जिल्हा - पुणे 
श्रेणी  -  सोपी   
दुर्गप्रकार - भुईकोट

महाराष्ट्रात वाडे व गढीकोट यांची संख्या हजारोच्या घरात आहे. वतने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत. तसेच वाढत्या कुटुंबामुळे बरेचसे गढीमालक कामधंद्याच्या निमित्ताने इतरत्र स्थलांतरीत झाल्याने काही गढ्या ओस पडुन उध्वस्त झाल्या आहेत. स्थानिकांची या वास्तुप्रती असलेली उदासीनता देखील या गढीकोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. आंबीखुर्द गावात असलेली गढी हि त्यापैकी एक. आंबीखुर्द गढी पुण्यापासुन सासवड-जेजुरी मार्गे ६३ कि.मी.अंतरावर असुन जेजुरी आंबीखुर्द हे अंतर १६ कि.मी. आहे. आंबीखुर्द गावात हि गढी बामनाची गढी म्हणुन ओळखली जाते. हि गढी गावातील प्राथमिक शाळेजवळ असुन साधारण एक एकर परिसरात पसरलेली आहे. गढीबाबत स्थानिकांना माहिती विचारली असता हि बामनाची गढी असुन त्यांचे वंशज नाशिकला रहातात इतकीच माहिती त्यांना सांगता येते. साधारण पेशवेकाळात बांधलेल्या या गढीच्या बांधकामातील आज केवळ दोन बुरुज काही तटबंदी व या गढीच्या आतील बारव वगळता काहीही शिल्लक नाही. गढी ओस पडल्याने सर्व बांधकाम कोसळुन त्यावर गवत माजले आहे तर बुरुजाचे रुपांतर मातीच्या ढिगाऱ्यात झाले आहे. आयताकृती आकारातील या गढीच्या तटबंदीत कधीकाळी चार बुरुज असल्याच्या खुणा दिसुन येतात. गढीच्या बाहेरील दगडांनी बांधलेली तटबंदी १०-१५ फुट उंच असुन यातील शिल्लक असलेल्या बुरुजाबाहेर बांधकामाचा चुना मळण्याचा घाणा व त्याचे दगडी चाक पहायला मिळते. गढीच्या आतील बाजूस आजही शिल्लक असलेला विटांनी बांधलेला अर्धवट कोसळलेला साधारण २० फुट उंचीचा बुरुज पहाता गढीत असणारी वास्तु हि दुमजली असल्याचे लक्षात येते. गढीच्या आत एका टोकाला एक चौकोनी बारव असुन या बारवमध्ये उतरण्यासाठी जमिनीशी समांतर अशा पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या शेवटी विहिरीत जमीनी लगतच कमान आहे. विहिरीच्या आतील बाजुस चार ओवऱ्या असुन वरून येणाऱ्या पायऱ्या यातील एका ओवरीत उतरतात. विहिरी शेजारी पाणी साठविण्यासाठी चुन्यात बांधलेला लहानसा चौकोनी हौद आहे. शाळेतील मुले गढीत शिरून पायऱ्यांनी विहिरीत उतरत असल्याने पुढील धोका टाळण्यासाठी या विहिरीत उतरणाऱ्या पायऱ्यावर दगड टाकुन हा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे. संपुर्ण गढी पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. गढीचा इतिहास तुर्तास उपलब्ध नाही. ---------------------सुरेश निंबाळकर

आंबीखुर्द