कान्हेरी लेणी ही महाराष्ट्रात बोरीवलीजवळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आतील बाजूस आहेत उद्यानाच्या प्रवेशद्वारापासून ६ कि.मी. तर बोरीवली रेल्वे स्टेशनपासून ७ कि.मी. अंतरावर आहेत. उद्यानाच्या प्रवेशद्वारापासून प्रत्येक तासाला वाहन व्यवस्था आहे. पर्यटकांना संजय गांधी राष्ट्रीय पार्कचे मुख्य गेटवर आणि लेण्यांच्या प्रवेशद्वारावर प्रवेश शुल्क भरावे लागते. ह्या लेणी सकाळी ९पासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेशासाठी उघड्या असतात. कान्हेरी इ.स.पूर्व २ रे शतक ते इ.स. १३ व्या शतकापर्यंत म्हणजे १५०० वर्षे कान्हेरी विद्यापीठ अध्ययन व अध्यापनासाठी भरभराटीस आलेले बौद्ध केंद्र होते. या लेण्यांतून बौद्ध काळातील कलासंस्कृतीचे दर्शन घडते. कान्हेरी हा शब्द संस्कृत कृष्णगिरी ह्यातून घेतलेला असून त्याचा अर्थ काळा डोंगर असा होतो. ही लेणी काळा कुट्ट दगड तासून बनविलेली आहेत. कान्हेरीतील क्र. ८१ च्या लेण्यातील व्हरांड्याच्या डाव्या बाजूला कोरलेल्या शिलालेखात कान्हेरीच्या प्राचीन नावाचा कृष्णशैल अथवा कृष्णगिरी असा उल्लेख येतो. कान्हेरी हे शूर्पारक म्हणजे सोपारा, वस्य म्हणजे वसई, कालयाण म्हणजे कल्याण या प्राचीन बंदरांनजीक वसलेले असल्याने व्यापाऱ्यांचे व बौद्ध भिक्खूचे मुक्कामाचे ठिकाण. बौद्ध धर्मप्रसारकांचे हे मोठे ध्यानकेंद्र असल्याने इथे प्रचंड संख्येने लेणी घडवल्या गेल्या. एकूण १०९ लेण्यांचा हा समुदाय असुन एक चैत्यगृह व बाकीचे सर्व विहार अशी यांची रचना आहे. इ.स.पुर्व १ले शतक ते इ.स. ७-८ वे शतक इतका मोठा काळ यांच्या निर्मितीचा. सातवाहन,त्रैकुटक ,क्षत्रप,कलचुरी इ.विविध राजवटींत हीनयान, महायान कालखंडात असंख्य दात्यांनी या लेण्या खोदवल्या. लेणीसौंदर्याच्या दृष्टीने कान्हेरीची महायान कालखंडात खोदली गेलेली शिल्पे अप्रतिम आहेत. अरूंद घळीच्या दोन्ही बाजूंच्या खडकांत हीं लेणी खोदलेली आहेत. घळींच्या उत्तरेकडच्या लहान डोंगरात लेण्यांची एकच रांग खोदली असुन दक्षिणेकडच्या उंच डोंगरांत लेण्यांच्या एकावर एक अशा तीन रांगा खोदलेल्या आहेत. एका मजल्यावरच्या रांगेकडून दुसऱ्या मजल्यावरील रांगेकडे जाण्याकरिता पायऱ्या खोदलेल्या आहेत. दक्षिणेकडील लेण्यांच्या पठारावर पायवाट व पाण्याचीं टांकीं खोदलेलीं आहेत. लेणी पहायला सुरवात केल्यावर पहिलेच लेणे अपुर्ण असुन हा एक दुमजली विहार आहे. दोन भव्य स्तंभ, व्हरांडा, विश्रांतीकक्ष अशी याची रचना आहे. दुसऱ्या क्रमांकाचे लेणे खुल्या स्वरूपाचा विहार असुन अंतर्भागात जास्त खोदकाम केलेले नाही. येथे दोन दालनात दोन स्तूप कोरलेले असून स्तूपांभोवती बुद्धाच्या अवलोकितेश्वर स्वरूपातील प्रतिमा व त्याभोवती आकाशगामी यक्ष, गंधर्व प्रतिमा कोरल्या आहेत. हे स्तूप कान्हेरीतील प्रमुख धर्मगुरुंच्या स्मरणार्थ बांधलेले असावेत. तिसऱ्या क्रमांकाचे लेणे हे येथील एकमेव चैत्यगृह असुन ह्याचा आकार लांबीxरुंदीx उंची ८४X४५X४० फुट इतका आहे. चैत्यगृहाच्या बाहेरच्या बाजूला द्वारपाल, यक्ष कोरलेले असुन पायऱ्या चढून जाताच आत प्रांगण आहे. प्रांगणाच्या कोपऱ्यात दोन भव्य स्तंभ भिंतींलगत तर दोन स्तंभ या स्तंभाच्या मध्ये कोरलेले आहेत. कोपऱ्यातील दोन स्तंभांपैकी एकावर सिंह तर दुसऱ्यावर य़क्ष कोरलेले आहेत. कार्ले येथे सध्या एकच सिंहस्तंभ असला तरी तेथे पूर्वी दोन सिंहस्तंभ असावे याला कान्हेरीच्या चैत्यगृहातून पृष्टी मिळते. मधल्या स्तंभांवर आतील दोन्ही बाजूंना शिलालेख कोरलेले आहेत. स्तंभाच्या आतील बाजुच्या ओसरीवर जोडप्यांच्या प्रतिमा खोदलेल्या असुन डाव्या उजव्या बाजूंना समोरासमोर दोन रेखीव भव्य बुद्धप्रतिमा कोरलेल्या आहेत. डावीकडेच एक विश्रांतीकक्ष आहे. आतील चैत्यगृहात दोन्ही बाजूंना एका ओळीत कोरलेले ३४ स्तंभ असुन स्तंभांच्या शेवटी मध्यभागी स्तुप कोरलेला आहे. त्याभोवती प्रदक्षिणापथ व वरती गजपृष्ठाकार छत कोरलेले असुन आजूबाजूच्या स्तंभांवर हत्ती, बैल व त्यावर बसलेल्या स्त्रीपुरुषांची शिल्पे कोरलेली आहेत. उजवीकडच्या काही स्तंभांचे काम अर्धवट राहिलेले दिसते. स्तुपावरची हर्मिका आणि त्यावरील लाकडी छ्त्र तसेच छतावर असलेल्या लाकडी फासळ्या काळाच्या ओघात नष्ट झालेल्या असुन त्या बसवण्यासाठी असलेल्या खाचाच फक्त शिल्लक आहेत. हे चैत्यगृह गौतमीपुत्र सातकर्णी राजाच्या काळात (इ.स.१७३- इ.स.२११) कोरले गेले असावे असा अंदाज आहे. या चैत्यगृहाशेजारी एका छोट्याश्या लेण्यात एक स्तूप कोरण्यात आला असुन स्तूपाची दगडी हर्मिका व त्यावरील दगडी छ्त्र छताला भिडवलेले आहे. या स्तूपावर व आतील भिंतीवर बुद्धप्रतिमा कोरलेल्या आहेत. हे लेणे नंतरच्या महायान काळात कोरले असावे. येथुन पुढे डोंगराने काही पायऱ्या चढून आल्यावर डोंगर खोदून बनविलेल्या गुंफा नजरेस पडतात. यातील सुमारें ३० लेणीं चांगल्या अवस्थेत असुन ६० लहान तर उर्वरित २० लेणी मोडकळीस आलेली आहेत. बहुतेच विहारांचा वापर बौद्धभिख्खू राहण्यासाठी, अभ्यासासाठी आणि ध्यानासाठी करीत. काही विहारात बाहेरच्या जागेत बसण्यासाठी दगडी बाक असुन बहुतेक विहाराच्या आत भिंतीला लागून झोपण्याकरता बाक कोरलेले आहेत. विहाराच्या दरवाजावर दारांच्या दगडी चौकटी कोरल्या असुन आतील बाजुस दरवाजा बंद करण्याकरितां भिंतीत अडसर कोरलेले दिसतात. काही विहारात दरवाजाशेजारी दगडांतच जाळीदार खिडक्यांच्या चौकटी कोरलेल्या दिसतात. संपुर्ण विहाराला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी डोंगराच्या माथ्यावर ठिकठिकाणी पाण्याचे हौद व खडकांत पाण्याची अनेक टांकी कोरलेली आहेत. प्रत्येक विहाराला पाणी पुरवठा करण्यासाठी लेण्यांत टांके अथवा दगडी ढोणी कोरल्या असून त्यांत लेण्यांच्या माथ्यावरून पाणी येण्याकरितां पन्हाळ खोदलेला आहे. कान्हेरीत सर्वात जास्त कोरीवकाम लेणी क्रमांक १,२,३,११,४१,६७,८९, आणि ९० ह्या लेण्यात दिसुन येते. अकराव्या क्रमांकाचे लेणे मोठ्या सभागृहासारखे असुन त्याची लांबीx रूंदीxउंची ८०x४५x१५ फुट इतकी आहे. डॉ.सुरज पंडित यांच्यामते हे लेखनगृह असुन येथे मूळ ग्रंथाची नक्कल उतारली जात असे व त्यासाठी येथे मोठया प्रमाणात लेखनिक बसत असत. २७ क्रमांकाच्या गुंफेच्या छताला बुद्धाचे अपुरे रंगविलेले चित्र आहे. ३५ व्या गुहेतील सभागृह ही मोठे असुन त्या गुहेत एक शिल्पचित्र आहे. त्यात पद्मपाणी, तारादेवी व बोधीसत्व ह्यांची सुंदर शिल्पे असुन नागराजा, नागिनी व गुडघे टेकुन पुजा करणाऱ्या भक्तांचा समुह दिसतो. ह्याच गुहेच्या उजव्या कोपऱ्यात दिपांकरजातक कथेतील काही शिल्पे कोरली आहेत. ३८क्रमांक लेण्यांच्या आसपास ६०० फूट लांबीच्या दालनात विटांनी बांधलेले अनेक उध्वस्त स्तूप आहेत. पुढील गुहा क्रमांक ४१ मध्ये 4 हात व ११ डोकी असलेले अवलोकितेश्वराचे शिल्प आहे. क्रमांक ५, ८, ९, ५८ व ५९ चीं लेणी साधीं असल्याने ती इ.स.पू. २०० वर्षांपासून ते इ.स.५० वर्षापर्यंतच्या काळांतलीं कोरली असावीत. कान्हेरी येथील संशोधनात ब्राह्मी, देवनागरी आणि पहलवी या ३ भाषांतील ५१ शिलालेख आणि २६ वचननामे सापडले आहेत. यांपैकी ६६ व्या लेण्यांतील तीन लेख पल्हवी भाषेंत आहेत. यांत एका लेखात निचिरेन या बौद्ध पंथातील जपानी प्रवाशाने भेट दिल्याची नोंद आहे. १० व्या व ७८ व्यां लेण्यांतील दोन लेख संस्कृत भाषेंत आहेत. बाकीचे लेख ब्राह्मी व प्राकृत भाषेत आहेत. कान्हेरी येथील पांचव्या लेण्यांतील कोरींव लेखावरून असें दिसून येतें की वासिष्ठिपुत्र नामक राजाच्या कारकीर्दीत येथील जुन्या लेण्यांकरितां टाकी कोरली गेली. येथील पन्नास शिलालेखांचा अर्थ लागला असुन त्यातील दहा लेखांच्या लिपी वळणावरून ते लेख इ.स.पुर्व काळातील असावे असें दिसतें. सातकर्णी वंशीय राजांच्या कारकीर्दीत (इ.स.पू. २०० ते इ.स.नं. ३५०) व विशेषतः दुसऱ्या गौतमीपुत्र राजाच्या कारकीर्दीत कान्हेरी येथील विहारांची भरभराट होती. पन्नास शिलालेखांपैकी वीस शिलालेख या काळात खोदले गेले. त्यांत राजे, त्यांचे प्रधान व शेटसावकार यांनी येथील भिखुंच्या सोईकरितां लेणीं, पाण्याची टांकी, जमिनी व रोकड पैसे यांच्या देणग्या दिल्याचा उल्लेख आहे. दक्षिणेकडच्या डोंगरावरील तिसऱ्या रांगेतील विहार व ३ क्रमांकाचे चैत्यगृह याच काळात कोरले असावे. इ.स. ४ थ्या शतकांत ३८ व्या लेण्यांतील खोदीव चित्रयुक्त दगडी स्तूप बांधला असावा व पांचव्या शतकांत चैत्यगृहाजवळचा स्तूप बांधला असावा. पन्नासांपैकी दहा शिलालेख इ.स.पांचव्या व सहाव्या शतकांतील आहेत. यावरून ह्या दोन्हीं शतकांत नवीं लेणीं कोरण्याचा व जुन्या लेण्यांत शिल्पकृती घडविण्याचे काम चालू होते असें दिसतें. हि लेणी बौद्धधर्माच्या अलीकडील काळात म्हणजे महायान पंथाच्या काळीं निर्माण झाली असावीं. ज्याला दरबार लेणें म्हणतात तें ११ वें लेणें पहिल्या रांगेच्या शेवटचीं इतर लेणीं, चैत्यागृहातील गौतम बुद्धाचे दोन भव्य पुतळे आणि इतर अनेक लहान खोदीव विहार याच काळातील असावी. लेणे क्रमांक ८७ हे स्मशानलेणे मुख्य लेणीसमुहापासून साधारणपणे १.५ किमी लांब आहे. लेणी क्र.५ च्या शेजारी असलेल्या दगडी पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला उजव्या हाताला लेणी क्र. ७१-७३ दिसतात. स्मशानगुंफेकडे जाण्यासाठी लेणी क्र. ७४ डाव्या हाताला ठेवून दगडी पायऱ्यांच्या मार्गाने दरीच्या टोकापर्यंत जायचे. पायऱ्या संपल्यानंतर लेणी क्र. ८६ साठी उजवीकडे आणि स्मशानगुंफा (लेणी क्र. ८७) साठी डावीकडे वळायचे. स्मशानगुंफा १८० मीटर लांब आहे. निर्वाणविठीच्या सुरुवातीलाच बुध्दाची पावले आणि त्यांच्या शेजारी असलेला ब्राम्ही लिपीतील लेख आपले लक्ष वेधून घेतो. स्मशानगुंफेतील जमीन विटांनी आच्छादलेली आहे. येथे वेगवेगळ्या आकाराचे १०० पेक्षा जास्त स्तुपांचे अवशेष आहेत. हे सर्व स्तूप भाजक्या विटांचे होते हे त्यांच्या अवशेषांवरून दिसून येते. ह्या लहान स्तुपांनंतर एक प्रचंड मोठा स्तूप आणि तीन खोल्या आहेत. ह्या तीन खोल्या म्हणजे बुध्द धर्माची त्रिरत्ने (बुध्द, धर्म आणि संघ) असे मानले जाते. ह्या तिन्ही खोल्यांमध्ये बुध्द, अवलोकितेश्वर आणि वज्रपाणी यांची शिल्पे आहेत. तिसऱ्या गुहेत गौतम बुध्द आसनस्थ असून त्यांच्या पायाजवळ सिंह दाखवले आहेत. त्याशिवाय बाह्यभागात बुध्दाची अनेक शिल्पे आहेत. ह्या तीन खोल्यांच्या समोर स्मशानगुंफेतील सर्वात मोठ्या स्तूपाच्या पायाचे अवशेष आहेत. ह्या स्तुपाला सोळा बाजू असून पायाचा व्यास अंदाजे २० फुट आहे. हा स्तूप भाजक्या विटांनी बनवला असुन स्तूपाच्या वर छतासाठी दगडात खोदकाम केल्याचे दिसून येते. जवळच पाच दगडी हर्मिका पडलेल्या आहेत. १८५३ साली वेस्ट यांना स्मशानगुंफेतील स्तूपाच्या पायाचे उत्खननात स्तूपाचे अवशेषांबरोबर सिंह, वाघ, हरिण व कीर्तिमुख यांची शिल्पे तसेच योगमुद्रा आणि धम्मप्रवचन मुद्रेतील बुध्दाच्या मूर्तींचा शिल्पपट मिळाला होता. ह्या शिल्पपटात बुध्दांच्या शेजारी चवरीधारी व्यक्ती आहेत. १९७३ साली डॉ. शोभना गोखले ह्यांना स्मशानगुंफेच्या शेजारी असलेल्या दरीत बौध्द भिक्षूंची नावे असलेले २७ शिलालेख कोरलेले दगड सापडले. दरीत सापडलेल्या शिलालेखांवरील अक्षरपध्दत वाकाटककालीन आहे. विटांच्या स्तुपावरील हे नावांचे दगड नंतरच्या काळात स्तूप उध्वस्त झाल्याने दरीत पडले असावे. ह्या शिलालेखांवरून येथे असलेले स्तूप भिक्षूंच्या स्मरणार्थ बांधले होते हे समजण्यास मदत झाली. कान्हेरी येथे विटांचे स्तूप बांधण्याचे काम त्रैकुटककाळात सुरु झाले ते वाकाटक काळापर्यंत सुरु होते आणि कलचुरीकाळात ते कळसाला गेले होते असा निष्कर्ष स्तुपांवर कोरलेल्या शिलालेखांवरून काढता निघतो. डॉ. जेम्स बर्ड ह्यांना १८३९ मध्ये कान्हेरीच्या मुख्य चैत्यगृहासमोर असलेल्या विटांच्या स्तूपात २ त्रैकुटककालीन ताम्रपट सापडले. ह्यासंबंधी ते लिहितात पाहणी करण्यासाठी १२ ते १६ फूट उंचीचा सर्वांत मोठा स्तूप निवडला. तो घडीव दगडांचा असून त्याची बरीच पडझड झाली होती. वरुन खाली जमीनीपर्यंत खोदल्यानंतर आणि दगडमाती बाजूला काढल्यानंतर कामगारांना एक गोलाकार दगड सापडला. तो मध्ये पोकळ असून वर शिशाच्या तुकड्याने झाकला होता. त्या दगडात तांब्याचे २ लहान कलश होते. एका कलशात थोडी रक्षा, एक रुबी (लाल), एक मोती, सोन्याचे लहान तुकडे आणि सोन्याची एक लहान पेटी होती. त्या पेटीत वस्त्राचा एक तुकडा होता. दुस-या कलशात एक चांदीची पेटी आणि थोडी रक्षा होती. त्या कलशांच्या जवळच २ ताम्रपट होते. हा ताम्रपट त्रैकुटककाळ २४५ (सन ४९४/४९५) काळातील आहे. ह्या ताम्रपटानुसार सिंधूदेशातील कनकचा रहिवासी बुध्दीश्री व पुष्यवर्मन यांचा मुलगा भिक्षु बुध्दीरुची याने विटांच्या स्तुपाची निर्मिती केली. वरील ताम्रपटात दगड आणि विटा यांच्यापासून निर्माण केलेल्या स्तुपाला चैत्य अशी संज्ञा वापरली आहे. विटांचे स्तूप फक्त कान्हेरीतच बघायला मिळतात आणि हेच ह्या लेण्यांचे मुख्य वैशिष्ट्य आहे. त्रैकुटक काळात कान्हेरी येथे मोठ्या प्रमाणत लेणीस्थापत्यकलेला पुन्हा सुरुवात झाली. वाकाटक घराण्यानंतर त्रैकुटक घराणे सार्वभौम राजे झाले. सुरत ताम्रपटानुसार सन ४९० मध्ये व्याघ्रसेन अपरांतचा राजा झाला. राजकीय अस्थिरतेमुळे कान्हेरी येथे सापडलेल्या सन ४९४/९५ (त्रैकुटक काळ २४५) च्या ताम्रपटात कोणत्याही राजाची नोंद केलेली नाही. त्रैकुटक काळ २४५– २५६ या अकरा वर्षांच्या मधल्या काळात वाकाटक राजा हरीषेण याने अपरांतवर पुन्हा वाकाटकांचा अंमल प्रस्थापित केला असावा. माटवन येथील त्रैकुटक राजा मध्यमसेन (त्रैकुटक काळ २५६) व विक्रमसेन (त्रैकुटक काळ २८४) यांच्या ताम्रपटांनुसार सन ५०५ ते ५३३ या काळात त्रैकुटक राजघराण्याला पुनरुज्जीवन मिळाले. त्रैकुटक राजघराण्याने कलचुरी राजघराण्याचे मांडलिक होण्यापूर्वी वाकाटक राजा हरीषेण नंतर काही काळ पुन्हा अपरांत प्रांतावर सार्वभौम अंमल प्रस्थापित केला होता. ९० क्रमांकाच्या लेण्यामध्ये एक शिलालेख असुन त्यात सातवाहन राजा वासिष्ठिपुत्र यांचे रुद्रदवर्णची कन्या सत्कर्णी हिच्याशी विवाह झाल्याचा संदर्भ आहे. १०व्या शतकाच्या शेवटी (९८० -१०५४) अतिशा ही बौद्ध शिक्षिका कृष्णगिरी विहारात बौद्ध ध्यान साधना शिकण्यासाठी आली होती. अनेक देणगीदारांनी कान्हेरी ग्रंथालयाला दिलेल्या देणग्यांचा उल्लेख शिलालेखांत आला आहे. पहिल्या अमोघवर्षाच्या कारकिर्दीत नवव्या शतकाच्या सुरुवातीला भद्रविष्णूने आपल्या देणगीपैकी काही देणगी ग्रंथ खरेदीसाठी दिली आहे तसेच अविघ्नकार नावाच्या एका बंगाली व्यापा-याने कान्हेरीच्या संघास ग्रंथखरेदीसाठी दान केल्याची नोंद आहे. कान्हेरी डोंगराच्या उतारावर वरील बाजुस तीन कडे व मधल्या घळीत पाणी साठविण्यासाठी घातलेली भिंत दिसते. हि भिंत दुभंगल्याने तेथे पाणी साठत नाही पण प्राचीन काळची हि रचना आवर्जुन पाहण्यासारखी आहे. भुमिगत त्यावरुन धरण बांधण्याच्या कल्पनेचा उगम प्राचीन काळात झाल्याचे दिसते. धरणाच्या उजव्या बाजुस भुइकोटासारखे बांधकाम आहे. या बांधकामात तटबंदी,फांजी तटावर जाणाऱ्या पायऱ्या दिसुन येतात. या बांधकामाच्या आत एक विहीर व भुमिगत गटारे असुन येथे प्रचंड प्रमाणात झाडी असल्याने आतील अवशेष नीटपणे ओळखु येत नाही. ------------------सुरेश निंबाळकर

कान्हेरी

जिल्हा - मुंबई   
श्रेणी  - सोपी    
लेणीप्रकार - ​बौद्ध लेणी