रायरेश्वर 

जिल्हा - पुणे

श्रेणी  -  मध्यम

दुर्गप्रकार- गिरीदुर्ग

स्वराज्य संस्थापनेत शिवाजी महाराज व सह्याद्री यांचे अतुट नाते आहे. स्वराज्य स्थापनेतील ज्या काही महत्वाच्या घटना घडल्या त्या सह्याद्रीच्या साक्षीने आणि सहकार्यानेच. यातील एक महत्वाची घटना म्हणजे शिवाजी महाराजांनी घेतलेली स्वराज्य स्थापनेची शपथ. हि घटना खरी कि काल्पनिक याला काही आधार नाही पण हि घटना घडल्याचे जे ठिकाण सांगीतले जाते ते म्हणजे रायरेश्वरावरील शंभुमहादेवाचे मंदिर. अनेकजण रायरेश्वरचा गड अथवा किल्ला म्हणुन उल्लेख करतात पण हा किल्ला नसुन ११ कि.मी. लांब व १.५ कि.मी. रुंद असलेले रायरीचे पठार आहे. पुण्याहुन ८५ कि.मी. तर भोरवरून फक्त ३० कि.मी. अंतरावर असलेल्या या पठारावर पायपीट करत जाण्यासाठी अनेक मार्ग असले तरी खाजगी वाहनाने अथवा भोरहुन एस.टीने आपण थेट या पठाराच्या पायथ्याशी जाऊ शकतो. यासाठी भोर-अंबावडे–वडतुंबी-कोर्ले हा मार्ग सोयीचा आहे. पायथ्यापाशी आल्यावर आपण एका बाजुला केंजळगड तर दुस-या बाजूला रायरेश्वर या दोहोंच्या खिंडीत येतो. रायरेश्वर पठार जरी पुणे जिल्ह्यात असले तरी केंजळगड मात्र सातारा जिल्ह्यात येतो. येथुन सिमेंटने बांधलेल्या शे-सव्वाशे पायऱ्या व लोखंडी जिना चढुन वर आल्यावर कातळात कोरलेल्या १५-२० पायऱ्या लागतात. शिडी लावण्यापुर्वी या वाटेने प्रस्तरारोहण करत चढावे लागत असे. येथुन बांधीव पायवाटेने मंदिराकडे जाताना सर्वप्रथम एक पावसाळी तलाव व नंतर पाण्याचे टाके लागते. टाक्यात दगडामध्ये कोरलेले गोमुख असुन याच्या मुखातून टाक्यामध्ये पाणी पडत असते. पठारावर जंगम लोकांची जवळपास ४० कुटुंबे रहात असुन ते याच टाक्यातील पाणी पिण्यासाठी वापरतात. येथुन पुढे आल्यावर आपण रायरेश्वराच्या मंदिरात पोहोचतो. पायथ्यापासुन या मंदिरात येण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो. मंदिराची रचना मध्ययुगीन काळातील असुन मंदीराच्या बाहेरील बाजुस प्राकाराची भिंत आहे. मंदिर पुर्वाभिमुख असुन तीन भागात विभागलेल्या या मंदीरात सुरुवातीला नव्याने बांधलेली ओसरी त्यानंतर सभामंडप आणि गर्भगृह अशी याची रचना आहे. मंदीराच्या ओसरीत भग्न झालेले दोन नंदी ठेवलेले असुन आतील बाजुस डाव्या हाताच्या खांबावर मंदिराच्या जीर्णोद्धाराबद्दल एक झिजलेला शिलालेख आहे. या शिलालेखाचे वाचन झाले असुन रायरेश्वर पायथ्याच्या दापकेघर गावच्या हरी पाटलांनी शके १८०५ मध्ये या मंदिराचा ७०० रुपये खर्च करून जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंगाचे दर्शन घेताना भिंतीवर कुण्या भक्ताने दिलेली ढाल तलवार पहायला मिळते. मंदिराच्या मागे पाण्याचे तळे असुन समोर चौथऱ्यावर शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा दिसतो. या चौथऱ्याला लागुनच चुन्याच्या घाण्याचे चाक पडलेले आहे. पठारावर भातशेती केली जात असुन शिवमंदिर वगळता पाहण्यासारखे फार काही नाही पण पावसाळ्यानंतर या पठाराची शोभा अवर्णनीय असते. रायरेश्वर पठाराची समुद्रसपाटीपासून उंची ४३९३ फुट असुन पठाराच्या विवीध भागातुन कमळगड, केंजळगड, पांडवगड, रायगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, विचित्रगड, पुरंदर, चंद्रगड, मंगळगड, जननीचा दुर्ग उर्फ जासलोडगड व त्यामागे कावळ्या हे किल्ले नजरेस पडतात. रायरेश्वरावर मंदिरात किंवा गावात जंगम कुटुंबाकडून राहण्याची व जेवणाची सोय होऊ शकते. रायरेश्वरबद्दल सांगितली जाणारी घटना म्हणजे वयाच्या १६ व्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या मावळातील सवंगड्याच्या साथीने २७ एप्रिल १६४५ रोजी स्वराज्याची शपथ घेतली. यासाठी शके १५६७, वैशाख शुद्ध १ या पत्राचा आधार घेतला जातो ते असे आहे. श्री राजश्री दादाजी नरसप्रभु देशपांडे व कुलकर्णी त|| रोहिर खोरे वेलवंड खोरे यासी प्रती शिवाजी राजे सु|| खमस अर्वन अलफ श्री रोहिरेश्वर तुमचे खोरियातील आदिकुलदेव|| तुमचा डोंगरमाथा पठारावर शेंद्रीलगत स्वयंभु आहे. त्यांणी आम्हास यश दिल्हे व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करुन पुरवणार आहे. राजश्री दादापंताचे विद्यमाने बावाचे व तुमचे व आमचे श्रीपासी इमान जाले जे कायम वज्रप्राय आहे. हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे,,, २|| छ. २९ सफर बहुत काय लिहीणे? हे पत्र अस्सल नाही तर मुळ पत्राची नक्कल आहे. स्वराज्य स्थापनेच्या सुरवातीच्या काळात ज्या हालचाली झाल्या त्या या भागातच. दादाजी नरसप्रभु गुप्ते यांनी रायरेश्वरची पुजाअर्चा करायची व्यवस्था केली व शिवा जंगम नावाचा पुजारी तेथे कायमस्वरुपी नेमला. पुणे, सातारा व रायगड जिल्ह्यातील बहुतांशी किल्ल्यांचे दर्शन एकाच ठिकाणाहुन घडविणाऱ्या रायरेश्वर पठारास एकदा तरी भेट द्यायला हवी. ----------सुरेश निंबाळकर