जिल्हा - कोल्हापूर   
श्रेणी  - मध्यम   
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग 

गंधर्वगड

गंधर्वगड हे नाव काहीसे काव्यात्मक असले तरी गंधर्वगड हा एक किल्ला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील चंदगड तालुक्यात हा किल्ला असून चंदगडापासून १२ ते १३ कि.मी. अंतरावरील एका पठारावर आहे. याचीपायथ्यापासूनचि उंची ४०० फूट असुन किल्याचें क्षेत्रफळ सुमारें १००० फूट चौरस आहे.हा किल्ला इ. स. १७२४ सालीं सांवतवाडीच्या फोंड सांवताचा मुलगा नाग सावंत यानें बांधला. किल्ल्यामध्येच गंधर्वगड गाव वसलेले आहे.कोल्हापूर, निपाणी, गडहिंग्लज ते चंदगड असा गाडी मार्ग आहे. कोल्हापूरकडून चंदगडाकडे जाताना चंदगडाच्या अलिकडे १० कि.मी. अंतरावर वाळकोळी गावाचा फाटा आहे. रस्त्याच्या डावीकडे फुटणाऱ्या या फाट्यावर सध्या एक कमान उभी केली आहे. या फाट्यापासून गंधर्वगडावर जाणारा गाडीरस्ता केलेला आहे.या गाडीरस्त्याने गडाच्या खाली वाळकुळी गाव लागते. गावातून पंधरा मिनिटांच्या चालीनेच आपण गडावर पोहोचू शकतो अथवा गाडीमार्गाने डोंगराला वळसा घालूनही माथ्यावर जाता येते.वाळकुळी गावाकडून गड चढायला सुरुवात केल्यानंतर, आपण तासाभरात गडाच्या माथ्यावर पोहचतो. गडावर प्रवेश करताना आपणास दरवाजाचे अवशेष दिसतात. सडकेच्या उजव्या हाताला दगडी चौथर्याशवर हनुमंताचे मंदिर आहे व शेजारी रस्त्यावरच मारुतीची भंग झालेली जुनी मूर्ती आहे. येथून पुढे जाताना आपणास मार्गाच्या दुतर्फा गडावरील वस्ती दिसते. या मार्गाने आपण गावाचे दैवत चाळोबा मंदिरात येऊन पोहचतो.मंदिराजवळ एक नागशिल्प व बाजूलाच एका वास्तुचा भव्य चौथरा आहे. मंदिराच्या परिसरात विरगळी तसेच प्राचीन शिवमंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात. मंदिर पाहून पुढे गेल्यावर एक प्राचिन विहिर लागते. या विहिरीचे पाणी गावातील लोक वापरतात.या विहिरी शेजारीच पाण्याचे एक बांधीव टाके आहे. ही विहिर पाहून आपण गडाच्या दक्षिण तटबंदीवर यायचे. ही तटबंदी फारच प्रशस्त आहे. याच तटबंदीमध्ये ३ चोरदरवाजे आढळतात. ही तटबंदी एका ठिकाणी पाडून गावकऱ्यांनी गडाच्या दुसऱ्या बाजूने खाली उतरण्यास पायवाट केली आहे.गडफेरीत आपणास एक बुजलेली विहिर दिसते. गडाच्या पूर्व बाजूला जुने चौथरे दिसतात.गंधर्वगडाचे गडपण अंशाअंशाने कमी होत चालले आहे. गडाच्या माथ्यावरुन महिपालगड आणि कलानंदीगड तसेच ताम्रपर्णी नदीचे खोरे दिसते.१५ जानेवारी १६६६ मध्ये पन्हाळगड घेण्याच्या उद्देशाने शिवराय ५ हजार सैन्यानिशी गंधर्वगडाच्या परिसरातून पन्हाळयावर चाल करुन गेले. २८ जुलै १६८७ च्या पत्रात काकती कर्यातीचा देसाइ व हुकेरी परगण्याचा देसाइ आलगौडा यांनी मोगलांच्या वतीने मराठयांकडील गंधर्वगड घेतल्याचा उल्लेख आहे. या कामासाठी मोगलांनी काकतीच्या देसायांना अजमनगर/बेळगावची व हुकेरी देसायांना चंदगड व आजर्‍याची देशमुखी मनसब व एक हत्ती देण्याचे अमिष दाखविले होते. या किल्ल्याचा ताबा बरीच वर्षे आदिलशाहीशी जवळीक असलेल्या हेरेकर सावंत भोसले यांच्याकडे होता. इ. स. १७८७ सालीं नेसरगीच्या सरदारानें कोल्हापूर सरकारविरुद्ध बंड केलें होतें. त्यावेळीं त्यानें इतर किल्ल्यांबरोबर हाहि किल्ला सर केला होता, परंतु लवकरच या बंडाचा मोड करण्यांत आल्यामुळें किल्ला परत कोल्हापुरकडे आला.परंतु इ. स. १७९३ सालीं शिंद्यांचें वजन पडल्यामुळें तो परत सांवतवाडीकरास देणें भाग पडलें. सदाशिवराव भाऊ कर्नाटकात जाताना येथे काही काळ मुक्कामास होते. पुढे १८४४ च्या बंडात इंग्रजांनी या गडाची बरीच नासधूस केली. --------------------------------सुरेश निंबाळकर