जिल्हा - रायगड 
श्रेणी  - मध्यम
प्रकार -वीरगळ/ धारातीर्थ 

कावले बावले खिंड

रायगडावरून आजुबाजुला नजर फिरवली की सह्याद्रीच्या बुलंद डोंगररांगा दृष्टीस पडतात. देशावरून कोकणात उतरणाऱ्या पायवाटा आणि दळणवळणासाठी वापरल्या गेलेल्या अनेक घाटवाटा रायगड परिसरात आहेत. सह्य़ाद्रीच्या रांगांतुन रायगडाकडे उतरायला सर्वात जवळची वाट म्हणजे कावले घाट. याच कावले घाटाच्या तोंडाशी असणारी कावला-बावला खिंड हि मराठयांच्या इतिहासात लढलेल्या एका रणसंग्रामाची साक्ष आहे. ज्याप्रमाणे घोडखिंडीने बाजीप्रभुंचा पराक्रम पहिला तसाच पराक्रम या कावल्या-बावल्या खिंडीने गोंदाजी जगताप आणि सरकले नाईक यांचा पाहीला. २५ मार्च १६८९ या दिवशी गोंदाजी जगताप आणि सरकले नाईक यांनी शहाबुद्दीनखानाच तीनशे सैन्य याच रणक्षेत्री कापून काढले परिणामी राजाराम महाराजाना रायगडाहुन सुरक्षित जिंजीला जाता आले. रायगड जिल्ह्यात सांदोशी गावाच्या डोईवर उभी असलेली गोदाजी जगताप व सरकले नाईक यांच्या पराक्रमाने पावन झालेली ही खिंड आजही दुर्लक्षित आहे.. कावले बावले खिंडीत जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक कोकणातील महाडमार्गे सांदोशी गाव गाठायचे. तेथील विरगळी व उध्वस्त शिवमंदिर पाहुन कावळ्या घाटाचा खडा पहाड चढून वर खिंडीत जायचे तर दुसरा देशावरून म्हणजे पुण्याजवळील पानशेतपासुन सुमारे तीस कि.मी.वर घोळ नावाचे एक गाव आहे. या गावापासून घोळ-गारजाईवाडी-कावले खिंड अशी भटकंती करत यायचे. कावले घाटाच्या अस्तित्वाच्या खुणा आजही इथे सापडतात. इथे खिंडीत एका दगडाला शेंदूर फासुन त्याची देव म्हणुन स्थापना केली आहे. येन खिंडीत वरील बाजुने घसरून येणारी माती अडवण्यासाठी दोनही बाजुला दगडी भिंत घातलेली आहे. कावळ्या घाटाच्या माथ्यावर कोकणदिवा हा घाटाचा संरक्षक दुर्ग उभा आहे. कोकणदिव्याच्या डाव्या बाजुने खाली उतरणाऱ्या वाटेलाच कावल्या घाट म्हणतात तर हि वाट जिथुन सुरु होते त्या खिंडीला कावल्या-बावल्याची खिंड म्हणतात. शिवकाळात या भागाचे फार मोठे महत्व होते. सह्याद्रीच्या रांगा आणि दोन नद्यांच्या खो-यात रायगडचा डोंगर असल्यामुळे रायगडावर सहजपणे पोहोचणे शक्य नाही. शिवकाळात घाटावरून येणारा माल कावले आणि बावले या दोन गावांच्या खिंडीतुन येई. इथे रायगड रक्षणासाठी चौकी तयार करून जवळच्या सांदोशी गावातील जीवा सरखेल या तरुणाला चौकीचा नाईक करण्यात आलं होतं. नाईक आणि त्याच्यासोबत नऊ पाईक अशी दहा जणांची ही चौकी होती़. सरकले नाईक आणि त्यांचे नऊ पाईक घाटातून कोकणात उतरण्यासाठी असणाऱ्या कावले बावले खिंडीची राखण करत होते. बैलांचे तांडे व लमाण या खिंडीतून सांदोशी गावातील मैदानात उतरत होते. या मैदानाच्या सपाट जागेत मालाची एक पेठ होती व या पेठेतुनच रायगडावर मालाचा पुरवठा होई. येथून डोईवरून सर्व प्रकारचा माल गडावर रवाना होत असे. शिवकालात या बाजारपेठेची इतकी भरभराट झाली कीं व्यापाऱ्यानी येथे मंदिरे बांधली. त्यांचे अवशेष आजही सांदोशी गावाच्या आसपास पहायला मिळतात. यातील बहुतेक देवळे हि घडीव दगडांची शिवालये आहेत. शिवरायांच्या निधनानंतर झुल्फीकार खानाचा वेढा रायगडावर बसला त्या वेळी ही बाजारपेठ व मंदीरे ओस पडली. महाराजांच्या निधनानंतर दख्खन गिळंकृत करायला स्वत: औरंगजेब दख्खनेत उतरला तेव्हा त्याच्यापुढे मराठय़ांच्या राजधानीचा गड लढवणंही आव्हान होतं. १६८४ च्या जानेवारी महिन्यात मुघली सरदार शहाबुद्दिनखान आणि माणकोजी पांढरे रायगडच्या आजुबाजुची खेडी मारून पसार झाले. मुघली फौज शहाबुद्दिनच्या नेतृत्वखाली पुण्याहुन निघुन देवघाटामार्गे उतरून रायगड किल्ल्याच्या उत्तरेचे छत्री निजामपूर हे गाव मारले अशी नोंद मुघली बातमी पत्रात मिळते. माणकोजी पांढरे हा या भागाचा माहितगार होता आणि म्हणुनच मुघली सैन्य येथे पोहचु शकले. शिवरायांनंतर कावले खिंड या चौकीकडे दुर्लक्ष झाले असेल अशी मोंगलांची समजुत झाली होती म्हणुन झुल्फीकारखानाच्या रायगड वेढ्याला सहाय देण्यासाठी मोगल सरदार शहाबुद्दीनखान व माणकोजी पांढरे यांनी २५ मार्च १६८९ या दिवशी हजारोंच्या सैन्याने या खिंडीतुन रायगड गाठण्याचा प्रयत्न केला़. पण हि मुघली फौज कावले बावले खिंडीत आली असताना रायगडच्या रक्षणार्थ असलेल्या कावले बावले खिंडीतल्या नऊ पाईक आणि त्यांचे नाईक सरकले यांच्याशी मुकाबला झाला. खिंडीत जगताप आणि सरकले घराण्यातील माणसानी बाजीप्रभुसारखा पराक्रम केला. जगताप-सरकले घराण्यातील मंडळीनी या खिंडीला रणक्षेत्र बनवुन शहाबुद्दीनखानाच्या सैन्याचे बरेच नुकसान केले पण शत्रुसैन्याची लाट येतच राहिली आणि शेवटी हे दहाही वीर धारातीर्थी पडले. तत्कालीन प्रथेनुसार या दहा वीरांच्या विरगळ त्यांची आठवण म्हणुन उभ्या राहिल्या़. या विरगळ व काही सतीशीळा आजही सांदोशी गावात आपल्याला पहायला मिळतात. गावकऱ्यांना आपल्या गावच्या इतिहासाचा अभिमान असल्याने तेही या ऐतिहासिक वारशाची काळजी घेतात़. रायगडचा नीट अभ्यास करायचा झाल्यास या प्रदेशातुन २-४ वेळा तरी हिंडणे आवश्यक आहे. -------------------------सुरेश निंबाळकर