सावंतवाडी

जिल्हा - सिंधुदुर्ग

श्रेणी  - सोपी

दुर्गप्रकार- भुईकोट

सावंतवाडी शहरावर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली. मुंबई गोवा महामार्गाने गोव्याला जाताना या शहरात असलेला मोती तलाव व त्या शेजारील राजवाडा बहुदा सर्वानीच पहिला असेल. पण कधीकाळी हा तलाव व राजवाडा इतकेच नव्हे तर सावंतवाडी शहर देखील किल्ल्यातच वसले होते हे ऐकून थोडे आश्चर्यच वाटते. वाढत्या शहरामुळे हा किल्ला आज पुर्णपणे नष्ट झाला असुन आज या किल्ल्याचा कोलगाव दरवाजा,मोती तलाव, राजवाडा व त्यामागील बुरुज व राजवाडयात असणाऱ्या सहा तोफा इतकेच किल्ल्याचे अवशेष शिल्लक आहेत. मुंबई ते सावंतवाडी हे अंतर ५०० कि.मी.असुन या सर्व वास्तु महामार्गावरच असल्याने सहजपणे पहाता येतात. मुंबईहुन जाताना सावंतवाडी शहरात शिरल्यावर सर्वप्रथम लागतो तो कोलगाव दरवाजा. हा दरवाजा व त्याशेजारील दोन्ही बुरुज आजही सुस्थितीत असुन या बुरुजात बंदुकीच्या व तोफांच्या मारगिरीसाठी जंग्या दिसुन येतात. दरवाजाच्या वरील बाजुस नगारखाना बांधलेला असुन आतील बाजुने त्यावर जाण्यासाठी जिना आहे. दरवाजा पाहुन महामार्गाने तसेच पुढे आल्यावर आपण मोती तलावाकडे पोहोचतो.हा तलाव साधारण ३० एकर परिसरावर पसरलेला असुन या तलावाचे बांधकाम १८७४ साली झाल्याचे वर्ष कोरलेला दगड तलावाच्या काठावर दिसतो. तलावातील पाणी बाहेर काढण्यासाठी तीन स्तरावर मोऱ्या बांधल्या असुन १८९५ साली नळाचा वापर करून या नळांनीं शहरभर पाणी खेळविलें गेले. सावंतवाडी शहर या तलावाच्या काठावरच वसलेले असुन तलावाच्या पूर्वेला सावंतांचा राजवाडा दिसतो. राजवाड्याच्या आवारात जाण्यासाठी ब्रिटीश काळात नव्याने बांधलेला महादरवाजा असुन हा दरवाजा लिस्टर गेट नावाने ओळखला जातो. युरोपियन बांधणीचा हा दरवाजा १० ऑक्टोबर १८९५ला बांधल्याचा उल्लेख दरवाजावरील शिलालेखात येतो. या आधीच्या दरवाजाचे चित्र आपल्याला वाड्याच्या आत पहायला मिळते.दरवाजाच्या आतील बाजुस असलेली पहारेकऱ्याची देवडी आधीच्या दरवाजाच्या बांधकामातील असावी. या देवडीत वरील बाजुस ४ लहान तोफा पहायला मिळतात. दरवाजासमोरच जांभ्या दगडात बांधलेला दुमजली राजवाडा असुन हा राजवाडा दरबार व निवास अशा दोन भागात विभागला आहे. राजवाड्याचे बांधकाम २१ मार्च १८८१ मध्ये झाल्याचा शिलालेख वाड्याच्या भिंतीत पहायला मिळतो. वाडा व दरबार पहाण्यासाठी नाममात्र प्रवेश शुल्क आकारले जाते. दरबारात सावंतांचे सिंहासन ,तलवारी, बंदुका,पिस्तुल,झुंबरे,शिकार केलेले वाघ-बिबळे. पितळी भांडी या सारख्या अनेक वस्तु नीटपणे मांडून ठेवल्या आहेत. दरबाराच्या दरवाजाबाहेर एक पाषाणात कोरीवकाम केलेले सुंदर तुळशी वृंदावन पहायला मिळते. दरबार पाहुन निवासी भागात आल्यावर दरवाजा समोर दोन मध्यम आकाराच्या तोफा पहायला मिळतात. निवासी भागाची रचना चौसोपी वाड्यासारखी असुन याचा केवळ एक भाग संग्रहालयाच्या वापरात आहे. या संग्रहालयात भोसले घराण्यातील व्यक्तींची छायाचित्रे व त्यांच्या वापरातील वस्तु ठेवलेल्या आहेत. या ठिकाणी सावंत राजघराण्याची वंशावळ पहायला मिळते. राजवाड्याच्या मागील भागात सावंतवाडी किल्ल्याचा शिल्लक असलेला एकमेव बुरुज असुन या बुरुजावर मोठया प्रमाणात झाडी वाढली आहे. या बुरुजाची उंची जमिनीपासुन ४० फुट असुन वर बंदुकीच्या व तोफांच्या मारगिरीसाठी जंग्या आहेत. या ठिकाणी आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण किल्ला पहाण्यास दोन तास लागतात. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील तालुक्याचे ठिकाण असलेले सावंतवाडी हे संस्थानाचे राजधानीचे शहर होते. सावंतवाडी संस्थानात दोडामार्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि गोव्यातील बिचोलिम, पेडणे आणि सत्तारी या गावांचा सामावेश होत होता. सावंतवाडीचे मूळ नाव सुंदरवाडी. आज आपण सावंतवाडी म्हणतों तो भाग दक्षिण कोकणातील कुडाळ व भीमगड या परगण्यात होता. या संस्थानचा मूळ पुरुष मांग सावंत उदेपूर येथील शिसोदिया घराण्यापैकीं असून त्याचें उपनांव भोंसले होतें. या भागात विजयनगरची सत्ता असताना मांग सावंत होडावडें येथें रहात होते. विजयनगरचा हा भाग आदिलशाहीच्या ताब्यात आल्यावर कुडाळकर देशस्थ प्रभु या परगण्याचे सरदेसाई झाले. इ.स.१५९७ साली या सरदेसाई कडील देवदळवी या सेनापतीने बंड केल्याने आदिलशाहने मांग सावंत यांना त्यांचा बिमोड करण्यास पाठवले. या लढाईत दोघेही मृत्युमुखी पडले. मांगसावंत यांची सात बायकापैकी सहा सती गेल्या व सातवी गरोदर बायको ओटवणे येथें जाऊन राहिली. तिच्या मुलाचे नाव फोंड सावंत. सावंतवाडीचे संस्थापक खेम सावंत पहिले हे या फोंड सावंताचे पुत्र. या खेम सावंताने १६२७ मध्ये आदिलशाहकडून देशमुखीची सनद घेउन वाडीच्या आसपासचा काही प्रदेश घेत आपले छोटे राज्य स्थापन केले. त्याच्यामागे त्याचा मोठा मुलगा सोमसावंत नंतर फोंडसावंत व १६५१ साली फोंड सावंत मरण पावल्यावर त्याचा धाकटा भाऊ लखम सावंत गादीवर आला. इ.स.१६६४मध्ये आदिलशाही व मराठे युद्धात लखम सावंत आदिलशाहबरोबर होता पण पराभव झाल्याने त्याला तह करावा लागला. लखम सावंत १६७५ सालीं मरण पावल्यावर गादीवर आलेला त्याचा पुतण्या खेम सावंत याची कारकीर्द इ.स.१६७५ ते १७०९ अशी झाली. इ.स.१६८४ मध्ये संभाजीराजांच्या काळात खेमसावंत मोगलांना सामील झाले. इ.स.१६९७ मध्यें खेमसावंत यांनीं कुडाळ येथील प्रभूंचा पराभव केला व ते या परगण्याचे सरदेसाई झाले. या खेमसावंतानें चराठें हें राजधानाचें ठिकाण करून तेथें वस्ती करविली. याच गांवाला पुढें सुंदरवाडी म्हणूं लागले व कालांतराने त्याचे सावंतवाडी झाले. खेमसावंत १७०९ साली मरण पावल्यावर फोंड सावंत गादीवर आले. फोंडनंतर त्याचा नातू रामचंद्र सावंत राजा झाला पण सर्व कारभार मात्र त्याचा चुलता जयराम याच्या हातात होता. रामचंद्राचा पुत्र खेमसावंत गादीवर आल्यानंतर (१७५५) त्याने पोर्तुगीजांपासून गेलेला मुलुख परत मिळविला (१७९१). ८ मार्च १७८६ रोजी पेशव्यांचे सरदार जिवाजी गोपाळ यांनी लिहिलेल्या पत्रात सावंतांकडे ३-४ हजार पायदळ असल्याचा उल्लेख येतो. इ.स.१८०३ मध्यें खेम सावंत निपुत्रिक वारल्याने वारसाहक्काची भांडणें सुरु झाली व खेमसावंताची पत्नी लक्ष्मीबाई हिच्या दत्तकविधानाने रामचंद्र उर्फ भाऊसाहेब सावंत गादीवर आले. सन १८०८ मध्ये भाऊसाहेबाचा खून झाला व लक्ष्मीबाई मरण पावल्याने खेम सावंताची दुसरी पत्नी दुर्गाबाई हिने दुसरा मुलगा दत्तक घेतला. हा फोंड सावंत १८१२ सालीं वारला तेव्हां अल्पवयीन खेम सावंत गादीवर आला. १८१९ मध्ये मेजर कीर याने सावंतवाडीवर हल्ला केला व सावंतांचा पराभव करून अचीन्सन यास तेथे अधिकारी नेमत संस्थानाचा कारभार स्वतःच्या हातात घेतला. इ.स.१८३२ साली सावंतवाडी संस्थानाच्या अखत्यारीत कुडाळ,बांदा,आवाडे,सावंतवाडी ही चार भुईकोट व हनुमंतगड, नृसिंहगड,सोनगड हे डोंगरी किल्ले होते. १८४४ मध्ये फोंड सावंताचें बंड उद्भवलें त्यांत युवराज फोंडसावंत उर्फ आबासाहेब सामील होते. १८६७ला खेम सावंत मरण पावल्यावर फोंड सावंत गादीवर आले. पण अल्पावधीत ते मरण पावल्याने त्यांचा मुलगा रघुनाथ सावंत उर्फ बाबासाहेब गादीवर बसले. १८९९ मध्ये बाबासाहेब मृत्यु पावले व त्यांचा चुलत भाऊ श्रीराम गादीवर आला. श्रीराम सावंत १९१३ मध्यें मरण पावले त्यावेळीं अल्पवयीन युवराज बापूसाहेब इंग्लंडमध्ये होते. दुसऱ्या महायुद्धांत त्यांनी मेसापोटेमियां येथे केलेल्या कामगीरीवर त्यांना हिज हायनेस व कॅप्टन या पदव्या मिळाल्या. २९ ऑक्टोबर १९२४ साली इंग्रजसरकारनें बापूसाहेबांच्या हातीं संस्थानाच्या कारभाराची सूत्रे दिलीं.----------सुरेश निंबाळकर

DIRECTION