प्रबळगड ऊर्फ मुरंजन हा किल्ला रायगड जिल्ह्य़ातील पनवेल तालुक्यात असुन याची पायथ्यापासून उंची ४५० मीटर आहे. मुंबईहुन पुण्याला जाताना शंकुच्या आकाराची टेकडी आणि शेजारी प्रशस्त माथा असणारा डोंगर सहजपणे आपले लक्ष वेधुन घेतो. दोन डोंगराची ही जोडगोळी म्हणजेच किल्ले मुरंजन उर्फ प्रबळगड. प्रबळगड व त्याच्या बाजूचा कलावंतीणीचा सुळका याच्यामध्ये इंग्रजी "व्ही" आकाराची खाच आहे. माथेरानच्या "सनसेट पाँईंट"वरून दिसणारा सूर्यास्त याच प्रबळगडाच्या खाचेत होतो. पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमेला गडनदी, दक्षिणेला पाताळगंगा नदी , माणिकगड आणि नैऋत्येला कर्नाळा किल्ला तसेच जवळच इरशाळगड आहे. उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलुखात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरांवर नजर ठेवण्यास असावा. किल्ल्यावरील गुहांच्या अभ्यासावरुन त्यांचा कालखंड बौद्ध कालाशी जोडता येतो. त्यांच्यावरील मनुष्यनिर्मित गुहांमुळेच उत्तरकालातील शिलाहार, यादव या राज्यकर्त्यांनी त्याला लष्करी चौकी बनवून मुरंजन असे नाव दिले. बहामनीच्या कालात हा किल्ला आकारास आला असावा. नंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात तो आला. निजामशाहीच्या अस्तावेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मोगल सम्राट शाहजहान आणि विजापूरचा आदिलशहा यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या. १९ जून १६३५ रोजी मुघल सरदार खानजमान जुन्नरचा पूर्ण भाग आणि शिवनेरी किल्ला जिंकून शहाजीराजांचे पानिपत्य करण्यासाठी तो दख्खन मध्ये उतरला. त्याच प्रमाणे आदिलशाही कडून रणदौलत खान हि उतरला. पावसाला संपताच खानजमानने शहाजीराजांचा पाठलाग सुरु केला. तेव्हा शहाजीराजे पळ काढून कोंढाणा व मुरंबदेवाच्या डोंगरात निघून गेले. नंतर कोकणात जंजिऱ्याच्या सिद्दीकडे गेले असता त्याने आश्रय नाकारल्यावर चौलला पोर्तुगीजांकडे गेले. पण त्यांनीही नकार दिल्यावर शहाजीराजे जिजाऊ, बालशिवाजी आणि लष्करासह मुरंजनावर गेले. शहाजीराजे मुरंजन "प्रबळगडावर" असून तिथे थोडी विश्रांती घेऊन पुढे निघणार आहेत अशी बातमी खानला कळली. त्याने मग गडाकडे कुच केली आणि ३ कोसांवर येऊन थांबला. अतिशय अवघड वाट जबरदस्त जंगल त्यामुळे त्याचे पूर्ण सैन्य किल्ल्यापर्यंत पोहचू शकले नाही. तरीदेखील तो किल्याच्या पायथ्याशी पोचला पण तोपर्यंत शहाजीराजे रात्रीचा दिवस करून महुलीस पोचले आणि खानाचा डाव फसला. सन १६३६ मध्ये बालशिवाजींनी मुरंजनाचा उंबरठा ओलांडला. १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला. त्यात उत्तर कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर मोगली अंमल सुरू झाला. पण प्रत्यक्षात तेथे विजापूरच्या अदिलशहाचीच सत्ता होती. पुढे ही संधी शिवरायांनी साधली. जेव्हा शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेला हरवून जावळी ताब्यात घेतली, त्याचवेळी म्हणजे १६५६ मध्ये शिवरायांचा शूर सरदार आबाजी महादेव याने कल्याण भिवंडी पासून चेऊल ते रायरीपर्यंतचा सारा मुलूख स्वराज्यात घेतला. तेव्हा मुरंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. किल्ल्याचे नाव बदलून किल्ले प्रबळगड असे ठेवण्यात आले. पुढे १६५६ मध्ये पुरंदरच्या तहानुसार मोगलांना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगड शिवाजी महाराजांनी दिला. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंह हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोडला. मराठे किल्ले परत घेत असतांना मराठयांशी झालेल्या लढाईत केशरसिंह धारातीर्थी पडला. तत्पूर्वी राजपूत स्त्रियांनी जोहार केला. केशरसिंहाची आई व दोन मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले. शिवरायांच्या आदेशानुसार त्याना सन्मानाने देऊळगावी मोगल छावणीत पाठवण्यात आले. नंतर किल्ल्यावर खोदकामात बरीच संपत्ती आढळली. शिवकाळात या किल्याचे सुभेदार "आबाजी महादेव" हे होते. या किल्ल्या वरुनच उत्तर कोकणाचा कारभार चालत असे. इसवी सन १८२८ मध्ये पुरंदर परिसरातील रामोशी लोकांनी ब्रिटिशांविरोधात बंड केले होते. त्या वेळी ३०० लोकांची टोळी तळकोकणात उतरली आणि त्यांनी याच प्रबळगडाचा आश्रय घेतला. या वेळी त्यांनी जाहीरनामा काढला, की त्यांच्या परिसरातील जनतेने ब्रिटिशांना वसूल देऊ नये. प्रबळगड भोवतीच्या भूगोलाच्या आश्रयाने या क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना अनेक दिवस सळो की पळो करून सोडले. याच प्रबळगडावर ब्रिटीश सरकारने माथेरानसारखे थंड हवेचे ठिकाण विकसित करण्याचे ठरवले होते परंतु पाण्याअभावी इग्रंजानी हा विचार मागे घेतला व प्रबळगड जवळ असणारा डोंगर माथेरान हिल स्टेशन म्हणून विकसीत केले जर आज विकासाच्या दुष्टीने पहिले तर पूर्वी पाण्याचा अभाव असणारा प्रश्न मार्गी लागला आहे याचे कारण प्रबळ गडाच्या मागील पायथ्याशी असणारे मोरबे धारण जे नवीमुंबई शहराला पाणी पुरवठा करते जर सरकारने मनात आणले तर प्रबळगडाचा विकास माथेरान आणि महाबळेश्वर सारख्या हिल स्टेशन प्रमाणे करून महाराष्ट्राला अजून एक हिल स्टेशन देऊ शकते शिवाय जगापुढे आणखी एक उत्तम हिल स्टेशन पर्याय पर्यटकाना उपलब्ध होईल. मुंबई-पुणे जुन्या नॅशनल हायवेवर शेडुंग फाट्यापासून गडाकडे जायचा मार्ग आहे. कळबोलीपासून पनवेल बायपासने आल्यास जेथे मुंबई-पुणे जुना हायवे जोडला जातो. तेथे शेडुंग फाटा लागतो किंवा पनवेलवरुन सहा आसनी रिक्षा भाड्याने करुन ठाकुरवाडी गावामध्ये उतरावे. याशिवाय पनवेल ते ठाकुरवाडी अशी बससेवा आहे. ठाकुरवाडी पर्यंत आल्यावर मगमात्र प्रबल गडाकडे जाण्यासाठी पायी यात्रा सुरु करावी लागते. ठाकुरवाडी हे गडाच्या पायथ्याचे गाव आहे. हा गड दोन स्तरांवर पठाराप्रमाणे पसरलेला दिसतो. पहिल्या स्तरावर वस्ती आहे. इथवर जायला कच्चा बैलगाडीचा रस्ता आहे पण काही ठिकाणी पावसामुळे तो वाहुन गेल्याचे दिसते. गडाकडे जायला लागले की कलावंतीणीचा महाल नावाचा भला मोठा सुळका आपल्यासमोर दिसतो. साधारण तासाभराच्या चालीनंतर किल्ल्याचे पहिले पहारेकरी - एक बुरुज, काही पायऱ्या व त्यावरचा कट्टा - दिसतो. कातळात कोरलेली गणेशाची व हनुमानाची मूर्तीही दिसते. इथुन अर्धा तास चालल्यावर प्रबळमाची वस्ती लागते. प्रबळमाचीवर जाण्यास दीड तास लागतो. माचीवर गावाच्या उजवीकडे शंकराचे मंदिर आहे. प्रबळमाची गावातून समोरच किल्ला व कलावंतीणीचा सुळका यामधील खिंडीतून कलावंतीणीच्या सुळक्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्याची सुंदर नागमोडी पायवाट आहे. या घळीतून कलावंतीणीच्या सुळक्यावर जाण्यासाठी पाऊण तास लागतो. या वाटेवर पाण्याचे टाक आहे. माथ्यावर कुठलेही अवशेष नाहीत. या दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकाचे खूप जिव्हाळयाचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नृत्य करतात. कलावंतीवरून बालेकिल्ल्याकडे जाताना वाटेल एक मानवनिर्मित गुहा असुन तिची लांबी जवळपास ३० फुट आहे. हिला अंतर्गत काटकोनात वळवले असुन गुंफेच्या आत २० X २५ फुटाची प्रशस्त खोली आहे. प्रबळमाची गावातून किल्ल्याचा माथा डावीकडे ठेवत ३० मिनीटे चालल्यावर एक घळ दिसते . येथून गडाच्या बाले किल्ल्याकडे जाण्यास एक तास पुरतो. प्रबळगडाचा माथा म्हणजे एक मोठे पठार आहे. सर्व पठारी भाग हा जंगलाने व्यापलेला आहे. गडावर एक गणेशमंदिर व गणपतीची प्राचीन मूर्ती आहे. तसेच चार पाच पाण्याच्या टाक्यासुद्धा आहेत. प्रबळगडाला अकरा बुरुज आणि दोन दरवाजे असल्याचे कळते. तसेच कालाभूरुज आणि बोरीची सोंड यासारखी ठिकाणी आहेत, काळ्याबुरुजावर एक मोठा चुन्याचा ढीग आहे. हा चुन्याचा ढीग बुरुज अथवा इमारत बांधण्यासाठी पूर्वी वापर करण्यात आला असेल. गडावर तीन-चार इमारतींचे अवशेष आणि काही ठिकाणी तुटलेली तटबंदी या व्यतिरिक्त फारसं काही बघायला मिळत नाही. घनदाट कारवीच्या जंगलामुळे गडावरील वाटा नीट दिसत नसल्याने हे सगळे बघणे वाटाड्याची गरज भासते. गडावरून माथेरान, मोरबे धरण, तसेच कालाभूरुज आणि बोरीची सोंड यासारख्या ठिकाणाचे विविध पाँईंटस् फार सुंदर दिसतात. या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान, चांदेरी व पेब दुर्ग, एर्शल गड,कर्नाला किल्ला व समोर असणारे मुंबई शहर सहज ओळखून येते. गडाच्या पायथ्याशी काही नवीन घरे व दुकाने सुरू झाली आहेत त्यामुळे येथे राहण्याची व खाण्याची घरगुती व्यवस्था होते. गावाच्या कड्यावरून दिसणारा सुर्यास्त हे तर अदभूतपूर्व दृश्य आहे.

प्रबळगड 

​​​​​​​​​​​​जिल्हा - रायगड 
श्रेणी  - कठीण   
दुर्गप्रकार - गिरीदुर्ग