मराठवाडा हा मंदिरांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. प्राचीन काळापासून या प्रदेशात अनेक राजा-महाराजांनी विविध काळात मंदिरांची निर्मिती केली. शिल्पकलेचा अजोड नमुना असलेली अशी मंदिरे औरंगाबाद परिसरात मोठया प्रमाणात आहेत. हजार-बाराशे वर्षांच्या मंदिरांच्या इतिहासात ११-१२ व्या शतकात चालुक्य आणि यादव ही दोन राजघराणी मराठवाड्यात होऊन गेली. त्यांच्याच काळात ही मंदिरे अस्तित्वात आली. धार्मिकदृष्ट्या विचार करता सातवाहनांच्या पूर्वीपासून तो वाकाटकांपर्यंत या प्रदेशावर बौद्ध धर्माचा पगडा होता . पुढे चालुक्यांनी शैवपंथाची कास धरली आणि यादवही शिवभक्त होते. त्यामुळे या दोन राजवटींमध्ये या शिवमंदिरांची निर्मिती झाली आणि मंदिरांवरील शिल्पकला बहरली. सिल्लोड-सोयगाव परिसरात आडमार्गांवर नागेश्वर, वडेश्वर, मुर्डेश्वर हि महादेवाची प्राचीन शिवमंदिरे असुन त्यांचे महत्त्व पंचक्रोशीपुरता मर्यादित राहिले आहे. या मंदिरांतील सिल्लोड तालुक्यात असणारे अंभईचे वडेश्वर मंदिर प्राचीन वास्तूकलेचा उत्तम नमुना आहे. नागरिकांची अनास्था आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मंदिराचा बराचसा भाग कोसळला असुन मंदिरांला रंगरंगोटी करुन विद्रूप केले गेले आहे. मंदिरांचे जतन व संवर्धन करण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाने नुकतेच पाऊल उचलले आहे. औरंगाबाद – अंभई हे अंतर ९० कि.मी. असुन औरंगाबादहून अंभई येथे जाण्यासाठी सिल्लोड गाठावे. सिल्लोडच्या पुढे मंगरूळ फाट्याने साधारण २२ कि.मी.अंतर पार करून अंभई गावात जाता येते. अंभई हे सिल्लोड तालुक्यातील अजिंठा डोगररांगांमध्ये वसलेले छोटेसे गाव. या गावात १२व्या शतकातील तीन गर्भगृहे असणारे शिवमंदिर आजही चांगल्या स्थितीत आहे. मंदिराच्या बाहेरच्या भिंतींवरील कोरीव कामाप्रमाणेच याचे प्रवेशद्वारही कोरीवकामाने सजलेले असुन बाह्य भागावर काही मैथुन शिल्पे आहेत. प्रथमदर्शनी गर्भगृहाच्या शिखराला केलेला सिमेंटचा गिलावा नजरेस खटकतो. या देखण्या शिल्पमंदिराची रचना समोर एक व दोन्ही बाजुला दोन गर्भगृह, सभामंडप आणि मुखमंडप अशा स्वरूपाची आहे. याचा मुखमंडप व सभामंडप पुर्णपणे कोसळलेला असुन त्या जागी नवा सिमेंटचा सभामंडप बांधण्यात आला आहे. कोसळलेल्या मुखमंडप व सभामंडपावरील मुर्ती व कोरीव दगड मंदीर परीसरात मोठया प्रमाणावर विखुरलेले आहेत. मंदिराचा दगडी चौथरा काही प्रमाणात मातीत गाडला गेला आहे. या मोठया दगडी चौथऱ्यावर मंदिराची उभारणी करण्यात आलेली असुन मंदिराच्या समोरच पायऱ्यांची प्राचीन बारव आहे. येथे मंदिराचे कोरीव खांब व अनेक मुर्ती झाडाखाली ठेवलेल्या आहेत. गर्भागृहासामोरील मंडपात विशाल नंदी असुन त्याच्या घाटदार शरीरावर सुंदर अलंकार कोरलेले आहेत. डाव्या व उजव्या हाताला छोटे दालन असुन त्यात शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. प्रत्येक कक्षाच्या टोकाला विविध प्रकारची कीर्तिमुखे साकारली आहेत. मुख्य गाभाऱ्याच्या व शेजारच्या लहान गाभाऱ्याच्या तोरणभिंतीवर अष्टमातृकांची शिल्पपट्टी कोरलेली आहे. या अष्टमातृका राजहंस, ऐरावत, वृषभ, वराह,मनुष्य यावर बसलेल्या आहेत. गाभाऱ्याच्या मुख्य दाराजवळ वरच्या भागात शंख व चिपळया वाजविताना व नृत्य करीत असलेले स्त्री-पुरुषांचे शिल्प तसेच वेगवेगळया पध्दतीचे नक्षीकाम केलेले आहे. सभामंडपातून गर्भगृहात जाताना चार-पाच पायऱ्या उतरून जावे लागते. गर्भगृहाच्या आत मधोमध उत्तराभिमुख शिवलिंग आहे. गर्भगृह चौरसाकृती असुन गाभाऱ्याच्या भिंतीवर नव्याने फरशी लावल्याने गाभाऱ्यातील कोरीवकाम झाकले गेले आहे. मंदिराला अष्टकोनी चौथरा असुन विविध प्रकारची छोटीमोठी शिल्पे मंदिराच्या बाहेरील अंगाने कोरलेली आहेत. या शिल्पमंदिराचे वैशिष्टय़ म्हणजे मंदिराच्या दक्षिण व उत्तरेकडील बाह्य़ांगावर खजुराहो सारखी कामक्रीडा करत असलेली शृंगारशिल्पे कोरलेली आहेत. छोटय़ा आकारातील ही शिल्पे काही ठिकाणी लांब शिलांवर पत्रिकेच्या स्वरूपात कोरून नंतर मंदिरावर जडवण्यात आली आहेत. येथील कळस पुर्वी कसा असावा याविषयी अनेक तर्क आहेत. मंदिर डोळसपणे पहायला हाताशी कमीतकमी दोन तासाचा अवधी असायला हवा. अजिंठ्याच्या या डोंगररांगांत अंभई शिवाय हट्टी आणि मुर्डेश्वर या दोन ठिकाणी प्राचीन शिवमंदिरे आहेत. -------------सुरेश निंबाळकर

जिल्हा - औरंगाबाद   
श्रेणी  -सोपी    
प्रकार - ​शिवमंदिर

अंभई - वडेश्वर महादेव