जिल्हा -रत्नागिरी  
श्रेणी  - सोपी 
दुर्गप्रकार- सागरी किल्ला 

कनकदुर्ग

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बंदर प्राचिन काळापासून प्रसिध्द आहे. महाड, मंडणगड आणि खेड कडून गाडीमार्गाने दापोलीला पोहोचता येते. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासीक महत्व आहे. सुवर्णदुर्गाच्या समोरच्या किनाऱ्यावर हा किल्ला उभा आहे. सुवर्णदुर्ग संरक्षणासाठी वेगवेगळ्या राजवटीत हर्णे गावाच्या किनाऱ्यावर दुर्गत्रयी बांधण्यात आली, ती म्हणजे गोवा किल्ला, कनकदुर्ग व फत्तेगड. हर्णेच्या दक्षिणेकडे समुद्रात घुसलेल्या एक टेकडीच्या प्रचंड कातळाच्या माथ्यावर उभारलेला हा छोटेखानी किल्ला आहे. या किल्ल्याचे क्षेत्रफळ ५ एकर आहे. कनकदुर्गाची उभारणी कोणी आणि केव्हा केली हे ज्ञात नाही. हर्णे गावाकडून कनकदुर्गाकडे जाणारी वाट आपल्याला एका पुलावरून थेट पायऱ्यांपाशी घेऊन जाते. या पायऱ्याच्या बाजुलाच डौलाने भगवा झेंडा फडकणारा भक्कम बांधणीचा बुरुज आहे. काळ्या पाषाणातील हा बुरुज येथे पुर्वी किल्ला होता याचा साक्षीदार आहे. पायऱ्याच्या मार्गाने आपण पाच मिनिटांत कनकदुर्गावर पोहोचतो. पायऱ्यांवरुन आत गेले की उजव्या हाताला काही पाण्याची टाकी आहेत. इतक्या वर्षांच्या दुर्लक्षामुळे ती अगदी दुरावस्थेत व जवळपास बुजलीच आहेत. गडाच्या माथ्यावरच्या इमारती आता नष्ट झाल्या असून त्या भागात दिपगृह उभे असलेले दिसते. कनकदुर्गावरुन मुरुड दाभोळ तसेच गोपाळगडापर्यंत सागरकिनारा दिसतो. पश्चिमेकडे अथांग सागराच्या पार्श्वभूमीवर सुवर्णदुर्ग आपले लक्ष वेधून घेतो याशिवाय उत्तरेकडे फत्तेदुर्गाची टेकडी मच्छिमारांच्या वस्तीने पुर्णपणे घेरलेली दिसते. कनकदुर्गावर जास्त अवशेष नसल्याने अर्ध्या तासात आपला किल्ला पाहून होतो. सन १८६२ मधल्या एका संदर्भात ह्या दोन्ही किल्ल्यांची दुरावस्था नोंदली गेली आहे. ------------सुरेश निंबाळकर