होन्नुरगड

जिल्हा - बेळगाव 
श्रेणी  - सोपी   
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग

पवित्र डोंगर किंवा पायझर डोंगर या नावाने ओळखला जाणारा होन्नुरगड बेळगाव भागातील शिवाजी महाराजांच्या ताब्यातील दहा महत्वाच्या गडापैकी एक गड म्हणुन ओळखला जात होता. होन्नुरगड संकेश्वर पासून २६ कि.मी अंतरावर बेळगाव दिशेला एका मध्यम उंचीच्या टेकडीवर उभा आहे. मुंबई -बंगलोर महामार्गावर संकेश्वर नंतर १३ किमी वर हिडकल धरणाचा फाटा आहे. महामार्गावरील या फाट्यापासून डावीकडे वळल्यावर आपण थेट होन्नुर गावातच पोहोचतो. गोकाक महामार्गावर असणारा हा किल्ला सभोवताली संपुर्ण सपाट प्रदेश असल्याने किल्ल्याचा डोंगर व त्यासमोरची टेकडी आपले लक्ष वेधून घेते. होन्नुरगड गावापासुन २ कि.मी.वर आहे तर गोकाक महामार्गापासून १.कि.मी.वर आहे. होन्नुर गावातुन गडावर चालत जाण्यास अर्धा तास लागतो. होन्नुर गावापासून गडावर जाण्यासाठी पक्का रस्ता असल्याने गाडीने थेट गडाच्या दरवाजापर्यंत जाता येते पण गडावर काही अनुचीत प्रकार घडल्याने आता गाडी थोडी अलीकडेच थांबवावी लागते. किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे १९५० फुट उंचीवर असुन वाहनतळापासून किल्यावर जायला फक्त ५ मिनिटे लागतात. या वाटेने वर जाताना गडाचा पोखरलेला पायथा दिसतो. या भागात साळींदर प्राण्याचे वास्तव्य मोठया प्रमाणात असल्याने व गडाचा दगड मुरमाड असल्याने त्यांनी गडाचा पायथा पोखरलेला आहे. गडाच्या दरवाजाकडे जाताना गडाची तटबंदी व वरील बाजुस असणारा बुरुज आपले लक्ष वेधून घेतो. गडाच्या बांधकामात चुन्याचा वापर न करता केवळ एकावर एक चिरे ठेवुन बुरुज व तटबंदी उभारली आहे. गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराची कमान व दरवाजा उध्वस्त असुन हे प्रवेशद्वार गोमुखी बांधणीचे आहे. गडाचे हे बांधकाम मराठा शैलीचे आहे पण गडाच्या दरवाजावर कोणतीही द्वारशिल्पे नसल्याने गडाच्या बांधकामाचा काळ व राजवट निश्चित करता येत नाही. दरवाज्याच्या आतील दोनही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. गडाला पुर्वपश्चिम असे दोन दरवाजे असुन पूर्वेला महादरवाजा तर पश्चिमेला लहान दरवाजा होता पण आता मात्र महादरवाजाची केवळ कमान शिल्लक असुन दुसरा दरवाजा भुईसपाट झाला आहे पण त्याचे अवशेष दिसून येतात. त्रिकोणी आकाराचा हा गड उत्तर-दक्षिण पसरलेला असुन गडाची लांबी रुंदी ४९० x ३६० फुट असुन गडाचे एकूण क्षेत्रफळ चार एकर आहे. किल्ल्याला एकूण अकरा मोठे बुरुज असुन एक बुरुज किल्ल्याच्या अंतर्गत उत्तर टोकाला सुटा गडावरील अंतर्भागात लक्ष ठेवण्यासाठी उभारलेला आहे. किल्ल्यात्तील या बुरुजावरून नजर फिरवली असता किल्ल्याचा संपुर्ण परिसर व दुरवर पसरलेलला हिडकल धरणाचा पाणीसाठा व त्यात अर्धवट बुडालेले विठ्ठल मंदिर नजरेस पडते. गडाचा परिसर लहान असल्याने एका नजरेत संपुर्ण गड दिसतो. गडाची आतील तटबंदी पुर्णपणे ढासळलेली असुन गड दुर्लक्षित असल्याने गडावर खुप मोठया प्रमाणावर खुरटी झुडपे वाढलेली आहेत. गडावर पाण्याचे एक ४०x ३० आकाराचे ५० फुट खोल खोदीव टाके असुन या टाक्यात एका बाजुला आत उतरण्यासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्या दिसतात पण या पायऱ्या कोसळलेल्या असल्याने टाक्यात उतरता येत नाही. आजमितीस टाक्यात दगडमाती साठलेली असुन पाण्याचा थेंबही नाही. गडाचा कातळ सछीद्र असल्याने त्यात पाणी रहाणे शक्य नाही. हे टाके खोदुन यातील दगड गडाच्या बांधकामासाठी वापरला असावा. याशिवाय गडात एक विहीरीप्रमाणे खोल बांधीव हौद असुन हा हौदही कोरडा पडलेला आहे व त्यात झुडपे वाढलेली आहेत. गडावर कोणतीही देवता अथवा मंदिर दिसून येत नाही. गडावर गुप्तधनाच्या लालसेने बरेच खड्डे खोदलेले दिसून येतात यात एक रांजण खळगा (धान्यसाठयाची जागा) दिसून येतो. गड छोटा असल्याने संपुर्ण गडफेरी करण्यास अर्धा तास पुरेसा होतो. गडावरून खुप लांबवरचा प्रदेश दिसत असल्याने या गडाचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असावा. गडाच्या इतिहासात डोकावले असता गडाबाबत विशेष नोंदी आढळत नाही. ज्यावेळी बेळगावचे तालुके इंग्रजांच्या ताब्यात आले त्यावेळी सन १८४४ रोजी होन्नुरगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. १८५३च्या इंग्रजी नोंदीप्रमाणे किल्ल्यावर एकही इमारत अथवा अखंड बुरुज शिल्लक नव्हता फक्त किल्ल्याची थोडीफार तटबंदी शिल्लक होती. किल्ल्यावर ढासळलेले १४ बुरुज होते. किल्ल्याच्या विहिरीची भिंत १८०० साली वीज पडल्याने आत पडली आहे. ---------सुरेश निंबाळकर