कोराईगड

​​​​​​​​​​​जिल्हा - पुणे 
श्रेणी  - मध्यम   
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग

मुंबई पुण्यापासून जवळच थंड हवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लोणावळ्याच्या दक्षिणेला २२ कि.मी. अंतरावर सहज जाता येण्यासारखा हा किल्ला. कोरीगडला जाण्यासाठी लोणावळ्याला यावे. येथून आय.एन.एस.शिवाजीमार्गे आंबवणे किंवा भांबुर्डेला जाणारी बस पकडावी किंवा सहारा प्रकल्पाची बस पकडावी आणि पुढे २२ कि.मी वरील पेठ-शहापूर गावात उतरावे. या गावातून सरळ जाणारी पायवाट आपल्याला अर्ध्या तासात पायऱ्यांजवळ घेऊन जाते. पायऱ्यांच्या साहाय्याने वीस मिनिटांत गडावर पोहचता येते. घाटमाथ्यावर असल्यामुळे या किल्ल्यावरून एकाच वेळी कोकण व देशावरील परिसराचे विस्तृत दर्शन घडते. समुद्रसपाटीपासून तीन हजार फूट उंचीच्या किल्ल्यातील बुरुजावरुन कोकणातील मुलुखाचे विहंगम दृश्य दिसते. मुळशी धरणाच्या पश्चिमेकडे एक मावळ आहे याच्या परिसरात येणाऱ्या ३६ गावामुळे त्याचे नाव आहे ३६ कोरबारस. याच प्रांतात कोरीगड आणि घनगड हे किल्ले येतात. लोणावळा आणि पाली यांच्याकडे असणाऱ्या सव्वाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरीगड आहे. हा किल्ला प्रसिद्ध आहे त्याच्या अखंड तटबंदीमुळे. पेठ-शहापूर गावातून कोराईगड एका भिंतीसारखा भासतो. गडाचा पसारा साधारणपणे उत्तर दक्षिण असुन माथ्यावर मोठी सपाटी आहे. गडाला कातळकड्यांचे नैसर्गिक संरक्षण मिळाले आहे. गडाची तटबंदी साधारणतः दीड किलोमीटर लांबीची आहे. तटबंदीवरून संपूर्ण गडाला फेरा घालता येतो. पेठ-शहापूरच्या वाटेने वर येताना मार्गात गुहा व पाण्याची टाके आणि श्रीगणेशाची मूर्ती लागते. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. याच्यासमोरच पुर्वी गडाचा पहिला दरवाजा होता जो आता अस्तीत्वात नाही. येथून पुढे पहिला दरवाजा लागतो त्याला गणेश दरवाजा म्हणतात. गणेशदरवाज्याने वर आल्यावर समोरच वाड्यांचे अवशेष आढळतात. समोरच पठारावर दुरवर कोराई देवीचे मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मंदिरासमोरच एक दीपमाळ आहे. गडावरील कोराई देवी ही गडदेवता आहे. सन १८१८ मध्ये इंग्रजांनी किल्ला जिंकेपर्यंत तिला सोन्याचे दागिने घातले जायचे. गड इंग्रजांकडे गेल्यावर तिचे सोन्याचे दागिनेही गेले व तेच दागिने आज मुंबईच्या मुंबादेवीला चढवलेले आहेत. कोराईदेवीच्या मूर्तीची उंची साधारणतः चार फूट असुन मुर्ती प्रसन्नवदनी, चतुर्भुज व शस्त्रसज्ज आहे. गडावर दक्षिणेकडच्या बाजूस अनेक बुरूज आहेत. गडावर आजही सहा तोफा आहेत. त्यापैकी सर्वात मोठी ‘लक्ष्मी’ तोफ कोराईदेवीच्या मंदिराजवळ आहे. याचप्रमाणे गडावर आणखी दोन मंदिरे आहेत. गडावर दोन विस्तीर्ण तळी आहेत. दोन्ही तळ्यात काळे विंचू व शेवाळ्याचा मुक्त संचार आहे. तळ्यांच्या पुढे पश्चिमकड्यावरील उत्तरेच्या बाजूला काही गुहा आहेत. यातील एका गुहेत खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. येथेच शंख-चक्र-गदा-पद्मधारी श्री विष्णूची मूर्ती आहे. गडाची तटबंदी बरीचशी चांगल्या स्थितीत आहे पण विशेष पाहण्यासारखा दक्षिणेकडील चिलखती बुरूज आहे. त्याला दुहेरी तटबंदीने अधिक भक्कम केले आहे. गडावरून समोरच नागफणीचे टोक, तुंग, मोरगिरी, मृगगड, तिकोना, राजमाची, धाक, माथेरान,प्रबळगड, कर्नाळा, माणिकगड आणि मुळशीचा जलाशय असा सर्व परिसर दिसतो. आजघडीला गडावर जाण्यासाठी दोन वाटा अस्तित्वात आहेत. गडावरील मंदिरात चार पाच जणाची राहण्याची सोय होते. किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वतःच करावी. गडावर दोन ठिकाणी पाण्याची सोय आहे. गडावर दोन तळी असली तरी त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. पेठशहापूर मार्गे गडावर येणाऱ्या वाटेवर दरवाजाच्या अलीकडे एक टाके आहे. पिण्याच्या पाण्यासाठी हे वापरावे. गडावर ज।ण्यासाठी पेठशहापूर मार्गे अर्धा तास लागतो. गडाबद्दल फारसा इतिहास ज्ञात नसला तरी गडाच्या पश्चिमेला उत्तर भागात आढळणाऱ्या गुहा आणि जमीनीतील टाके गडाच्या प्राचीनतेची साक्ष देतात. १६५७ मध्ये महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग-तिकोना या किल्ल्यांबरोबर कोरीगड आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला. सन १७०० मध्ये पंत सचिवांनी हा किल्ला घेतल्याचा उल्लेख आहे. नंतर तो पेशव्यांच्या ताब्यात आला व सरकारी बंदिवासासाठी घनगड व याचा वापर करण्यात आला. ११,१२ व १३ मार्च १८१८ असे सलग तीन दिवस कर्नल प्रॉथरने या किल्ल्यावर तोफगोळ्यांचा वर्षाव करून किल्ला भाजून काढला.त्यातील एक गोळा दारूकोठारावर पडला व त्यामुळे गडावर आग लागली. गडावर मोठ्या प्रमाणावर प्राणहानी आणि वित्तहानी झाली. नष्ट झालेल्या दारुकोठारामुळे व गडावरील प्राणहानीमुळे मराठ्यांनी शरणागती पत्करली व त्यांना गड सोडावा लागला. -----------------------------सुरेश निंबाळकर