एकेकाळी खानदेशात असणारे नंदुरबार खानदेशच्या विभाजनानंतर स्वतंत्र जिल्हा म्हणुन अस्तित्वात आले. नंदुरबार जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी नदीमुळे या जिल्ह्याचे उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग झालेले असुन जिल्ह्याच्या सीमा थेट मध्यप्रदेश व गुजरात राज्याला भिडल्या आहेत. अदीवासी बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात एकेकाळी एक दोन नव्हे तर तब्बल १५ किल्ले गिरीदुर्ग, भुईकोट व गढी या स्वरुपात अस्तित्वात होते. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे महाराष्ट्रातील गडकिल्ले या पुस्तकातील ७ किल्ले वगळता इतर कोठेही या किल्ल्यांचा उल्लेख दिसुन येत नाही. यात सुलतानपुर या किल्ल्याचा उल्लेख असुन फारच त्रोटक माहिती उपलब्ध आहे. आजच्या संगणकाच्या युगात आंतरजालावरही या किल्ल्यांची माहिती दिसुन येत नाही. आमच्या दुर्गभरारी या समुहाने या सर्व किल्ल्यांचा अभ्यासपुर्ण दौरा केला असता मिळालेली माहिती या संकेतस्थळावर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. यात १३ गढीकिल्ले असुन त्यात १ गिरिदुर्ग, ३ भुईकोट २ नगरकोट तर उरलेल्या ७ गढी आहेत. स्थानिकांची उदासीनता या किल्ल्यांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील आजही सर्वात जास्त अवशेष अंगावर बाळगुन असलेला किल्ला म्हणजे सुलतानपुर. एकेकाळी खानदेशाचा भाग असणारे हे गाव खानदेशच्या विभाजनानंतर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्याचा भाग बनले. सुलतानपुर किल्ला दक्षिण नंदुरबार भागात राज्य महामार्ग क्र.५ वर शहादा पासुन १३ कि.मी. अंतरावर आहे. सुलतानपुरला भेट देण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम नंदुरबार अथवा शहादा गाठावे लागते. नंदुरबार सुलतानपुर हे अंतर ५३ कि.मी.असुन प्रकाशा- उंटवड- धडगावफाटा मार्गे तेथे जाता येते. गावातील आश्रमशाळेजवळ हा किल्ला असुन शाळेच्या आवारातून किल्ल्यावर जाण्यासाठी वाट आहे. साधारण अर्धवर्तुळाकार असलेला हा किल्ला गोमती या तापी नदीच्या उपनदीवर वसलेला असुन किल्ल्याला एका बाजुने नदीचे सरंक्षण असुन दुसऱ्या बाजूस खंदक खोदुन नदीचे पाणी या खंदकात सोडून किल्ला पुर्णपणे सरंक्षित करण्यात आला आहे. सध्या जमीनीच्या बाजूस असलेल्या या खंदकात शेती करण्यात येत असुन त्यासाठी याबाजुची तटबंदी बहुतांशी पोखरली आहे. किल्ल्याची नदीच्या बाजूस असणारी दगडी तटबंदी आजही शिल्लक असुन या तटबंदीत आपल्याला मोठया प्रमाणात कोरीव दगड व शिल्प पहायला मिळतात. यात एक सप्तमातृकाचे शिल्प असुन एका ठिकाणी जमिनीवर कोसळलेली कीर्तिमुख व द्वारदेवता कोरलेली द्वारपट्टी पहायला मिळते. नदीपात्रात मोठया प्रमाणात काटेरी झुडपे असल्याने संपुर्ण तटबंदी फिरता येत नाही पण या तटबंदीत शिल्लक असलेले ५ बुरुज मोजता येतात. तटबंदी पाहुन आश्रमाच्या आवारातुन पुढे आल्यावर उध्वस्त दरवाजातून आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. किल्ल्याचे प्रवेशद्वार उत्तराभिमुख असुन किल्ल्याचा परीसर साधारण ६ एकरवर पसरलेला आहे. किल्ल्याचा दरवाजा व कमान पुर्णपणे नष्ट झालेला असुन दरवाजाच्या तळातील अवशेष दिसुन येतात. दरवाजाशेजारील दोन्ही बुरुज ढासळलेले असुन एका बुरुजावर कबर बांधलेली आहे. या वाटेने पुढे आल्यावर आपल्याला एक उध्वस्त इमारत व तिला लागुन असलेला साधारण २५ फुट उंचीचा अर्धवट ढासळलेला बुरुज दिसुन येतो. किल्ल्याच्या अंतर्गत असलेल्या या बुरुजाचा उपयोग किल्ल्यात तसेच बाहेरही लक्ष ठेवण्यासाठी होत असावा. या इमारतीत पाच कबर असुन त्या पाचपीर म्हणुन ओळखल्या जातात. किल्ल्याच्या यापुढील भागात उजव्या बाजुला खुप मोठया प्रमाणावर झाडी वाढलेली असुन डाव्या बाजुला शेती केलेली असल्याने सर्व अवशेष भुईसपाट करण्यात आले आहेत. किल्ल्यावर आजही अस्तित्वात असलेली अजुन एक वास्तु म्हणजे हमामखाना. हा हमामखाना दोन दालनांचा असुन दोन्ही दालनावर गोलाकार घुमट आहेत. संपुर्ण हमामखाना विटांनी बांधलेला असुन त्याला आतुन चुन्याचा गिलावा केलेला आहे. त्यातील हौद,कोनाडे,कमान, पाणी गरम करण्याचा चुल्हाणा, खापरी नळ वापरून केलेली पाणीयोजना हे सर्व आजही पहाता येते. काटेरी झुडुपात दडलेले अजुनही काही बांधकामाचे अवशेष दिसतात पण झुडुपामुळे तेथवर जाता येत नाही. किल्ल्यावरील इमारती कोसळुन मातीचा खुप मोठया प्रमाणात ढीग जमा झाल्याने बहुतांशी अवशेष मातीखाली गाडले गेले आहेत. मातीचा हा ढिगारा तटबंदीच्या फांजीपर्यंत आला आहे. हा ढिगारा उपसल्यास बरेच अवशेष उजेडात येतील. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. किल्ल्याचे फारसे अवशेष नसल्याने अर्ध्या तासात संपुर्ण किल्ला पाहुन होतो. खानदेशचा पहिला सुलतान फारुकी मलिकराज यांने सुलतानपूर व नंदुरबार हीं शहरे व त्याचा आसपासचा परीसर इ.स.१५३० सालीं ताब्यात घेतला परंतु गुजरात सुलतान मुजफर ह्याच्या आक्रमणाने फारुकी मलिकराज याला थाळनेराकडे परतावें लागलें. इ.स.१५३६ मध्यें महंमुदशहा बेगडा (तिसरा) या गुजरातच्या सुलतानाने राजा झाल्यावर त्यानें अशीरगडावर कैदेंत असतांना कबूल केल्याप्रमाणें सुलतानपूर व नंदुरबार हीं ठाणीं व हा भाग मुबारकखान फारुकी यांस दिला. नंतर मात्र या भागावर मोगल सत्ता आली. धुळे जिल्हा गॅझेटप्रमाणे १६३४ मध्ये शहाजहानने खानदेशातील सुलतानपूर आणि नंदुरबार हे प्रांत माळवा प्रांताला जोडुन त्यांचे मुख्य केंद्र बु-हाणपूर ठेवले होते. गॅझेटमधील दुसऱ्या एका नोंदीनुसार सुलतानपुरचे प्रमुख लक्ष्मणराव देसाई यांनी होळकरांना राजे मानण्यास नकार दिला व सुलतानपुरच्या पश्चिमेस ६ मैलावर त्यांचे मित्र असलेले भिल्लनेता जुगर नाईक यांच्या चिखली गावी मुक्काम हलविला. होळकरांनी पत्र लिहून लक्ष्मणराव यांच्याकडे ५०० रुपये चौथाई मागितली असता लक्ष्मणराव यांनी त्यांना उलट जवाब पाठविला. हे सर्व ऐकून होळकरांच्या भीतीने गावातील एक श्रीमंत व्यापारी व प्रतिष्ठित व्यक्ती कृपाराम दगरम यांनी होळकरांना भेटुन स्वतःला यातुन वाचविण्यासाठी ५०० रुपये पेशगी दाखल दिले. यानंतर होळकर यांच्या भिल्ल सैन्याने शहरात प्रवेश करून देसाई यांचे घर व चौक्या ताब्यात घेतल्या. भिल्ल सैन्याने केवळ एक घर वगळता संपुर्ण शहर बेचिराख केले. नीटनेटके आखीव रस्ते, वाडे व बगीचे यांनी सुशोभित असलेले राज्याचे प्रमुख शहर वैराण झाले. ---------------सुरेश निंबाळकर

जिल्हा - नंदुरबार  
श्रेणी  - सोपी   
दुर्गप्रकार - भुईकोट

सुलतानपुर