श्रीगोंदा हे नगर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील एक ऐतिहासिक वारसा असलेले शहर. मध्ययुगीन काळात हे शहर श्रीपुर या नावाने ओळखले जात होते. या श्रीपूरचा अपभ्रंश चांभारगोंदे व पुढे श्रीगोंदे असा झाला. कधीकाळी श्रोगोंदा गाव तटबंदीच्या आत वसलेले असुन गावाला भुईकोट होता पण आज मात्र गावाच्या वाढीमुळे किल्ल्याचे अवशेष खुप मोठया प्रमाणात नष्ट झालेले आहेत. आज आपल्याला केवळ पोस्ट कार्यालयाच्या शेजारी असलेला कोटाचा एक मुख्य दरवाजा व नदीकिनारी असलेले अवशेष पहाता येतात. गावातील ऐतिहासिक पेशवेकालीन मंदिरे व वाडे पहिले कि श्रीगोंदा शहराच्या वैभवाची साक्ष पटते. नदीकिनारी असणारी तटबंदी केवळ एकाच ठिकाणी उभी असुन या तटबंदीमध्ये चार बुरूज दिसुन येतात. तटाचा वरील भाग विटांनी बांधलेला असुन त्यात बंदुकीचा मारा करण्यसाठी जागोजागी जंग्या आहेत. या तटबंदीच्या आतील भागात एक पायऱ्या असणारी मोठी बारव असुन ती गाळ व कचरा यांनी भरलेली आहे. याच भागात तटबंदी शेजारी आपल्याला दत्तमंदिर व भारतात अत्यंत थोड्या ठिकाणी असणारे सूर्यमंदिर पहायला मिळते. या तटबंदीला लागुनच आतील बाजुस दगडी ओवऱ्या असुन येथे शाळेचे वर्ग भरवले जातात. तटबंदीला लागुन असणारा हा भाग व सूर्यमंदिर पहाण्यासाठी शाळेच्या आवारात जावे लागते. सुर्यमंदिर शाळेच्या आवारात असल्याने ते बंद असते. येथील कोपऱ्यात असलेल्या बुरुजाच्या आतील जिन्याने आपल्याला तटावर जाता येते. नदीकिनारी असलेल्या या तटबंदीत बाहेर पडण्यासाठी एक लहान दरवाजा असुन तो दगडाने बंद केलेला आहे. तटबंदीच्या या भागात असणाऱ्या दुसऱ्या एका दरवाजाची रचना गढीप्रमाणे असुन या दरवाजासमोर एक समाधी आहे. याशिवाय शिंदे घराण्यातील सती गेलेल्या काही स्त्रियांच्या छत्र्या तसेच महादजी शिंदे यांच्या पादुका नदीकाठी पहायला मिळतात. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. शिंदे घराण्यातील मराठा सेनानी महादजी शिंदे, दत्ताजी शिंदे व राणोजी शिंदे यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक इमारती आजही भग्नावस्थेत उभ्या आहेत. किल्ला पहाण्यास एक तास पुरेसा होतो. श्रीपूर हे नाव लक्ष्मीच्या येथील वास्तव्यावरून पडल्याचे श्रीपूर महात्म्य ग्रंथात म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांनी शेख मह्म्मद महाराजाना गुरु मानले व त्यांना श्रीगोंदा येथे मकरंद पेठ वसवून मठ बांधून दिला. श्रीगोंदा शहरात त्याकाळी मोठ्या सराफी व व्यापारी पेठा होत्या. वेरुळच्या घृष्णेश्वरचे बांधकामासाठी येथील शेशाप्पा नाईक पुंडे यांच्या पेढीतून रक्कम नेत असल्याची नोंद सापडते. शिवाजीराजे व मावळ्यांनी चांभारगोंदे शहर लुटल्याची नोंद इतिहासात आहे. खर्ड्याच्या लढाईचा विजयोत्सव भगवा झेंडा फडकावून जेथे केला होता त्या ठिकाणाला झेंडा विजय चौक असे नाव आहे तर पानिपतसाठी ज्या वेशीतून शिंदे घराण्यातील वीरपुरुष बाहेर पडले व परत आलेच नाहीत त्या दिल्ली वेशीला आजही अपशकुनी समजले जाते. लोक चांगल्या कामासाठी व गावाबाहेर जाण्यासाठी या वेशीचा वापर आजही करीत नाहीत. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले श्रीगोंदा गावाचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. -----------सुरेश निंबाळकर

जिल्हा - नगर  
श्रेणी  - सोपी   
दुर्गप्रकार - भुईकोट

श्रीगोंदा