महाराष्ट्रात स्वराज्याची पहिली राजधानी असलेला दुर्गदुर्गेश्वर रायगड पहिला नाही असा दुर्गपेमी विरळाच!! किल्ले रायगडला भेट दिल्यावर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड कोटातील आऊसाहेबांचे निवासस्थानाला भेट देऊन नंतर समाधीचे दर्शन घेणे ओघानेच येते. वयोमानाप्रमाणे राजमाता जिजाऊंना गडावरची थंड हवा मानवत नसल्याने महाराजांनी गडाच्या पायथ्याशी भक्कम तटबंदीच्या आत राजमातेच्या इतमामाला साजेसा वाडा बांधला होता. हा वाडा म्हणजे एक प्रकारचा भुईकोट होता. मुंबईहून गोवा महामार्गाने माणगाव पार केल्यावर डावीकडे रायगडला जाणारा रस्ता आहे. मुंबईहुन माणगावमार्गे पाचाड हे अंतर १५७ कि.मी.आहे तर महाडमार्गे १८२ कि.मी.आहे. या रस्त्याने पाचाड गावात जाताना रस्त्याच्या उजवीकडील बाजुस हा कोट नजरेस पडतो. चौकोनी आकाराचा पाचाड कोट ५ एकरवर पसरलेला असुन याच्या तटबंदीत चार टोकाला असलेले ४ बुरुज वगळता पुर्व,उत्तर व दक्षिण बाजुस प्रत्येकी ३ बुरुज तर पश्चिमेला ५ बुरुज अशी याची रचना आहे. कोटाचा पुर्वाभिमुख दरवाजा दोन बुरुजांमध्ये बांधलेला असुन एका बुरुजावर तोफ ठेवलेली आहे. तटाची उंची साधारण १०-१२ फुट आहे. दरवाजातून आत शिरल्यावर दिसणारे दोन उंच चौथरे म्हणजे किल्लेदाराचे व सबनीसाचे घर आहे. या चौथऱ्याच्या उजवीकडे काहीसा मागील बाजुस कोरीव दगडात बांधलेला चौथरा म्हणजे कोटाची सदर आहे तर या तीन वास्तुंच्या मागील बाजुस असलेला २०० x ५० फुट आकाराचा लांबलचक चौथरा म्हणजे आऊसाहेबांचा रहाता वाडा आहे. एकेकाळी दुमजली असलेल्या या वाडयाच्या चौथऱ्याला तीन दालने असुन यातील उत्तरेकडील दालन म्हणजे स्वयंपाकघर, मधील दालन दिवाणखाना तर दक्षिणेकडील दालन शयनगृह असावे. उत्तरेकडील दालनात आपल्याला पायऱ्या असलेले एक भुमीगत कोठार व बाहेरील बाजुस दगडी ढोणी पहायला मिळते. वाडयाला लागुन दोन षटकोनी आकाराचे चौथरे आहेत. रायगडावर असलेले मनोरे कदाचीत येथेही असावेत. वाडयाच्या उत्तरेस घडीव दगडात बांधलेली आयताकृती आकाराची मोठी विहीर असुन या विहिरीच्या पुर्व बाजुस अजुन एक बंदीस्त विहीर पहायला मिळते. या विहीरीच्या दरवाजावर असलेल्या लोडाच्या आकाराच्या दगडामुळे हि विहीर लोडबाव अथवा तक्क्याची विहीर म्हणुन ओळखली जाते. या दोन्ही विहीरी घडीव दगडात बांधलेल्या असुन आत उतरण्यासाठी पायऱ्या व दरवाजे आहेत. या शिवाय या भागात असलेले इतर अवशेष म्हणजे शस्त्रागार,कोठार,अंगरक्षक व नोकर-चाकरांची घरे आहेत. कोटाचा उत्तरेकडील भाग तटबंदी बांधुन या रहात्या भागापासुन काहीसा अलीप्त केला असुन तेथे कोरडा पडलेला तलाव वगळता कोणतेही ठळक अवशेष दिसुन येत नाही. या तलावाजवळ वरील बाजुस असलेल्या वास्तुशेजारी दोन दगडी ढोणी आहेत. या भागातुन कोटाबाहेर जाण्यायेण्याकरता उत्तरेकडील तटबंदीत वेगळा दरवाजा आहे. तटावरून फेरी मारताना तटावर चढ उतार करण्यासाठी जिने असुन या तटबंदीत काही शौचकुप आहेत. कोटाची फेरी करण्यासाठी एक तास पुरेसा होतो. कोट पाहुन झाल्यावर कोटापासून काही अंतरावर असलेल्या जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेता येते. जन्म विदर्भात, विवाह मराठवाड्यातील भोसले कुळात तर बहुतांशी वास्तव्य घाटमाथ्यावरील मावळात व आयुष्याचा उत्तरार्ध कोकणात असे संपुर्ण महाराष्ट्रात आयुष्य व्यतीत केल्यावर या राजमातेने पाचाड मुक्कामी १८ जून १६७४ रोजी पहाटे शेवटचा श्वास घेतला. त्यांचा पाचाडचा वाडा व समाधी याचे दर्शन घेतल्याशिवाय आपली रायगडवारी पूर्णच होऊ शकत नाही. जिजाऊच्या वास्तव्यासाठी बांधलेल्या या कोटाचा शिवकालानंतर भुईकोट म्हणुन वापर केल्याचे दिसुन येते. रायगडच्या पाडावानंतर रायगड किल्ला व पाचाड कोट मोगलांनी जंजिऱ्याच्या सिद्दीच्या ताब्यात दिले. शाहु महाराज महाराष्ट्रात परतल्यावर त्यांनी ५ जून १७३३ रोजी रायगडचा ताबा घेतला पण पाचाडचा कोट ताब्यात येण्यासाठी १० जानेवारी १७३४ उजाडले. यावेळी झालेल्या लढाईत सिद्दी अंबर मारला गेला व पाचाडच्या तोफा रायगडच्या मोर्चेबंदीसाठी नेण्यात आल्या. शाहु महाराजांनी कोट सचिवांच्या ताब्यात दिला व त्यांनी आनंदराव भैरव यांस बंदोबस्तासाठी नेमले. यानंतर शाहु महाराजांनी रायगड,पाचाड व महाड प्रांत पोतनिसाच्या ताब्यात दिला. नारायणराव पेशव्यांतर्फे अप्पाजी हरी या प्रांताचा ताबा घेण्यास आले असता पोतनीसांच्या गडकऱ्यांनी गड झुंजवण्याऐवजी पाडुन टाकला. येथील सामान जाळले व ते रायगडावर निघुन गेले. अप्पाजी हरी यांनी कोट ताब्यात घेतला त्यावेळी कोटात १० खंडी भात व २५ खंडी नागली होती. -----------सुरेश निंबाळकर

जिल्हा - रायगड

श्रेणी  -  सोपी

दुर्गप्रकार- गढी

पाचाड कोट