इरशाळगड हा कर्जत विभागातला एक किल्ला आहे. गडावरील विशाळादेवीच्या नावाचा अपभ्रंश होऊन या गडाचे नाव ईरशाळगड झाले असावे. मुंबई - पुणे लोहमार्गावरुन जाताना इरशाळगड सहजच आपले लक्ष वेधून घेतो. मुंबईहून मुंबई- पुणे जुन्या हायवेने जाताना चौक फाट्या अलीकडे २ कि.मी.वर इर्शाळगडला जाणारा फाटा फुटतो.पण रस्ता विचारताना इरशाळगड न विचारता ठाकरवाडी विचारावे. इरशाळगड वाडीपर्यंत रस्ता जात नसुन ठाकरवाडी पर्यंत जातो. इरशाळगड वाडी हे किल्ल्याचे पायथ्याचे गाव असुन ठाकरवाडीतुन तिथपर्यंत चालत जावे लागते. त्याला दीड तास लागतो व इरशाळगड वाडीतून गडावर जायला अर्धा तास पुरतो. इरशाळगडाची समुद्रसपाटीपासून उंची ३७०० फुट आहे. वाटेत असणारे मोठे अडचणीचे दगड आणि समोरच अजस्त्र वाटणारे कातळ सुळके आपलं स्वागत करतात.कातळाच्या डाव्या बाजूनं चालत जाताना गडाचं स्वरूप अधिकच रौद्र भासतं. हीच वाट पुढे आपल्या गडाच्या मागील बाजूस घेऊन जातं.इरशाळ म्हणजे प्रबळगडचा व माथेरानचा सख्खा शेजारी. इरशाळ गडाचा इतिहासात उल्लेख आढळत नाही त्यामुळे त्याला गड म्हणणे योग्य ठरणार नाही.यावरील अवशेष पाहता हे केवळ एक पहाऱ्याचे अथवा टेहळणीचे ठिकाण असावे असे वाटते. इरशाळगड म्हणजे एक सुळकाच आहे. इरशाळ माची पासून गडावर जातांना सर्वप्रथम एका कड्याशी सोपे प्रस्तरारोहण करत आपण गड चढायला सुरवात करतो. वाटेतच पाण्याचे एक टाकं लागत.येथे एक शिडी बसवलेली आहे. शिडी चढण्यापूर्वी डावीकडे एका नैसर्गिक कपारीत विशाळा देवीची मूर्ती बसवलेली आहे. तेथून पुढे शिडी चढून व सोपे असे प्रस्तरारोहण करून आपण गडाच्या नेढ्यात पोहोचतो. नेढ्यापासून थोडे वर गेल्यावर, डावीकडे पाण्याचे एक टाकं लागत व बाजूलाच एक कपार आहे. हे पाणी पिण्यास योग्य आहे व मार्च पर्यंतच उपलब्ध असते.. नेढ्यातून समोर चढणारी वाट सुळक्यावर जाते. सुळक्यावर जाण्यासाठी प्रस्तारारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यकच आहे. गडपाथ्यावरून समोरच प्रबळगड, माथेरान, चंदेरी, मलंगगड, कर्नाळा, माणिकगड हा परिसर दिसतो. मे १६६६ मध्ये शिवरायांनी कल्याण-भिवंडी-रायरी पर्यंतचा सारा मुलुख घेतला तेंव्हा त्यामध्ये हा गड देखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. दोन पाण्याची टाकी सोडून गडावर पाहण्यासारखे काहीच अवशेष नाही. -----------------सुरेश निंबाळकर

​​​​​जिल्हा - रायगड 
श्रेणी  -अत्यंत कठीण   
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग 

​​इर्शाळगड