमुखकिल्ला व ओवले कोटाप्रमाणे नागलाबंदर किल्लाही काळाच्या उदरात नष्ट होईल. किल्ला छोटेखानी असून दहा मिनिटात पाहून होतो. लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. इ.स.१७३७ मध्ये मराठयांच्या वसई मोहिमेत नागलाबंदर किल्ला व परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातून उच्चाटन झाले. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी. ----------------------सुरेश निंबाळकर

नागलाबंदर कोट​