छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकोट हे अतुट नाते आपल्याला दक्षिणेतील दुर्गभ्रमंती करताना देखील पहायला मिळते. राजाभिषेकानंतर महाराजांनी काढलेल्या दक्षिण मोहीमेत मराठयांचे राज्य तुंगभद्रा कावेरीपर्यंत पसरले. महाराजांनी केवळ राज्याचा केवळ विस्तार न करता मिळालेले राज्य टिकुन रहावे यासाठी या भागात असलेल्या किल्ल्यांची दुरुस्ती करण्यासोबत काही किल्ले नव्याने बांधले. यामुळे दक्षिणेकडील या प्रांतात दुर्ग उभारणीत मराठयांचा देखील सहभाग दिसुन येतो. आदिलशहाच्या ताब्यात असलेला दक्षिणेकडील प्रांत महाराजांनी स्वराज्याला जोडला त्यावेळी या भागातील पारसगडसारखे गिरीदुर्ग दुरुस्त केले तर मनोली,हुबळी हलीयाळ या भुईकोटाबरोबर नारगुंद,सुबापुर या सारखे गिरीदुर्ग नव्याने बांधले. भाषावार प्रांतरचना करताना स्वराज्यात असणारा बेळगाव हा मराठी बहुभाषिक प्रांत कर्नाटक राज्याला जोडला गेला. गडाच्या पायथ्याशी असलेल्या सुबापुर गावात आजही मोठ्या प्रमाणात मराठी बोलणारी व मराठी आडनावे असलेली घरे मोठया प्रमाणात दिसुन येतात. एकेकाळी स्वराज्यात असलेल्या या किल्ल्यांना मी महाराष्ट्रातील किल्ले समजतो व त्यांचा उल्लेख महाराष्ट्रातील किल्ले म्हणुन करत आहे. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यात असलेला सुबापुर हा गिरीदुर्ग बेळगाव पासुन ६० कि.मी. वर तर सौंदत्तीपासुन ३६ कि.मी. अंतरावर आहे. सुबापुर गावामागे असलेल्या साधारण १५० फुट उंचीच्या टेकडीवर हा किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला आहे. गावातुन मळलेली वाट अर्ध्या तासात आपल्याला दोन बुरुजामध्ये बांधलेल्या बंदीस्त तटबंदी मधुन गडाच्या उत्तराभिमुख दरवाजात घेऊन जाते. दरवाजाची कमान पुर्णपणे नष्ट झाली आहे. गडावर प्रवेश केल्यावर समोरच दाट झाडीत असलेला बांधीव चौथरा पहायला मिळतो. हा चौथरा नसुन चौकोनी आकाराचे पाण्याचे खोल टाके आहे. या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. टाके पाहुन पुन्हा दरवाजात यावे व डावीकडील तटबंदीवरून गडफेरीस सुरवात करावी. समुद्रसपाटीपासून २७२० फुट उंचावर असलेला आयताकृती आकाराचा हा गड १२ एकरवर पसरलेला आहे. गडाची तटबंदी आजही सुस्थितीत असुन त्यावरून संपुर्ण गडाला फेरी मारता येते. तटावरून चालत थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे पाण्याचे एक जोडटाके पहायला मिळते. या टाक्याच्या पुढील बाजुस किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष आहेत. वाडा पाहुन पुन्हा तटावर यावे व आपल्या पुढील फेरीस सुरवात करावी. तटबंदीतील बुरुज पार करत आपण गडाच्या दक्षिण टोकावर येतो. दक्षिण टोकावर पोहचण्यापुर्वी उजवीकडे थोडी झाडी दिसुन येते. या ठिकाणी ४०x४० फुट आकाराचे पाण्याचे तिसरे मोठे टाके आहे. गडाच्या दक्षिण टोकावर दोन बुरुजात लपवलेला गडाचा दुसरा दरवाजा आहे. गडाच्या दक्षिण भागात दुहेरी तटबंदी बांधलेली असुन आतील तटबंदीत दोन तर बाहेरील तटबंदीत तीन बुरुज बांधलेले आहेत. गडाची बाहेरील संपुर्ण तटबंदी रचीव दगडांची असुन आतील बाजुस असलेली तटबंदी घडीव दगडात चुन्याने बांधलेली आहे. या तटबंदीच्या मध्यभागी असलेल्या बुरुजातुन बाहेरील तटबंदीत जाण्यासाठी लहान दरवाजा आहे. आतील तटबंदीजवळ एका वास्तुचा चौथरा आहे. दक्षिणेकडील तटबंदी पाहुन उत्तरेला वळल्यावर वरून उजवीकडे किल्ल्याच्या आतील भागात एक सुटा बुरुज पहायला मिळतो. किल्ल्याच्या अंतर्गत भागात लक्ष ठेवण्यासाठी या बुरुजाची रचना केलेली असुन या बुरुजावरून आपल्याला संपुर्ण किल्ला पहाता येतो. बुरुजाजवळ भिंत शिल्लक असलेल्या दोन लहान वास्तु आहेत. बुरुज पाहुन तटावरून पुढे जाताना उजव्या बाजुस तटाजवळच पुन्हा एक ४०x४० फुट आकाराचे पाण्याचे चौथे टाके आहे. तटावरून चढउतार करण्यासाठी जागोजागी पायऱ्या बांधल्या आहेत. हे टाके पाहुन तटावरील पुढील दोन बुरुज पार केल्यावर पाण्याचे पाचवे टाके पहायला मिळते. या टाक्याच्या पश्चिमेला थोडी झाडी दिसुन येते. या झाडीत आपल्याला चौकोनी आकाराची मोठी विहीर पहायला मिळते. या विहिरीजवळच आपण सुरवातीला पाहिलेल्या किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष आहेत. येथुन आपण प्रवेश केलेल्या दरवाजाजवळ आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण गड फिरण्यास एक तास पुरेसा होतो. गडाच्या बाहेरील तटबंदीत १५ दुहेरी तटबंदीत २ तर मध्यभागी १ असे एकुण १८ बुरुज आहेत. गडावर पाण्याची एकुण सहा टाकी असुन चार ठिकाणी पाणी असले तरी एकाही टाक्यात पिण्यायोग्य नाही त्यामुळे पिण्याचे पाणी सोबत ठेवुनच गडावर चढाई करावी. सुबापुर किल्ल्याचा इतिहास इ.स १६७५ साली छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरु होतो. दक्षिण मोहिमेच्या काळात महाराजांनी हा भाग ताब्यात घेतल्यावर येथील देसाई महाराजांना सामील झाले. या गिरीदुर्गाची बांधणी महाराजांनी केल्याचे उल्लेख चाचडी येथे असलेल्या देसाई घराण्याच्या कागदपत्रात येतात. सुबापुर गिरिदुर्ग बांधताना मराठयांना चाचडी कोटातुन मदत केली जात असल्याचे उल्लेख येतात. यानंतरचा या कोटाचा इतिहास माझ्या वाचनात आला नाही. सध्या हा कोट गावाच्या नावाने ओळखला जात असुन या कोटाचे नाव काहीतरी वेगळे असावे त्यामुळे याचे पुढील संदर्भ लागत नाहीत. --------सुरेश निंबाळकर

सुबापुर

जिल्हा - बेळगाव

श्रेणी  -  सोपी

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग