जिवदानीगड

जिल्हा - पालघर 
श्रेणी  - मध्यम   
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग

महाराष्ट्रात जीवधन नावाचे दोन किल्ले आहेत. पहिला पालघर जिल्ह्यातील विरार येथे जीवदानी देवीच्या नावाने प्रसिद्ध असणारा जिवदानीगड आणि दुसरा पुणे जिल्ह्यातील जुन्नर सीमेवर वसलेला नाणेघाटाचा रक्षक किल्ले जीवधन. भक्तांच्या हाकेला पावणारी जीवदानीदेवी विरारच्या जिवधन किल्ल्याच्या हाकेला मात्र पावली नाही आणि आज हा किल्ला आपले अस्तित्व हरवून बसला आहे. पालघर जिल्ह्यातील डहानुपासून मुंबईतील वर्सोवा ते माहीमपर्यंत ठरावीक अंतरावर सागरी दुर्ग व किनारपट्टीलगत ठिकठिकाणी टेहळणीकरता बांधलेले लहान-मोठे किल्ले आपल्याला पहायला मिळतात. वसई तालुक्यात विरार शहराच्या पूर्वेस दोन कि.मी. अंतरावर डोंगरावर वसलेला किल्ले जीवधन आज आपले किल्लेपण कायमचे हरवून बसलेला पाहण्यास मिळतो. गडाची समुद्रसपाटीपासुन उंची ९०० फूट असुन गडावर जाण्यासाठी आज दोन मार्ग आहेत. एक वाट जीवदानीपाडा येथून तर दुसरा पुरातन मार्ग आज पाचपायरी या नावाने ओळखला जातो. पायथ्यापासून गडाच्या मध्यापर्यंत सिमेंटच्या पाय-या बांधलेल्या आहेत. काही ठिकाणी गडावर जाणारी वाट ही माती व दगडधोंडय़ांची आहे. गडावरच्या मंदिरात पोहोचण्यास अर्धा ते पाऊण तास खूप होतो. पायऱ्या न चढता येणाऱ्यांसाठी रोपवेची सोय आहे. आज जुन्या गडाचा कायापालट होऊन अद्ययावत असे सात मजली उंच जीवदानी मंदिर उभारलेले आहे. हे मंदिराचे बांधकामच गडाच्या मुळावर उठले असुन त्याच्या व इतर बांधकामात गडाचे मूळ अवशेष नष्ट करण्यात आले आहेत. आज रोपवे जेथे थांबतो त्या भागात असणाऱ्या चारही सातवाहन कालीन लेणीची तोडफोड करण्यात आली असुन तेथे जाण्यास बंदी घातली आहे. जीवदानी देवीच्या मूळ तांदळ्याऐवजी आज जीवदानी देवीची संगमरवरी मूर्ती आहे. आज देवी जेथे उभी आहे त्या जागी पूर्वी लेणी होती. तसेच देवीच्या डाव्या हाताला छोटी लेणी होती व उजव्या हाताला अंदाजे पंधरा फूट लांबीची एकावेळी एकाच माणसाला आत जाता येईल एवढी अरुंद गुंफा आहे. या गुंफेचे तोंड काचेच्या दरवाज्याने बंद करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या गुंफा आपल्याला विकटगड व सज्जनगड येथे दिसून येतात. या गुंफेच्या शेजारीच मोठी व प्रशस्त लेणी होती. गुंफा वगळता देवीचे दर्शन मिळावे यासाठी सर्व ऐतिहासिक वास्तू तोडून नष्ट केलेल्या आहेत. जीवदानी देवीचे दर्शन घेऊन उजव्या बाजुने पाय-या चढून वर आल्यावर आपल्याला उजवीकडे बारोंडा देवीचे छोटे मंदिर पाहण्यास मिळते. या मंदिरासमोर पूर्वी दगडात कोरलेले पाण्याचे बांधीव टाके होते ते नष्ट करून तेथे पक्ष्यांसाठी पिंजरा बनवण्यात आला आहे. येथून पुढे खाली गायगोठा या लेणी असणाऱ्या ठिकाणी जाण्यास वाट होती व आजही ती आहे पण लोखंडी जाळी लावून बंद केलेली आहे. येथून त्यावेळचे विरार गावाचे सुंदर दर्शन होत असे तसेच दूरवर अर्नाळय़ाचा समुद्र व जंजीरा दिसत असे. आजही हे पाहण्यास मिळते पण पुर्वी येथे अनुभवता येणारी गुढ शांतता मात्र आज नष्ट झाली आहे. बारोंडा देवीच्या मंदिराच्या समोरच जीवदानी देवी मंदिराच्या वरील भागात काळभैरव व कालिकामातेचे मंदिर आहे. पूर्वी या कालिकामातेच्या मंदिरात कोंबडे, बकरे बळी दिले जात असत पण आता मात्र त्यावर बंदी घालण्यात आली आहे. गडाच्या सर्वोच्च माथ्यावरून सभोवतालचा सुंदर प्रदेश नजरेत भरतो. पूर्वेस उजव्या हाताला कामणदुर्ग, तुंगारेश्वरचा पर्वत, तर डाव्या हाताला टकमक किल्ला दिसतो. पश्चिम दिशेस अर्नाळा जंजीरा थोडय़ा दुरवर भुईगावचा वज्रगड, व त्यापुढे आकाश निरभ्रं असेल तर वसईचा किल्ला पाहण्यास मिळतो. सातवाहनकालीन लेणी आपल्या खांदयावर मिरवणारा जीवधन किल्ला शिवशाहीच्या आधीपासून आपले अस्तित्व जपून होता. पाच पायरी मार्गाने येताना दिसणारा एका बुरुजाचा पाया व मोडकळीस आलेल्या लेणी सोडल्यास आज येथे गड होता हे सांगणारे गडाचे कोणतेच अवशेष बघण्यास सापडत नाहीत. शिवकाळात जीवधन पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. खासा शंभाजी महाराजांनी सन १६८३ मध्ये या किल्ल्यासाठी लढा देऊन हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला पण नंतर २७ ऑगस्ट १६८५ला पोर्तुगीजांनी तो परत जिंकल्याची नोंद आढळते. यानंतर पुनः एकदा तो मराठयांच्या ताब्यात आला पण पोर्तुगीजांनी दोन तोफा,तीनशे शिपाई, अठरा घोडेस्वार यांच्या मदतीने जिवधन गडास वेढा घातला व २७ मार्च १७३१मध्ये गड जिंकला. पुढे वसई भागात पोर्तुगीजांचे हिंदूंवरील वाढते अत्याचार पाहून पोर्तुगीजांचे उच्चाटन करण्यासाठी पेशव्यांनी वसईची मोहीम हाती घेतली. मराठय़ांच्या बरवाजी ताकपीर नावाच्या सरदाराने ३०० सैनिकांच्या मदतीने २१ मार्च १७३८ ला जीवधन पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला व एप्रिल १७३८ रोजी गडावरील पाण्याच्या टाक्यांच्या दुरुस्तीकरता दोन गवंडी पाठवण्यास पुणे दरबारात कळवले. यानंतर बराच काळ हा गड मराठय़ांच्या ताब्यात होता. अखेर १८१७ मध्ये इतर गडांसोबत हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला. ---------------------सुरेश निंबाळकर