रायगड जिल्ह्यातील पेण शहर येथे बनविल्या जाणाऱ्या गणपतीच्या मुर्तींमुळे संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. या पेण शहराच्या पुर्वेला महालमिऱ्या डोंगररांग पसरली आहे. पेण-खोपोली हा प्राचीन व्यापारी मार्ग या डोंगररांगेतुन जात असल्याने त्यावर लक्ष ठेवण्यासाठी या डोंगररांगेच्या दक्षिणेला सोनगिरी उर्फ मिरगड हा किल्ला तर पुर्व टोकाला रत्नदुर्ग किल्ला बांधला गेला. किल्ल्याचा आकार व वरील अवशेष पहाता या किल्ल्याचा वापर टेहळणीसाठी केला जात असावा. मुंबई-पुण्याहुन जवळ असलेला हा लहानसा किल्ला एका दिवसात सहजपणे पहाता येतो व वेळेचे काटेकोर नियोजन केल्यास हा किल्ला व जवळच असलेला सोनगिरी उर्फ मिरगड हा किल्लादेखील पहाता येतो. सायमाळ हे लहानसे गाव रत्नदुर्ग किल्ल्यासमोर असलेल्या टेकडीच्या काठावर वसलेले असुन पुर्वी हे गाव रत्नदुर्ग किल्ल्याची पेठ होती. सायमाळ हे किल्ल्याजवळील गाव मुंबईहुन ९० कि.मी. अंतरावर तर पुण्याहुन १०७ कि.मी.अंतरावर आहे. सायमाळ गावात जाण्यासाठी मुंबईहुन पनवेल-पेण- वाक्रुळ फ़ाटा– सायमाळ तर पुण्याहुन पेणकडे जाताना खोपोली-वाक्रुळ फ़ाटा-सायमाळ असा गाडीमार्ग आहे. वाक्रुळ ते सायमाळ अंतर ७ कि.मी. असुन खाजगी वहानाने थेट सायमाळ गावात पोहोचता येते. गावात नव्याने बांधलेले गणपती मंदिर असुन येथे प्रसंगी १०-१२ जण मुक्काम करू शकतात. या मंदिराच्या मागील बाजुस असलेल्या दरीत पहिले असता या दरीतुन एक लहानसा डोंगर उठावलेला दिसतो. हा डोंगर म्हणजेच रत्नदुर्ग किल्ला होय. गड छोटा असला तरी गडावर कुणी जात नसल्याने पायवाटा नष्ट झाल्या आहेत त्यामुळे गावातुन शक्यतो वाटाड्या घेऊनच किल्ल्यावर जावे. गावातील कच्चा रस्ता या दरीपर्यंत व पुढे एक पायवाट या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या काळभैरवाच्या मंदिराकडे जाते. सायमाळ गावातुन १५ मिनिटात आपण या काळभैरवाच्या मंदिरापाशी पोहोचतो. मंदिराबाहेर भग्न झालेली मुर्ती ठेवली असुन मंदिरात नव्याने घडवलेली मुर्ती आहे. या मंदिराच्या मागील बाजूने डावीकडे वर जाणारी खड्या चढणीची व घसाऱ्याची वाट अर्ध्या तासात आपल्याला किल्ल्याच्या माथ्याखाली असलेल्या लहानशा सपाटीवर घेऊन जाते. येथे कातळात कोरलेले दोन लहान खळगे असुन हे खळगे बहुदा कातळ फोडण्यासाठी अथवा झेंडा रोवण्यासाठी केले असावेत. येथुन सायमाळ गाव व दुरवरची तिलोरे, डोलवली गावे अगदी चित्रात काढल्यासारखी दिसतात. येथुन समोरील टेकडावर थोडेसे चढून आल्यावर वाटेवर कातळात आतील बाजुस खोदलेले एक टाके दिसते. या टाक्यात बाहेरील बाजुस गाळ जमा झाला असुन त्यावर झाडी वाढली असली तरी आतील बाजुस असलेले पाणी दिसते. टाक्याकडून एक वाट सरळ उतरत जाते तर दुसरी वाट किल्ल्याच्या माथ्याकडे जाते. या दुसऱ्या वाटेने किल्ल्याची उध्वस्त तटबंदी पार करत आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो. या तटबंदीवर एक दगडी पन्हाळी पडलेली आहे. सायमाळ गावातुन माथ्यावर येण्यासाठी १ तास पुरेसा होतो. किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची ११६० फुट असुन किल्ल्याचा गोलाकार माथा साधारण अर्धा एकर आहे. गडमाथ्यावर भग्न झालेली गडदेवतेची मुर्ती असुन मुर्तीसमोर एक कोरीव दगड पडलेला आहे. मुर्तीपासून काही अंतरावर शिवलिंग उघडयावर पडलेले आहे. गडावरुन मिरगड, माणिकगड हे किल्ले तसेच हेटवणे धरण दिसते. हे पाहुन आपण तटबंदी चढुन आलो त्या वाटेच्या पुढील बाजुस दुसरी वाट खाली उतरतांना दिसते. हि वाट आपण खाली पाहिलेल्या टाक्याकडून पुढे जाणाऱ्या वाटेस मिळते. या ठिकाणी किल्ल्याची दुसरी लहान सपाटी असुन येथे कातळात कोरलेले काही खळगे तसेच दुसरे कोरडे पडलेले टाके अथवा गुहा पहायला मिळते. टाक पाहून पुढे गेल्यावर आपण समोरील डोंगर व किल्ल्याचा डोंगर यामधील खिंडीच्या बाजुस येतो. येथे कातळात खोदलेल्या काही खाचा असुन त्याची पकड घेत खाली उतरल्यावर खडकात खोदलेले व आजही थंडगार नितळ पाण्याने भरलेले टाके पहायला मिळते. हे पाणी पिण्यायोग्य आहे. टाके भरल्यावर पाणी बाहेर जाण्यासाठी दगडात लहानसा चर कोरलेला आहे. वाटाड्याच्या सांगण्यानुसार या टाक्याच्या खालच्या बाजूला कोरडे पडलेले चौथे टाक आहे पण तेथे जाता येत नाही. येथुन मागे फिरून आधी पाहिलेल्या गुहा टाक्याकडे आल्यावर एक वाट समोर चाफ्याची झाडे असलेल्या टेकडावर जाते. या टेकडावर एक बुजत चाललेले टाके असुन दुसऱ्या बाजूला एका ढासळलेल्या बुरुजाचे अवशेष आहेत. ते पाहून आलेल्या मार्गाने जपून परत पायथ्याशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. संपुर्ण किल्ला पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. किल्ला उतरल्यावर दरीत असलेल्या विहिरीजवळ एक गजलक्ष्मी शिल्प तसेच गावातील शाळेच्या आवारात तुटलेल्या तोफ़ेचा मागील भाग पहायला मिळतो. किल्ल्यावरील खडकाच्या आतील बाजुस खोदलेली पाण्याची टाकी पहाता हा किल्ला सातवहानकालीन असावा असे वाटते पण गावकरी हा किल्ला बाबुराव पाशिलकर (बाजीराव पासलकर?) यांनी बांधल्याचे सांगतात. इ.स.१६६२ मध्ये मुघल सरदार नामदारखान याने पेण परिसरावर हल्ला केला असता मिरगडच्या परिसरात झालेल्या लढाईत शिवाजी महाराजांनी भाग घेतल्याचे उल्लेख येतात. मुघलांकडून हा किल्ला घेण्याचा प्रयत्न झाला असता गडाचा किल्लेदार कावजी कोंढाळकर याने तो हाणून पडला. यानंतर किल्ल्याचे उल्लेख येतात ते पेशवे-आंग्रे यांच्या पत्रव्यवहारातुन. मार्च १७४० दरम्यान बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशवे व चिमाजीअप्पा मानाजी आंग्रे यांच्या मदतीसाठी आले असता त्यांनी तुळाजी आंग्रे यांस कैद करून पाली, मिरगड हा भाग ताब्यात घेतला. त्यात १० एप्रिल १७४० उरुणचें ठाणें सर केल्याचें वर्तमान आलें. २९ एप्रिल १७४० फावडी किल्ला ता॥ रत्नगड जावजी मराठे यांणी सर केल्याचे वर्तमान आलें असे वाचनात येते..-----------------सुरेश निंबाळकर

जिल्हा - रायगड

श्रेणी  -  मध्यम

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग

रत्नदुर्ग

DIRECTION