​जिल्हा -पालघर  
श्रेणी  - सोपी 
दुर्गप्रकार-गिरीदुर्ग 

मालजी कोटास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनने नायगाव अथवा वसई स्थानकास उतरावे. मालजी कोट वसई रेल्वे स्थानकापासून १९ कि.मी. तर नायगाव स्थानकापासून १५ कि.मी.वर मुंबई-अहमदाबाद मार्गालगत आहे. या कोटाविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने व स्थानिक लोकांना काहीच माहिती नसल्याने तिथे जाण्यापूर्वी पुर्ण माहिती घेऊनच जाण्याचे ठरवावे. नायगावहुन जाताना मुंबई अहमदाबाद मार्गावर मालजीपाडा वसाहत आहे. येथे नव्यानेच झालेले मक्डोनाल्ड उपहारगृह व हिंदुस्तान पेट्रोलपंप हि खूण लक्षात ठेवल्यास हि जागा शोधणे सोपी जाते. मालजीपाडा या वसाहतीच्या मागे असलेल्या एका लहानशा टेकडीवर मालजी कोटाचे अवशेष कसेबसे तग धरून उभे आहेत. मुंबई -अहमदाबाद मार्गाला लागुनच मुंबईच्या दिशेने जाताना उजव्या बाजूला एका टेकडीवर मालजी कोटाची इमारत नजरेस पडते. वास्तू फारच छोटीशी असल्याने वेगात वाहन असल्यास नजरेस देखील येत नाही. मालजीकोट उभा असलेल्या टेकडीची उंची साधारण १५० फुट असुन टेकडी चढून जाण्यास २० मिनिटे पुरेशी होतात. टेकडीवर झुडुपांचे साम्राज्य असल्याने अवशेष नीटसे दिसून येत नाहीत व ओळखताही येत नाहीत पण पश्चिम दिशेला साधारण ३ फुटांची तटबंदी दिसून येते. या व्यतिरिक्त दुर्ग अवशेष म्हणुन मालजीकोटाचा एकमेव बुरूज शिल्लक आहे. या बुरुजाच्या बांधणीसाठी ओबडधोबड दगड व चिखलमाती यांचा वापर करण्यात आला आहे. बुरुजावरील मारगीरीसाठी असणाऱ्या बंदुकीच्या जंग्यावरून याचा मुख्य उद्देश सरंक्षण व टेहळणी असावा हे स्पष्ट होते. या कोटाची सध्याची उंची २० फुट असुन त्याची मूळ उंची ३० फुटापर्यंत असावी असे कोटाच्या भिंतीवर लाकडी वाशाकरिता असलेल्या खोबण्या वरून लक्षात येते. कोटाच्या आतील भागात राहण्याची,पाण्याची वा साठवणीची कोणतीही सोय आढळत नाही पण गुप्तधनाच्या लालसेने खोदलेले खड्डे दिसून येतात. याच्या एकंदरीत रचनेवरून याचा वापर खाडीच्या वाहतुक मार्गावर देखरेख करण्यासाठी आणि सभोवतालच्या प्रदेशाच्या संरक्षणासाठी होत असावा. या कोटाविषयी कोणतीही ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्याला स्थानिक गावच्या नावाने मालजकोट अथवा मालजीकोट म्हणुन ओळखले जाते. कोटाची सध्याची अवस्था फारच दयनीय झाली असुन भिंतीवर झाडे उगवली आहेत. ह्या बुरुजाच्या माथ्यावरुन उल्हासखाडी व आजूबाजूचा दूरवर कामनदुर्ग पर्यंतचा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. सदर कोटाची बांधणी पोर्तुगीज स्थापत्य शास्त्राप्रमाणे असुन साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी या कोटाची निर्मिती केली. या कोटांचा मुख्य उपयोग प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद आणि संरक्षण पुरविणे हा होता. लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. इ.स. १७३९च्या वसई मोहिमेत वसई किल्ल्यावरील विजयानंतर हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला. कोट छोटेखानी असून १० मिनीटात पाहून होतो. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण ज्याला प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी.

मालजगड