नाशिकमधील त्र्यंबकेश्वर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. ब्रम्हगिरी किल्ल्यावरून उगम पावणारी गोदावरी येथुन दक्षिणेकडे वाहत आंध्रप्रदेशात राजमहेंद्री इथे बंगालच्या उपसागराला मिळते. बारा ज्योतिर्लिगांपैकी एक स्थान व गोदावरी नदीचा उगम असलेला ब्रह्मागिरी पर्वत भाविकांनी कायम गजबजलेला असतो. एकेकाळी इतिहासात महत्वाची भूमिका बजावणारा हा किल्ला आज केवळ गोदावरीचे उगमस्थान म्हणुन प्रसिध्द असुन आपली मुळची ओळख हरवुन बसला आहे. आपण मात्र ब्रम्हगिरी पर्वताला किल्ला म्हणुनच भेट देणार असुन त्याच दृष्टीने त्याच्याकडे पाहणार आहोत. सातवाहनकाळात महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणारा व्यापारी मार्ग त्रिंबक डोंगररांगेतून जात असल्याने त्याच्या संरक्षणासाठी ब्रम्हगिरी उर्फ श्रीगड किल्ला बांधला गेला. बारा ज्योतिर्लिंगांतील त्र्यंबकेश्वर हे ठिकाण किल्ल्याच्या पायथ्याला असल्याने हा किल्ला त्रिंबकगड या नावाने जास्त प्रसिद्ध आहे. त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी वहातुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा असुन यापैकी हत्तीमेट हि वाट कड्यातून वर येते तर दुसरी राजदरवाज्याची मुख्य वाट त्र्यंबकेश्वर गावातुन पायरी मार्गाने वर येते. यातील पहिली हत्तीमेटची वाट वापरात नसुन या वाटेवर दरड कोसळली असल्याने या वाटेवरील दरवाजा दगडाखाली गाडला गेला आहे व हि वाट धोकादायक बनली आहे. गडावर येणारी दुसरी वाट हि सोपी असुन सतत वाहती आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराकडून गंगाद्वारकडे जाताना पाय-या सुरू होताना डावीकडे एक पायवाट दिसते. या वाटेने पुढे गेल्यावर हि वाट पुढे गावातुन येणाऱ्या दुस-या पाय-यांच्या वाटेला मिळते व आपला गडप्रवास सुरु होतो. तळापासून साधारण ५०० पायऱ्या चढुन आल्यावर थोडीशी सपाट वाट चालु होते. पुढे काही अंतरावर वाटेच्या डाव्या बाजुला एक मोडकळीस आलेले दगडी बांधकामातील मंदीर दिसते. द्वारपट्टीवर असणारे गणेशशिल्प हे शिवमंदीर असल्याचे सुचवते पण आत दरवाजातच एका देवीच्या मुर्तीची स्थापना केलेली आहे. वाटेच्या शेजारी असणाऱ्या झुडुपात काही उध्वस्त वास्तुंचे अवशेष व दोन लहान विहिरी असुन गड नांदता असताना या भागात काही वस्ती असावी असे वाटते. मंदिरासमोर वाटेच्या बाजुला दोन उध्वस्त बुरूज असुन त्यांच्या शेजारी काही तटबंदीचे अवशेष दिसतात. गडाकडे जाणाऱ्या वाटेवरील हे पहाऱ्याचे मेट आहे. या मेटावरून पुढे आल्यावर उजव्या बाजुला एका चौथऱ्यावर दगडी बांधकामातील एक दुमजली वास्तू असून तिच्या दर्शनी भागात गणेशमुर्ती व काही शिल्पे कोरलेली आहेत. हि वास्तू म्हणजे सिंध प्रांतातील व्यापारी मुलतानी लालचंद भंभानी यांनी शके १९१३ मध्ये यात्रेकरूना राहण्यासाठी बांधलेली धर्मशाळा असुन तसा शिलालेख या धर्मशाळेच्या भिंतीवर लावला आहे. त्यांनी या वास्तुबरोबर गडाकडे जाणाऱ्या काही पायऱ्यादेखील बांधुन काढल्या. धर्मशाळेच्या दोन्ही मजल्याचे दोन भाग केलेले असुन मागील बाजुस जेवणासाठी व यज्ञविधी करण्यासाठी वेगळी वास्तू आहे. धर्मशाळेचा परीसर दगडांनी बांधुन काढलेला असुन वरच्या मजल्यावर जाण्याकरता बाहेरील बाजुस जिना आहे. धर्मशाळेच्या मागील बाजुस दगडी बांधकामातील ७०-८० फुट खोल पायऱ्या असलेली बारव असुन तिच्या काठावर एक दगडी ढोणी व झिजलेला शिलालेख दिसुन येतो. धर्मशाळेसमोर उघडयावर एक हनुमानाची मुर्ती असुन हि मुर्ती मेटाबाहेर असलेल्या दगडी मंदिरातील असण्याची शक्यता आहे. येथुन पुढील वाटेवर सुरवातीला बांधीव दगडी पायऱ्या असुन नंतरची वाट व पायऱ्या मात्र कातळात कोरून काढल्या आहेत. दीड फुट उंचीच्या या पायऱ्यावर आधारासाठी लोखंडी कठडे रोवले आहेत. येथुन पंधरा मिनिटे चढाई केल्यावर खडकात खोदलेली पहारेकऱ्याची गुहा लागते. या गुहेत एक खोली असुन टेहळणीसाठी असलेल्या या गुहेत सध्या ब्रह्मदेवाची मुर्ती विराजमान आहे. या वाटेवर मोठया प्रमाणात माकडं असुन ती खाण्यासाठी पर्यटकांना त्रास देत असल्याने जवळ शक्यतो काठी बाळगावी. येथुन पुढील वळणावर खडकात खोदलेली दहा फुट उंचीची हनुमानाची मुर्ती असुन यात हनुमानाने आपल्या पायाखाली राक्षसाला दाबून धरले आहे. येथुन पुढील भागात वाटेवरील दुसरी गुहा समोर येते. या गुहेत शिरण्यासाठी पायऱ्यांच्या बाजूने लहानसा दरवाजा कोरलेला असुन दरवाजाच्या दोन्ही बाजुस दोन ऋषींच्या मुर्ती कोरल्या आहेत. या गुहेचा कड्याकडील भाग संपुर्ण उघडा असुन गुहेत दोन कोरीव मुर्त्या ठेवलेल्या आहेत. येथुन काही अंतर पुढे गेल्यावर गडाचा पहिला दरवाजा समोर येतो. दरवाजाच्या अलीकडे उजव्या बाजुला दोन कातळशिल्पे आहेत. संपुर्ण कातळात खोदलेला हा दरवाजा आपल्याला सातवाहन काळाची आठवण करून देतो. या दरवाजातून काही पायऱ्या चढुन वर गेल्यावर गडाचा दुसरा कातळात कोरलेला दरवाजा समोर येतो. गडाचे दोन्ही दरवाजे उत्तराभिमुख असुन पहिला दरवाजा साधारण आहे तर दुसऱ्या दरवाजावर मोठया प्रमाणात कोरीवकाम केले आहे. दरवाजाबाहेर खालील बाजुस चौथऱ्यावर दोन हत्ती कोरलेले असुन वरील बाजुस दरवाजाची चौकट, चर्या व फुले कोरलेली आहेत. दरवाजाबाहेर डाव्या बाजुस एक देवळी कोरलेली असुन त्यात देवीचे शिल्प कोरले आहे तर आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या कोरल्या आहेत. या दरवाजातून काही पायऱ्या चढून गेल्यावर आपण गडमाथ्यावर पोहोचतो. पायथ्यापासुन येथवर येण्यास एक तास लागतो. त्रिंबकगड समुद्रसपाटीपासून ४२४८ फूट उंचावर असुन ४०० एकरपेक्षा जास्त परिसरात पुर्वपश्चिम पसरला आहे. त्रिंबकगडचा माथा म्हणजे मध्यभागी एक टेकडी व तिच्या चहुबाजुला प्रशस्त पठार आहे. साधारण आयताकृती आकार असलेल्या या किल्ल्याला तीन सोंडा असुन एका सोडेवर हत्तीमेट दरवाजा तर दुसऱ्या सोडेसमोर दुर्गभांडार किल्ला आहे. तिसरी सोंड सरळसोट कडा असल्याने येथे कोणतीही सरंक्षण व्यवस्था नाही. माथ्यावर आल्यावर दरवाजाच्या परीसरात किल्ल्याची जुजबी तटबंदी दिसुन येते. येथुन उजव्या व डाव्या बाजुला जाणारी वाट गडाच्या माचीवर जाते तर समोरील वाट किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या बालेकिल्ल्याच्या टेकडीच्या दिशेने जाते. डाव्या बाजुच्या वाटेने सुरवात केल्यावर आपल्याला सर्वप्रथम घडीव दगडांनी बांधलेल्या दोन समाध्या दिसुन येतात. या समाध्यांच्या वरील बाजुस एक प्रशस्त तलाव असुन सध्या तो कोरडा पडलेला आहे. तलावाच्या वरील बाजुस एका वाड्याचे अवशेष असुन खालील बाजुस असलेल्या बुरुजावर चौकीचे अवशेष दिसुन येतात. तलावापासुन ५०० फुट अंतरावर दारूगोळ्याचे कोठार व इतरही बरेच अवशेष दिसुन येतात. ते पाहुन मुळ वाटेवर येऊन टेकडीकडे निघावे. या वाटेवरील पायऱ्या चढताना बारकाईने पाहिल्यास एका ठिकाणी उध्वस्त तटबंदी व बुरुजाचे अवशेष दिसतात. येथुन बालेकिल्ल्याची तटबंदी सुरु होत असावी. पुढे या वाटेवर डाव्या बाजुस एक चुन्याच्या घाण्याचे चाक दिसुन येते. वाट सोडुन चाकाच्या वरील बाजुस गेल्यावर सातवाहनकालीन खांबटाके दिसुन येते. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. टाके पाहुन मुळ वाटेने पुढे निघाल्यावर डाव्या बाजुस एक आश्रम दिसतो. या आश्रमाच्या मागील बाजुस गडावर आजही मोठया प्रमाणात शिल्लक असलेली एक मोठी उध्वस्त वास्तू दिसते. हि वास्तू म्हणजे गडावरचे धान्यकोठार आहे. धान्यकोठाराकडून एक बांधीव वाट समोरच असलेल्या झाडीमधून टेकडाकडे जाताना दिसते. या वाटेच्या शेवटी डोंगराच्या पोटात खोदलेली एक मोठी गुहा आहे. या गुहेत सध्या एक साधु मुक्कामाला आहे. गुहेच्या शेजारीच खडकात खोदलेले एक गोलाकार टाके अथवा विहीर आहे. हे पाहून पुन्हा मुळ वाटेला लागावे. या वाटेने आपण गडाच्या मधील उंचवट्यावर पोहचतो. येथुन डावीकडील वाट गोदावरी मंदिराकडे तर उजवीकडील वाट जटाशंकर मंदिराकडे जाते. डावीकडील वाटेने पुढे जाताना पुन्हा एकदा बालेकिल्ल्याच्या उध्वस्त तटबंदीचे दर्शन होते. वाटेत एका ठिकाणी अर्धवट गाडलेल्या सतीशिळेचे दर्शन करत ५ मिनिटांत आपण गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या ब्रम्हगिरी मंदिराजवळ पोहोचतो. कड्यालगत असलेले हे मंदीर म्हणजे चारही बाजुंनी भिंती व मध्यभागी पाण्याचे चौकोनी टाके व टाक्याच्या तीन बाजुस ओवऱ्या व त्यात देवांची स्थापना अशी याची रचना आहे. मंदिराच्या वरील बाजुस खडकात खोदलेली पाण्याची दोन टाकी असुन यातील एक टाके दगडांनी बांधुन बंदिस्त केले आहे. या टाक्यातील पाणी गंगातीर्थ म्हणुन वापरले जाते. टाक्याच्या वरील बाजुस एक समाधीचा दगड असुन खालील बाजुस उध्वस्त तटबंदी व इतर अवशेष दिसुन येतात. हत्तीमेट दरवाजावरून गडावर येणारी वाट या ठिकाणी आपण आलेल्या वाटेला मिळते. हा परीसर पाहुन सरळ जाणाऱ्या वाटेने आपण जटाशंकर मंदिराकडे पोहोचतो. या ठिकाणी शंकराने जटा आपटून गंगानदी भूतलावर आणली अशी कथा आहे. मंदिराच्या मागील बाजुस खडकात खोदलेले एक पाण्याचे टाके आहे. मंदिराच्या मागील बाजूने एक लहान पायवाट टोकावरील दुर्गभांडार किल्ल्याकडे जाते. या वाटेवर खडकात खोदलेले एक पाण्याचे टाके असुन तटाला लागुन व टोकावरील बुरुजावर चौकीचे अवशेष पहायला मिळतात. गडाच्या टोकाला दुर्गभांडारवर जाण्यासाठी खडकात खोदलेला सुंदर पायरीमार्ग आहे. या वाटेने टेकाडाला वळसा घालत आपण गडाच्या अलीकडील माचीत जेथुन सुरवात केली तेथे पोहोचतो. गडाच्या माचीच्या या भागात देखील खुप मोठया प्रमाणात वस्तीचे अवशेष दिसुन येतात. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. गडाची माची खुप मोठी असल्याने संपुर्ण परीसर फिरणे शक्य नसले तरी वास्तू अवशेष असणारा गडमाथा फिरण्यास दोन तास लागतात. गडावरील एकूण वास्तू पहाता गड नांदता असताना गडावर मोठया प्रमाणात वस्ती असावी असे वाटते. गडमाथ्यावरून अंजनेरी, हरिहर, बसगड, त्रिंगलवाडी असा दूरवरचा परिसर दिसतो. देवदर्शन व साहस असा दुहेरी अनुभव घेण्यासाठी ब्रह्मागिरी- दुर्गभांडार भटकंती एकदा तरी करायला हवी. ब्रह्मगिरी किल्ल्याचा सर्वप्रथम उल्लेख पुराणात येतो. गोहत्येचे पातक दूर करण्यासाठी गौतम ऋषींनी ब्रम्हगिरीवर तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केले व त्यांच्या जटेतील गंगेची भुतलावर मागणी केली. पण गंगा राजी नसल्याने महादेवाने त्याच्या जटा ब्रम्हगिरीवर आपटल्या व गंगा भुतलावर आणली. किल्याच्या ब्रम्हगिरी या नावामागे सुद्धा एक आख्यायिका आहे. विष्णू व ब्रम्हदेवाने शिवाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी ब्रम्हाने शिवाच्या मस्तकाचा शोध लावायचा आणि विष्णूने त्याच्या चरणांचा शोध करायचा ठरवले. पण त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत तेव्हा ब्रह्मदेवाने आपल्या सामर्थ्याने गाय आणि केतकीपुष्प निर्माण केले आणि त्यांची खोटी साक्ष उभी केली. ब्रम्हाने सांगितले की मी शिवाच्या मस्तकाचा शोध लावला आणि केतकीच्या फुलाने व दुधाने त्याचा अभिषेक केला. ब्रह्मदेवाचे कारस्थान शिवाला कळल्यावर शिवाने कृद्ध होऊन ब्रम्हदेवाला आजपासून भूतलावर तुझी पूजा करणार नाही असा शाप दिला. त्यावर ब्रम्हदेवाने शिवाला भूतलावर पर्वत होऊन राहण्याचा प्रतिशाप दिला. शिवाने भूतलावर पर्वताचे रूप घेतले तोच हा ब्रम्हगिरी पर्वत.ब्रम्हगिरी किल्ल्याची बांधकाम शैली पहाता हा किल्ला सातवाहन काळात बांधला गेला असावा पण गडाचा इतिहास ज्ञात होतो तो यादव काळापासून. इ.स.१२७१ -१३०८ या काळात या परिसरावर राजा रामदेवराय यादव याची सत्ता होती. तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत आपल्या मुलांना घेऊन त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आले असता निवृत्तिनाथांना ब्रह्मगिरी पर्वतावरच्या एका गुहेत तपश्चर्या करत असलेल्या गहिनीनाथांचे दर्शन घडले अशी कथा आहे. पुढील काळात किल्ला बहमनी राजवटीच्या अमलाखाली आला. सन १४८५ मध्ये बहमनी साम्राज्याच्या अस्तानंतर निजामशाही स्थापन करणाऱ्या मलिक अहमदने सन १४८७ साली हा किल्ला ताब्यात घेतला पण नंतर तो मोंगलाकडे गेला. इ.स.१६२९मध्ये शहाजीराजांनी हा किल्ला व आजूबाजूचा परिसर जिंकला. शाहजानने हा परिसर परत घेण्यासाठी आठ हजारांचे घोडदळ पाठवले. इ.स.१६३३ मध्ये त्रिंबकगडचा किल्लेदार मोगलांकडे गेला. १७ जुन १६३६ रोजी मुघल व आदिलशाहीने एकत्र येऊन निजामशाही जिंकली व निजामशहाला कैदेत टाकले त्यावेळी शहाजीराजांनी निजामाचा एक वंशज मुर्तुजा याला निजामशहा म्हणून घोषित करून स्वतः वजीर बनले. इ.स.१६३६ मध्ये उत्तरेच्या प्रचंड फौजांपुढे शहाजीराजांचा माहुली येथे पराभव झाला व त्रिंबकगड मोगलांचा सेनापती खानजमान ह्याच्या हवाली केला गेला. इ.स.१६७० मध्ये मराठयांनी मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली त्रिंबकगड जिंकला. १६८२ च्या सुमारास सुमारास खानजमानचा मुलगा मुझ्झफरखान याच्या मोगली फौजेने गडाच्या पायथ्याच्या तीन वाड्या जाळल्या. १६८३च्या फेब्रुवारी महिन्यात राधो खोपडा फितुर होऊन मुघल सरदार अनामतखान याला जाऊन मिळाला. त्रिंबकगडच्या किल्लेदाराला फितुर करण्याचा त्याचा प्रयत्न फसला व मोगलांनी त्यालाच कैद केले. इ.स.१६८४ च्या नोव्हेंबर महिन्यात अक्रमखान आणि महमतखान यांनी त्रिंबकगडाच्या पायथ्याच्या वाडया जाळुन तेथील जनावरे पळवली. १६८२ ते १६८४ या काळात मोगलांचे गड जिंकण्याचे सर्व प्रयत्न फसले. इ.स. १६८८च्या ऑगस्ट महिन्यात मोगल सरदार मातबरखानाने किल्ल्याला वेढा घातला. औरंगजेबला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो त्रिंबकच्या किल्ल्याभोवती मी चौक्या बसविल्या असुन सहा महिन्यांपासून किल्ल्यामध्ये रसद व लोकांचे येणेजाणे बंद आहे. त्यामुळे किल्ल्यातील लोक हवालदील होतील आणि शरण येतील. यावर औरंगजेब त्याला लिहिलेल्या प्रोत्साहनपर पत्रात म्हणतो त्र्यंबकचा किल्ला घेण्याचा हरप्रकारे प्रयत्न करावा तुमच्या कामाचे चीज होईल. यावर मातबरखान औरंगजेबाला पत्रातून किल्ला कसा घेतला ते कळवितो. गुलशनाबाद म्हणजेच नाशिकच्या ठाण्यात आपले सैन्य कमी असल्याने मी त्रिंबकच्या किल्लेदाराला बादशाही कृपेची आश्वासने दिली. ८ जानेवारी १६८९ ला गडाचे अधिकारी तेलंगराव व श्यामराज हे किल्ल्यावरून खाली उतरले व किल्ला ताब्यात आला. तेलंगराव व श्यामराज यांना द्यावयाच्या मनसबी यादीत दिल्या आहेत. त्यांची अर्जी आणि किल्ल्याच्या चाव्या पाठविल्या आहेत. याशिवाय मातबरखान कळवितो या मोहिमेत औंढाचा किल्लेदार श्यामसिंग याचा मुलगा हरिसिंग याने मोठी कामगिरी केल्याने त्याला तीनशे स्वार व हजार पायदळ देऊन त्रिंबकगड सांभाळण्यास ठेवले आहे. साल्हेरचा किल्ला ताब्यात घेतांना जशी बक्षिसी आणि मनसब देण्यात आली तशीच बक्षिसी आणि मनसब त्र्यंबकचा किल्लेदार तेलंगराव व श्यामराज यांना दयावी. यावर पाठविलेल्या फर्मानात औरंगजेब लिहितो कि तुमची अर्जी पोहोचली. आपण त्रिंबकगड जिंकून त्रिंगलवाडी किल्ल्याला वेढा घातल्याचे कळले. आपण पाठविलेल्या त्रिंबकच्या चाव्या मिळाल्या असुन तुमची कामगिरी पसंत आहे. तुमच्या मनसबीत पाचशेची वाढ करण्यात आली असुन तुम्हाला खिलतीचा पोशाख झेंडयाचा मान आणि तीस हजार रूपये देण्यात येत आहे. पुढे १६९१च्या सुमारास येथील अधिकारी मुकर्रबखान बादशहास लिहीतो त्र्यंबकच्या किल्लेदाराचा मृत्यु झाला असुन त्याचा मुलगा लहान व कर्जबाजारी आहे. त्याच्यावर सावकाराचा तगादा चालू असुन त्याला त्रिंबकगड सांभाळणे शक्य नाही. कोणीतरी उमदा आणि अनुभवी मनुष्य किल्लेदार म्हणून पाठवावा अन्यथा किल्ल्यावर संकट कोसळेल. इ.स.१७१६ मध्ये शाहू महाराजांनी या किल्ल्याची मागणी मोगलांकडे केली पण ती फेटाळली गेली. इ.स.१७३० साली कोळयांनी बंड करून किल्ला घेतला व पुढे १८१८पर्यंत तो पेशव्यांच्या ताब्यात होता.--------------सुरेश निंबाळकर

जिल्हा - नाशिक 
श्रेणी  - मध्यम   
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग

त्रिंबकगड